Dr. Rahul Rajani

तौलनिक साहित्याभ्यास – १ (माझ्या पीएचडीच्या प्रबंधातून)

तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले विचार, मूल्य ठरवितानाही तुलना करूनच आपल्या स्वभावानुरूप ठरवित असतो.

साहित्याचा विचार करताना तुलनेला अत्यंत

महत्त्व आहे. तुलनात्मक दृष्टी, तुलनाक्षमता असल्याशिवाय आपण साहित्याकडे तारतम्यभावाने पाहू शकत नाही. अनेक साहित्यांच्या अभ्यासातूनच त्यांच्यातील काही समान गुणधर्मांवरून साहित्याची विशिष्ट मूल्ये, निकष ठरविले जातात. या निकषांनुसार मग नंतर निर्माण झालेले साहित्य, साहित्यकृती अभ्यासली जाते. वेगवेगळे लेखक अथवा साहित्यिक यांच्याविषयाचे आपले मत अप्रकटपणे एकमेकांशी तुलना करूनच तयार झालेले असते. मध्ययुगीन काळात मराठी साहित्यात ओवी, अभंग, आर्या या छंदात अनेकांनी लेखन केले. मात्र ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकोबारायाचे’, ‘आर्या मोरोपंतांच्या’ असे जेव्हा म्हटले जाते. तेव्हा त्यामागे तुलनाच असते. अशी त्रोटक वरवरची तुलना प्रत्येक भाषेतील साहित्यामध्ये प्राचीन काळापासून करण्यात आलेली आहे. (क्रमश:)

© copyright

Exit mobile version