विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षा केव्हा होतील, हे आज आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. तुमच्या परीक्षा जेव्हा होतील, तेव्हा होतील किंवा न होवोत, तुम्ही तुमचा अभ्यास थांबवता कामा नये. उलट मी असे म्हणेन की, या लॉकडाऊनच्या निवांत अशा काळामध्ये तुम्ही
फक्त परीक्षार्थी म्हणून अभ्यास न करता विविध विषयांचे वाचन करायला हवे. तुमच्याकडे पुस्तके नसतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विचारून पुस्तकं
ऑनलाइन किंवा पीडीएफ स्वरूपात वाचायला हवीत. तसेच युट्युबवरून किंवा इंटरनेटवरून काही कौशल्य तुम्ही आत्मसात करून घ्यायला हवीत. हे सर्व तुम्हाला भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयोगात येणार आहे. यासाठी नियमितपणे आपल्या शिक्षकांच्या संपर्कात रहा. दिवसातील ठराविक वेळ स्वतःच्या शारीरिक बौद्धिक व मानसिक विकासासाठी राखून ठेवा. नवीन काहीतरी शिका. जर तुम्ही हे दिवस, ही वेळ अशीच वाया घालवून टाकली तर तुम्ही तुमचं खूप मोठं नुकसान करत आहात, असेच म्हणावे लागेल. कोरोना आज आहे उद्या नसणार पण आपण असणार आहोत. जीवनामध्ये संघर्ष असणार आहे, पुन्हा शाळा सुरू होतील, महाविद्यालये सुरू होतील, परीक्षा होतील. तसेच उद्योगधंदे सुरू होतील, खाजगी व सरकारी क्षेत्रामध्ये नोकऱ्यांच्या जाहिराती निघतील. तेथे तुमचं नॉलेज व कौशल्य यांचा कस लागेल किंवा मिळविलेले ज्ञान व आत्मसात केलेली कौशल्ये यांच्या बळावर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार, चार जणांना रोजगार देऊ शकणार. देशापुढे, एकूणच समाजापुढे ज्या काही डोंगराएवढ्या अडचणी, संकटे भविष्यात उभी राहणार आहेत. त्यावर एकजुटीने आपल्या सर्वांना मात करायची आहे. त्यात तरुणांचे, म्हणजे तुमचे योगदान फार मोठे असणार आहे. आजची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाहीये, पण भविष्यातील परीक्षांसाठी, संघर्षासाठी स्वतःला सिद्ध करणं हे नक्कीच आज आपल्या हातात आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, थांबला तो संपला! वेळ वाया घालवू नका. वेळेचा सदुपयोग करून घ्या. वाचा व विविध कौशल्य आत्मसात करा. संकटांना पुरून उरण्याइतपत बळ नक्कीच आपल्याकडे आहे! त्यात वृद्धी व्हावी एवढीच अपेक्षा!
– एक शिक्षक
डॉ. राहुल रजनी