Dr. Rahul Rajani

अभ्यास किती वेळ करावा?

मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास, १५ मिनिटे, एक मिनिट असं मुलांना विचारत जातो. माझ्या अनेकदा असे लक्षात आलेले आहे की, अनेक मुलं दिवसात एक मिनिटही अभ्यास करत नाहीत. अशी मुलं PSI/ STI यासारख्या परीक्षांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. PSI/ STI कशाला परंतु साधे पोलीस, तलाठीही होऊ शकत नाहीत. कारण आज प्रत्येक परीक्षांमध्ये स्पर्धां एवढी वाढलेली आहे की, आपल्याला दररोज न चुकता किमान ५-६ तास अभ्यास

केल्याशिवाय गत्यंतरच नाही. त्यात पुन्हा प्रत्येक परीक्षेच्या अभ्यासक्रमात चालू घडामोडी, गणित, बुद्धिमापन चाचणी, व्याकरण, विज्ञान असे विषय असतात. जे विद्यार्थी दिवसाला अर्धा-एक तासही अभ्यास करत नसतील, तर त्यांचा या विषयाचा पाया किती पक्का असेल, याची कल्पना आपण करू शकतो.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मुलाखत असे परीक्षांचे स्वरूप असते. सर्व विषयांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास करावा लागतो. संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतात. तपशील, सनावळ्या, आकडेवारी लक्षात ठेवावी लागते. कमी वेळेत अधिक प्रश्न सोडवायचे असल्याने खूप सराव करावा लागतो. मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी एक-एक मार्क महत्वाचा असतो. म्हणून उत्तर चुकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. कारण उत्तर चुकल्यामुळे परत Negative marking असल्यामुळे गुण कमी मिळत असतात. म्हणजेच बरोबर उत्तरामुळे मिळालेल्या गुणांमधून ते कापले जात असतात. त्यासाठी अचूकता वाढवावी लागते. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही बराच वेळ देणे अपेक्षित असते.

मित्रांनो, आपले स्वप्न जेवढे मोठे तेवढी जास्त मेहनत, तेवढा जास्त अभ्यास आपल्याला करावा लागेल. एक मला शेर आठवतो. “लोग नाखुनो से बनाते है जमीं पे कुवा और उम्मीद करते है के पानी निकले।” अर्थात, काही लोक खूप कमी मेहनत करतात आणि खूप मोठ्या यशाची अपेक्षा करतात. कसे शक्य आहे ते? मला ११-१२ वीला इंग्रजी शिकवायला एक सर होते. ते नेहमी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये असे म्हणायचे की, “बापूहो, कोळप्याने कुंदा निघत नाही.” कुंदा म्हणजे गवताचा एक प्रकार. ज्यांच्या मुळ्या जमिनीत खूप खोलवर गेलेल्या असतात आणि साध्या कोळपणीने तो निघणे शक्यच नसते. त्यासाठी नांगरच लागतो.

त्याचप्रमाणे PSI/ STI/ MPSC/ UPSC/ NET-SET यासारख्या परीक्षा किंवा वर्गात/ विद्यापीठात प्रथम येणे यासारखी स्वप्न जर तुम्हाला पडत असतील तर त्यासाठी कठोर मेहनतीची, तेवढा वेळ देण्याची आवश्यकता असते. त्याशिवाय काहीही साध्य होत नाही. म्हणून जेवढे तुमचे ध्येय मोठे असेल, तेवढा वेळ तुम्ही दिवसातून अभ्यासासाठी द्यायला हवा.

मी स्वतः कित्येक वर्ष जेवण, झोप या वेळेव्यतिरिक्त उरलेल्या वेळेत फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच केलेला आहे. म्हणून मी बी. ए व एम. ए. या दोन्ही परीक्षांमध्ये मराठी विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सर्व प्रथम येऊन सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. बी. ए. ला आमच्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात सर्व विषयांमध्ये प्रथम आलेलो आहे (२००५). एम. ए ची परीक्षा दिल्या-दिल्या नेट व नंतर एका वर्षाच्या आत नेट-जे.आर.एफ या परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे.

मित्रांनो, मागचे ऑलम्पिक जेव्हा झाले तेव्हा मी दररोज न चुकता ऑलम्पिकच्या बातम्या लोकसत्तामध्ये वाचत होतो. त्यात गोल्ड, सिल्व्हर किंवा ब्राँझ पदक मिळवलेल्यांची नावे व ते किती दिवसांपासून, महिन्यांपासून सरावाला सुरूवात करायचे, त्याबद्दल माहिती दिलेली असायची आणि त्यापैकी बहुतांश जणांच्या सरावाचे वेळापत्रकच असे असायचे की, ते वर्षातून जेमतेम दोन किंवा तीन दिवस सुट्टी घेऊ शकत होते. अनेक जणांनी तर मागचे ऑलम्पिक संपल्या-संपल्या सरावाला सुरुवात केलेली होती. तेव्हा कुठे ते या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करू शकले होते.

सांगायचे तात्पर्य, यशासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.

अभ्यासाला सुरुवात करताना आपल्या वाचनाचा वेग, आपली आकलनक्षमता, आपले विविध विषयांचे पूर्वज्ञान इत्यादींचा विचार करून आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात करायला हवी व किती वेळ द्यायचा हे ठरवायला हवे. त्याप्रमाणे विषयानुसार दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे वेळापत्रक ठरवायला हवे.

माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार मी असे सांगेन की, ज्याप्रमाणे एक लहानसे छिद्रदेखील कितीही मोठ्या जहाजाला बुडू शकते. त्याचप्रमाणे तुमचा थोडासा आळशीपणा, ढिल्लेपणा, हायगाई तुम्हाला यश मिळविण्यापासून वंचित ठेवू शकते. म्हणून जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत दिवस-रात्र अनुकूलता-प्रतिकूलता अशा कशाचीही पर्वा न करता आपण अभ्यास करत राहायला हवा. कुठलीही कसर ठेवता कामा नये.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलेच आहे की, ‘उठा जागे व्हा’ त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन की, ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबू नका. मग वाटेत कितीही व कोणतीही अडथळे येवोत. माझ्या बघण्यात अशी अनेक मुलं आलेली आहेत की, ज्यांनी कित्येक महिने, वर्ष खूप चांगला अभ्यास केलेला होता. यशाच्या खूप नजीक ते जाऊन पोहोचले होते. पण का कुणास ठाऊक त्यांच्यातले धैर्य कमी पडले व ९०-९५ पावले चालून पुढील ५-१० पावलांवर त्यांची मंजिल येऊन ठेपलेली असताना ते परत निघून गेले. म्हणून माझे म्हणणे आहे की, ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबू नका. मग बघा यश तुमचेच आहे !

मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अभ्यास सुरू केला व एकदाचे आपल्याला विषय समजायला लागले, आपण वेळापत्रकाप्रमाणे ठरवलेले लहान-लहान टार्गेट पूर्ण करत गेलो की, हळूहळू आपला आत्मविश्वास वाढत जातो व अभ्यासात पण एक प्रकारची मजा येत जाते. संघर्षातून जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. यश हे काही क्षणांचे असते. पण त्यासाठी घेतलेल्या कित्येक महिन्यांच्या-वर्षांच्या मेहनतीतून खरा आनंद मिळत असतो.

पुढे मग आपल्याला यशाची सवयच लागून जाते. आपले तसे माईंड सेटअप तयार होऊन जाते. यश मिळवण्यासाठी काय-काय व कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे असते, हे आपल्याला माहीत होऊन जाते. त्याला आपण यशाची चावी म्हणू या ना, ती आपल्याला गवसते आणि मग आपले अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. सचिन, विराट, रोहित यांना जरा डोळ्यासमोर आणा. मग तुमच्या लक्षात येईल की हे एवढे यशस्वी का आहेत ते? कारण ते मी वर सांगितलेल्या प्रक्रियेतून गेलेले आहेत.

तेव्हा शेवटी मी एवढेच सांगेन की, ध्येय छोटे जरी असले तरी ते साध्य करण्यासाठी भरपूर वेळ द्या. तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ द्या. ते तुम्ही कमी दिवसांमध्ये साध्य कराल. आणि याउलट जर ‘आपल्याला कुठे जास्त मोठी परीक्षा पास व्हायची आहे’, असा विचार केला तर मग कदाचित सहज मिळू शकणारे यशही कधीच मिळू शकणार नाही.

तर चला मग आत्ताच कामाला लागा व एक क्षणही न दवडता आपल्या ध्येयाला जवळ करा !

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !   

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

(आपल्याला जर माझे लेखन वाचायला आवडत असेल, तर ब्लॉग उघडल्यावर जो चौकोन येतो त्यात तुमचे नाव व मेल आयडी लिहून माझ्या ब्लॉगला subscribe करा. जेणेकरून माझे नंतरचे लेखन तुम्हाला वाचायला मिळेल. धन्यवाद! )

Exit mobile version