‘राघववेळ’ ही नामदेव कांबळे यांची पहिलीच कादंबरी. त्यांच्या या पहिल्याच साहित्यकृतीला १९९५ सालचे साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. या कादंबरीचे पुढे बंगाली भाषेत अनुवाद झालेला आहे. तर त्या अनुवादित कादंबरीलाही साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
मांग समाजातील वालंबी व राघू या मायलेकांच्या संघर्षाची, कौशीच्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. राघूचा समंजसपणा, शिक्षणासाठी त्याची चाललेली धडपड, त्याचा स्वाभिमानी स्वभाव, उंच
भरारी घेण्यासाठी आसुसलेले मन, त्या आड येत असलेली जातीची भिंत, पिढ्यांनपिढ्यांपासून चालत आलेले जन्मजात दारिद्र्य, त्याविरुद्ध त्याचा शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाशाकडे चाललेला प्रवास या कादंबरीतून आलेला आहे.
रघुसोबत वालंबीचं जीवनचित्रण या कादंबरीतून ठळकपणे येते. ही कादंबरी नायिकाप्रधान आहे, असे म्हणावयास काही हरकत नाही. विधवावस्थेत वालंबी ही दोन मुलं, एक मुलगी असा तीन लेकरांचा सांभाळ करते. जन्मजात दारिद्र्याशी झुंज देते. दोन वेळच्या पोटभर अन्नासाठी, मुलांना शिक्षणासाठी लागणाऱ्या फीसाठी ती रात्रंदिवस कष्ट करते. निंदायला, कापूस वेचायला, मातेरे आणायला अशी दररोज शेतात जाते. तर कधी वीटभट्टीवर कामाला जाते. पोळ्याला मोळ, पळसाची पाने, सागाची पाने व लाल मातीचा गेरू आणणे, तो गावात घरोघरी वाटणे, नवरात्रीची पूजा मागणे, ग्रहण मागणे यासारखी कामं तिची बारोमास चालतात.
या कामांमध्ये ती मुलांचीही ही मदत घेते. सोबत मुलेही सण-उत्सवांना गावात मागायला जातात. गावातील काही कार्यक्रमांमध्ये रघू सनई वाजवायला जातो. या सर्व कामधंद्यावर त्यांचे दोन वेळचे पोट भरत असते. एवढे कष्ट उपसूनही बऱ्याचदा त्यांना उपाशी राहावे लागते. लग्नकार्य गावपंगतीमध्ये सर्वात शेवटी जेवायला बसावे लागते. पत्रावळीसाठी जर त्यांनी पळसाची किंवा वडाची पाने त्या घरी टाकली असतील तर जेवण आटोपल्यावर त्यांना टोपली भरून उष्ट अन्न मिळते. असे नेहमी उष्ट खात, कधी उपाशी, कधी अर्धपोटी राहत उद्याच्या आशेवर हे कुटुंब आजचा दिवस ढकलत असते. (अपूर्ण)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw