Dr. Rahul Rajani

कोरोना व स्थलांतरितांचा प्रश्न

अक्षर मानव या संघटनेने परवा असे आवाहन केले की, “आपल्या नाशिकवरून मुंबई-आग्रा हायवेने असंख्य लोकं पायी, सायकलीने किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांच्या गावी काही आपल्याच राज्यात तर काही परराज्यात निघालेले आहेत. त्यांच्यासाठी आपण पोळी-भाजी, बिस्कीट पुडे, फळे, पाण्याच्या बाटल्या हे व इतर खाद्यपदार्थ जे काही असेल ते उपलब्ध करून घ्यायचे आहे. त्यासाठी उद्या सकाळी ९.०० वा. आपण वरील वस्तू घेऊन या. आम्ही कसारा घाटाजवळ त्या त्यांच्यापर्यंत पोहचवू.”

तोपर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळायचे म्हणून आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. पण उद्या पोळीभाजी व बिस्किट पुडे घेऊन जायचे मी निश्चित केले. माझा मित्र चंद्रकांत पाटील व माझे स्टाफ मेम्बर विजय शिंदे हे माझ्या बाजूलाच राहतात, त्यांनाही मी हे सांगितले. ते पण लगेच तयार झाले.

परवा ठरल्याप्रमाणे मी व माझा मित्र आम्ही दोघे जण कारने हायवेवर आलो. पण तिथे भरधाव वेगाने ट्रक, रिक्षा व इतर वाहने धावत होती. मग आम्ही हायवेनेच मुंबईच्या दिशेने ४-५ किमी पुढे गेलो व मुंबईकडून येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिलो. जवळपास अर्धा तास आम्ही तिथे उभे होतो. आम्ही पोळी-भाजीचे ते पार्सल देण्यासाठी अनेक वाहनांना हात दिला. पण ते काही थांबले नाहीत. सायकलीने जाणाऱ्यांना आम्ही बिस्किट पुडे दिले. कारण रस्त्यावर काहींनी जेवणाची व्यवस्था केलेली असल्याने त्यांनी आमच्याकडून पोळी-भाजी काही घेतली नाही. मग आम्ही अक्षर मानवच्या कार्यकर्त्यांकडे ते सोपवले. ते कसाऱ्याकडे घेऊन गेले.

या अर्ध्या तासादरम्यान मी रस्त्याने जाणाऱ्या स्थलांतरितांची जी परिस्थिती बघितली, ती अतिशय भयानक होती. लोकं अक्षरश: मिळेल त्या वाहनाने गावाच्या, आपल्या लोकांच्या भेटीच्या ओढीने निघालेले आहेत. पायी, सायकल, मोटरसायकल, रिक्षा, कार,

मालवाहू छोटी वाहने, ट्रक मिळेल त्या वाहनाने लोकं गावी जात आहेत. जे बिचारे पायीपायी व सायकलीने जात आहेत, त्यांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. मी काही सायकलीवर जाणाऱ्यांशी बोललो. ते मुंबईहून ४-५ दिवसांपूर्वी निघाले आहेत. त्यांना उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये जायचे आहे. मी त्यांना केव्हा पोहचणार? ट्रक व इतर वाहनांनी का जात नाहीयेत, असे प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी १५-२० दिवसात पोहचू. तसेच ट्रकवाले ४००० ते ६००० पर्यंत भाडे मागत आहेत, म्हणून सायकलीने निघालो, असे उत्तर दिले. यापैकी एक जण पस्तिशीच्या आसपासचा तरुण होता. शरीराने तसा मजबूत. घामाने ओलाचिंब झालेला, प्रचंड थकलेला. माझ्याशी बोलला. मनाने खूप खचलेला दिसत होता. काय अवस्था होईल त्यांची? जवळ पैसा नाही. खायला रस्त्यावरील लोकांकडून जे काही मिळाले तेच. मे महिन्याचे उन्हाळ्याचे दिवस. प्रचंड उष्णता. याच्यापुढे खानदेश व मध्यप्रदेशात उष्णता जास्त असणार आहे. रिक्षाने जाणाऱ्या लोकांनाही खूप दिवस लागणार. अतिशय दाटीवाटीने हे लोकं प्रवास करत आहेत. (याचा मी फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ टाकलेला आहे. या लिंकवर जाऊन आपण तो बघू शकता.) https://m.facebook.com/story.php?story_fbid=2485736184859844&id=100002704602248

हे सर्व पाहून मला काही प्रश्न पडले. ते असे-

१) एवढ्या मोठ्या संख्येने लोकं गावाकडे निघालेत, हे सर्व परवानगी घेऊन निघालेत का? (अर्थात नाही).

२) या सर्वांचे निघण्याआधी मेडिकल चेकअप झालेले आहे का? (अर्थातच नाही.)

३) जर या सर्वांनी परवानगी घेतलेली नाही, यांचे मेडिकल चेकअप झालेले नाही, तर लॉकडाऊन, जिल्हाबंदी हे सुरू आहे, असे कसे म्हणता येईल? मग आम्ही अमुक-तमुक उपाययोजना करतोय, हा आव कशाला आणायचा?

४) फाळणीनंतरचे हे भारतातले सर्वात मोठे स्थलांतर आहे आणि हे सर्व मजूर, कष्टकरी अशा निम्न वर्गातील लोकांचेच हे स्थलांतर होत आहे. त्यांच्यावर ही पाळी कुणामुळे आली?

५) छोट्या वाहनांमधून जाणारे समजा एकाच कुटुंबातील असतील. पण ट्रकसारख्या मोठ्या वाहनांमधून गर्दीने जाणारे अनेक ठिकाणचे व अनेक कुटुंबातील लोकं असतील. यांच्यापैकी एकाला जरी कोरोना झाला असेल तर त्याचा प्रसार त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांपैकी इतरांना होणार नाही का?

६) यांच्यापैकी कितीजण जिवंतपणे त्यांच्या गावी पोहचतील?

७) यांच्यामुळे त्यांच्या गावात व अशा पद्धतीने नंतर सर्व भारतात कोरोना पोहचून त्याचा सामाजिक प्रसार होणार नाही का?

८) असा खेड्यापाड्यात प्रसार झाला, तर यावर सरकार कोणत्या उपाययोजना करेल.

९) हे लोकं थोडाच सामान सोबत घेऊन निघालेत. पायी व सायकलीने जाणारे तर जवळपास सर्वच संसार मागे टाकून निघालेत. ते परत जाऊ शकणार का? त्यांच्या शहरातील संसाराचे काय होईल?

१०) शेवटचा प्रश्न लॉकडाऊनच्या आधी भारतीय राज्यकर्त्यांनी कोणती पूर्वतयारी केली होती????

निरीक्षण-

सरकार, प्रशासन शहरातील लोकांना कोरोनापासून बचाव करण्याची हमी व खात्री देण्यात कमी पडलेले आहे. लॉकडाऊन करताना यांचा कोणताही विचार केला नाही. त्यांना गावी जाऊ दिले नाही. आता शहरांमध्ये कोरोनाला प्रतिबंध घालणे अशक्य झाल्याने त्यांच्या या स्थलांतराकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

एकूण परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मी आधीपासून लोकांना गावी पाठवण्याच्या बाजूनेच आहे. पण लोकांना सुरक्षितपणे व नियोजनपूर्वक पाठवले जाणे आवश्यक होते. या विषयावर मी ‘कोरोना व झोपडपट्टीतील लोकांचा प्रश्न’ हा एक लेखही लिहिलेला आहे. https://drrahulrajani.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%9d%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80/

– डॉ. राहुल रजनी

Exit mobile version