Dr. Rahul Rajani

🚴🏾🚴🏾🚴🏾 ८० किमी – एक प्रवास 🚴🏾🚴🏾🚴🏾

 🚴🏾🚴🏾🚴🏾 ८० किमी – एक प्रवास 🚴🏾🚴🏾🚴🏾

(३०/१०/२०१७ च्या डायरीतील पान)

       परवा २८ ऑक्टो. (२०१७) ला मी नाशिकला गियरची सायकल घेतली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून घ्यायचं चाललेलं होतं. परवा घेतली आणि काल नाशिक ते जव्हार (८० किमी अंतर) चालवत आणली. सकाळी ६.४५ ला निघालो. ३.४५ ला पोहचलो. म्हणजे ९ तास लागले. 

         गेल्या ७ वर्षापासून मी सायकल चालवलेली नव्हती, गियरच्या सायकलीची बिलकूलही सवय नव्हती. कोणता गियर केव्हा टाकायचा, उतरवायचा, काहीच माहित नव्हते. मागच्या ३-४ महिन्यांपासून व्यायामातही खंड पडलेला. त्यात त्र्यंबकेश्वर ते जव्हार ४५ किमीपर्यंत प्रचंड चढ-उतार, घाटाचे व वळणदार रस्ते, रस्ता पावसाळ्यामुळे अतिशय खराब झालेला… प्रचंड खड्डे.  मात्र त्र्यंबकेश्वर, मोखाडा, जव्हार रस्ता व त्याच्या आजूबाजूचा हा भाग हिरवा शालू ल्यालेल्या डोंगररांगांचा असून अतिशय निसर्गरम्य आहे. तसेच नुकताच पावसाळा संपलेला असल्याकारणाने सर्वदूर हिरवळ, डोंगररांगांमधून वाहत येणाऱ्या नद्या, झरे, उंचावरून कोसळणारे लहान-मोठे धबधबे यामुळे या परिसराला निसर्गाचे देणे लाभले आहे! अशा या रस्त्याने न कंटाळता, अतिशय मजेत मी हे अंतर पार केलं.             

            वाघ नदीच्या पुढे अनेक ठिकाणी खूप उंचच्या उंच चढ आहेत, तेव्हा मात्र उतरून पायी चालत चढावं लागत होते. खूप थकवा येत होता. पण मागच्या वर्षाच्या Adventure camp मुळे मनाला सवय लागलेली की, कितीही उंच चढ असला तरी हळूहळू चालत राहायचं. खूप थकवा आला की, थोडा वेळ विश्रांती घ्यायची नि परत चालू लागायचं. 

          शेवटी-शेवटी तर चढ चढून झाल्यावर सायकलीवर बसताना दोन्ही पायांच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येऊ लागले. खूप वेदना व्हायच्या. तसाच खाली उतरायचो. पायाची हालचाल करून ते बाहेर काढायचो. वेदना कमी व्हायच्या. परत सायकलीवर बसून चालवू लागायचो. मध्येच हँडल सैल झाल्याने तो एकीकडे फिरून जायचा. उतरून व्यवस्थित करावा लागायचा. असा मजल-दरमजल करत घरी पोहचलो. 

            घरी आल्यावर अंगावरचे  कपडेसुद्धा न उतरवता तसाच पडून राहिलो. तासभर छानपैकी झोप लागली. ५.०० वा. जाग आल्यावर

गरम पाण्याने मस्त आंघोळ केली. खूप बरं वाटलं.

             दोन लिटर पाणी, ४ वेळेस चहा, १ ओआरएस, बेसनाचे २ छोटे लाडू एवढ्या रसदीवर प्रवास पूर्ण केला.९.०० तास एकटाच! शांत, निवांत, निसर्गाच्या सान्निध्यात, सर्व जग, प्रापंचिक चिंता, काळजी, काम, टार्गेट इ. सर्व-सर्व विसरून खऱ्या अर्थाने आज स्वत:साठी वेळ देता आला. स्वत:च्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा मात्र अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असा हा प्रवास होता!

 

Exit mobile version