मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.
ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.
तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
१) मित्रांनो, आपण जे वाचत आहोत किंवा जे ऐकत आहोत ते जर आपल्याला समजत असेल तर आपले लक्ष त्या विषयावर केंद्रित होते आणि जर ते प्रयत्न करूनही समजत नसेल तर मात्र त्या कामात चित्त लागत नाही. मन भटकायला लागते. म्हणून आपली आकलनक्षमता वाढवणे खूप गरजेचे असते. जसजसे आकलन, समजणे वाढत जाईल तसतशी एकाग्रताही वाढत जाईल. आकलन वाढवण्यासाठी विविध विषयांवर नियमितपणे वाचन करावे, ऐकावे. समजत नसेल तर कुणाला विचारावे, चर्चा करावी, शब्दकोश, संज्ञा-संकल्पना कोषामध्ये अर्थ शोधावेत. त्याशिवाय आकलन वाढणार नाही व ते वाढले नाही तर एकाग्रताही वाढणार नाही.
२) एकाग्रता वाढवण्यासाठी एका वेळेस एकच गोष्ट करावी. एक ना धड भाराभार चिंध्या नको. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटलंय की, ‘If you want success you must be narrow minded’ याचा अर्थ जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्ही मर्यादित गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. (संकुचित व्हा, असा त्याचा अर्थ होत नाही.)
३) एकाग्रता साधण्याची क्षमता सवयीने हळूहळू वाढवावी. आधी अर्धा तास, मग एक तास, मग दोन तास अशा अभ्यासाच्या बैठकांची वेळ वाढवावी. दिवसात तुम्ही अशा प्रकारे दोन वेळेस अभ्यासाला बसत असाल तर त्या बैठकांची संख्या वाढवावी. दोन बैठकांच्या दरम्यान थोडं फिरणं, दीर्घ श्वास घेऊन श्वासावर लक्ष केंद्रित करणं, आई-वडील, मित्र किंवा इतरांशी हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा करणं इ. गोष्टी कराव्यात. म्हणजे थोडा ब्रेक अशा पद्धतीने घ्यावा.
४) अभ्यासात विविधता (व्हरायटी) आणावी. अभ्यासासाठी विविध पद्धती वापराव्यात. वाचन तर आपण करतोच, वाचन करताना नोट्स काढणे, महत्त्वाच्या शब्दांना, वाक्यांना, परिच्छेदांना अधोरेखित करणे, परिच्छेदाला, वाक्याला समासात बाजूला उभी रेष ओढणे, टिक मार्क करणे, आकृत्या काढणे, जे वाचलेले आहे त्याच्या प्रतिमा (चित्रे- images) मन:चक्षूसमोर उभ्या करणे, चिंतन करणे, अभ्यासावर चर्चा करणे, वाचलेले इतरांना समजावून सांगणे, आपल्या आवाजात रेकॉर्ड करून घेणे, youtube वर व्हिडीओ असतील तर तिथे पाहणे, आपल्या भोवती अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे इ. गोष्टी केल्याने आपण कंटाळत नाही. किती वेळ अभ्यास झाला, याचेही भानही बऱ्याचदा राहत नाही.
५) आपल्याला एकाग्रता वाढवायची असेल तर आपल्यात नवीन काहीतरी माहित करून घेण्यासाठीची, जाणून घेण्यासाठीची उत्कंठा, उत्सुकता, आवड असणे आवश्यक असते. बौद्धिक कष्टातून किंवा काहीतरी नवीन, वेगळे ऐकले, वाचले, समजून, शिकून घेतले, तर त्यातून आनंद मिळायला हवा.
६) एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्याने एकांतात मात्र पुस्तकांच्या, अभ्यासू मित्रांच्या, शिक्षकांच्या सान्निध्यात जास्त वेळ राहावे. त्यामुळे अभ्यासाला पोषक वातावरण निर्मिती होते. हळूहळू आपले आकलन, बौद्धिक क्षमता वाढत जाते, तसा माईंड सेट होत जातो.
७) एकाग्रता साधण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यही महत्वाचे असते. जर आपण शरीराने अशक्त असू, आपल्याला काही विकार असतील तर शारीरिक स्वास्थ्य लाभत नाही. आपले लक्ष पुन्हा पुन्हा होणाऱ्या वेदनांकडे, दुखण्याकडे, त्रासाकडे जाते. म्हणून आपले आरोग्य चांगले असणे हे सुद्धा एकाग्रता साधण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी योग्य व समतोल आहार, व्यायाम, प्राणायाम, योगासने करायला हवीत. त्यामुळे शारीरिक क्षमतेत वाढ होते. मनावर नियंत्रण येत जाते. आत्मविश्वास वाढत जातो. मन, मनगट व बुद्धी या तिघांचा मिलाफ झाला की जीवनात असाध्य गोष्टही साध्य करता येऊ शकतात.
८) आताच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या, व्हाट्सअप, फेसबुक व सोशल मीडियाच्या युगात एकाग्रता साधणे, एकाच विषयावर बराच वेळ लक्ष केंद्रित करणे खूप अवघड आहे. थोडं कामात मग्न होतो ना होतो तेवढ्यात व्हाट्सअप, टेलिग्रामवर मॅसेज आल्याची ट्यून वाजते व आपले लक्ष विचलित होते. म्हणून या गोष्टींपासून थोडं लांब राहायला हवे किंवा मग त्या संदर्भातील शिस्त पाळायला हवी.
मागे १९ वर्षाच्या आतल्या मुलांचा क्रिकेटचा विश्वकप झाला. ज्यात भारत अंतिम फेरीत पोहचला होता. त्यावेळी राहुल द्रविड हा कोच होता. त्याने त्या खेळाडूंचा कित्येक दिवस मोबाईल जप्त करून घेतला होता. त्यामुळे त्यांचे अनावश्यक विषय, मीडिया याकडे लक्ष गेले नाही व ते फक्त खेळावर लक्ष केंद्रित करू शकले व यशस्वी झाले. पी. व्ही. सिंधू ही भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू. तिचा कोच पी. गोपीचंद. यांनीही अनेकदा जागतिक स्पर्धांच्या आधी कित्येक महिने तिचा मोबाईल जप्त करून ठेवल्याचे माझ्या वाचनात आलेले आहे. MPSC/ UPSC परीक्षांमध्ये यशस्वी होणारे बहुतांश जण मोबाईल व सोशल मीडियापासून लांब राहतात.
मित्रांनो, अशी काही पथ्ये पाळली, स्वतःच्या मनाला, शरीराला सवय लावली तर एकाग्रता नक्की हळूहळू टप्प्याटप्याने वाढते व ती वाढली की आयुष्यात त्याचा आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये खूप फायदा होतो. सोशल मीडियावरच काही अभ्यासू व्यक्तींच्या सहवासात राहिले, त्यांचे व्हिडिओ बघितले किंवा लेखन वाचले तरीही एखादा विषय समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो, हा माझा अनुभव आहे. पण त्याची शिस्त पाळली जायला हवी.
माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून व मी स्वतः आतापर्यंत माझ्या अभ्यासासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी जे प्रयोग केलेले आहेत, ते तुमच्यासमोर मांडले. शेवटी स्वतःचा मार्ग स्वतःलाच शोधून काढायचा असतो, हेही लक्षात असू द्या.
आपला,
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
आपल्याला जर माझे लेखन वाचायला आवडत असेल, तर ब्लॉग उघडल्यावर जो चौकोन येतो त्यात तुमचे नाव व मेल आयडी लिहून माझ्या ब्लॉगला subscribe करा. जेणेकरून माझे नंतरचे लेखन तुम्हाला वाचायला मिळेल.
तसेच मी youtube वर सुद्धा आहे. काही व्हिडिओंच्या लिंक शेअर करतो. व्हिडिओ बघा व आवडल्यास माझ्या चॅनेलला Subscribe करा.
धन्यवाद!
व्हिडिओंची लिंक-
१) आदिवासी समाज, संस्कृती, तत्वज्ञान : परिचय (मुलाखत – श्री. रवी बुधर, मुलाखतकार – डॉ. राहुल पाटील)
https://youtu.be/1TNzfzva-mQ
२) महानुभाव संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान-
https://youtu.be/oEuj70qz534
३) संत साहित्य : प्रश्नोत्तर स्वरूपात (पदवी, पदव्युत्तर तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)
https://youtu.be/fg3XjvdP1UU
४) ग्रामीण साहित्य : संकल्पना, स्वरूप व मराठीतील परंपरा
https://youtu.be/mJgbqIN6BZ8
५) वागिंद्रियाची रचना व कार्य –
https://youtu.be/p9O2KeNDgT4
६) साहित्य आणि समाज : परस्परसंबंध –
https://youtu.be/70Tgmul9aTo
७) शिक्षणाची उद्धिष्टे-
https://youtu.be/4UbJ6Fh33v4
८) उच्चारण-स्थानावर आधारित स्वनांचे प्रकार-
https://youtu.be/HEkXOyDGjVM
९) जागतिक आदिवासी दिन : पार्श्वभूमी, महत्त्व व थोडं चिंतन
https://youtu.be/m5jkG7_4iAo
१०) ‘गणपती’ म्हणजे काय?
https://youtu.be/qwK3AmVtARg
११) जीवनात यशस्वी होण्यासाठी शिबिरे व कार्यशाळांचे महत्त्व-
https://youtu.be/WTWlxASnS-U
१२) दलित साहित्याच्या प्रेरणा व वैशिष्ट्ये-
१३) भाषाभेद संकल्पना व भाषाभेद निर्मितीची कारणे
१४) वर्णनात्मक भाषाविज्ञान : संकल्पना, स्वरूप व मर्यादा
https://youtu.be/TdpZmrMKo2E
१५) ऐतिहासिक भाषाविज्ञान : संकल्पना, स्वरूप व मर्यादा
१६) दलित साहित्य: संकल्पना व स्वरूप
१७) भाषा म्हणजे काय?
१८) मानव व प्राणी यांच्या भाषेतील फरक
१९) म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य (भाग-१)
https://youtu.be/lo2rtKoApFY
२०) म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य (भाग-२)
२१) How to do Voice typing on Mobile-
२२) How to send a message, photos, videos yo many people from Whatsapp at the same time- https://youtu.be/i3O5_9-tojc
२३) How to use Screen Recorder app-