आज मी एका मोबाईलच्या दुकानावर माझ्या आयडियाच्या कार्डची पोर्टेबिलिटी करायला गेलो होतो. तिथे एक बुवा त्या दुकानदाराला एका गोष्टीच्या आधारे आईचे महत्त्व समजावून सांगत होता. (दोन-तीन दिवसांपूर्वी याच दुकानावर तो बुवा याच मोबाईलवाल्याला ‘माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ युट्युबवर टाकायचे आहेत. तुम्हाला टाकता येतील का?’ असे विचारत होता). मी तिथे पोहचलो, तेव्हा ती गोष्ट अर्धी झाली होती. ती अशी-
“एक मुलगा त्याच्या आईला जंगलात सोडण्यासाठी (की मारण्यासाठी…) घेऊन जातो. दाट जंगलातून जाताना ती आई मध्ये येणाऱ्या वनस्पती, झुडपांच्या फांद्या मोडत जाते. जंगलाच्या खूप आत तो मुलगा तिला सोडून जायला निघतो (की मारतो). तेव्हा ती त्याला सांगते की, ‘बाळा, मी ज्या फांद्या मोडत आलेली आहे, त्या रस्त्याने व्यवस्थित जा. तात्पर्य, मृत्यूच्या दारात असतानाही आई ही मुलाचे हित पाहत असते”. अशी गोष्ट त्याच्या कीर्तनी शैलीतून तो त्या दुकानदाराला ऐकवत होता.
मी तोपर्यंत नवीन कार्ड टाकणे, त्या कार्डवरून कंपनीला फोन करणे, व्हेरिफिकेशन कोड टाकणे इ. कामात गुंग होतो. त्यामुळे मी एवढं गांभीर्याने ऐकत नव्हतो. पण ज्ञानेश्वर माऊलींनी “.…………….” (माझ्या लक्षात राहिली नाही) या ओवीतून “पत्नी ही कुत्रीसारखी असते”, असे म्हटलेले आहे, हे वाक्य तो जसे उच्चारला तसे माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष गेले. पुढे तो सांगू लागला की, “तुम्ही तिच्या हातात पैसे दिले तर ती खुश राहते. मग ती तुम्हाला चहा करून देते, तुमची सेवा करते. तुम्ही नाही दिले की ती हे मनापासून करत नाही. ती नाराज राहते. म्हणून ती कुत्रीसारखी असते”. त्याचे हे बोलणे ऐकून मला खरं तर धक्का बसला.
मी शांतपणे त्याला म्हणालो की, “खरं तर मी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्षही करू शकलो असतो. पण मला तुम्हाला उत्तर दिले पाहिजे. तुम्ही आईचे महत्व सांगत आहात, ते बरोबरच आहे. ते कुणीही – अगदी कुणीही व्यक्ती मान्य करेल. परंतु तुम्ही जिला आई म्हणून तिचा गौरव करतात, ती आधी आपल्या बापाची बायकोच असते ना! म्हणजे ती बायको म्हणून आधी कुत्रीसारखी असते व नंतर मुलांसाठी आई म्हणून पूजनीय असते, असे कसे? आणि जी पत्नी आपली एवढी सेवा करते, आपल्यासाठी स्वयंपाक करते, आपली उष्टी भांडी धुते, कपडे धुते, आपल्याला शारीरिक सुख देते, मुलं जन्माला घालते, त्यांना लहानाचं मोठं करते, मग ती मुले आपल्याला म्हातारपणात आधार देतात, त्यांनी नाही दिला तर तीच आपली सेवा करत राहते, तिला तुम्ही अशी उपमा देतात, हे काही बरोबर नाहीये”.
मग तो बुवा थोडा बावरला पण लगेच सावरून म्हणाला की, “मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला कळालं नाही आणि असे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आहे”
मी म्हटले की, “ज्ञानेश्वर माऊलींनी सांगू दे किंवा आणखी कुणी! (खरं तर त्यांनी असे सांगितलेलेच नाही.) त्यांनी सांगितलेले सर्वच खरे मानायचे असते का?”
शेवटी तो मोबाईलवाला म्हणाला की, “सर जे म्हणताहेत ते बरोबर आहे”.
तरी तो वरचंच तुणतुणं वाजवत राहिला. “ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय व मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळालं नाही”.
मी, “मला व्यवस्थित कळालंय.जाऊ द्या आता”, असं म्हणून त्याचा निरोप घेतला.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113