२००५ पर्यंत मीही धार्मिक, आध्यात्मिक लोकांच्या प्रभावाखाली होतो. स्वाध्यायात जायचो. व्रती म्हणून काम करायचो. व्रती म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन स्वाध्याय केंद्र चालविणारी व्यक्ती. स्वाध्यायात असताना धार्मिक विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. प्रचार-प्रसाराचे कार्य केले. एकदा ५-६ दिवसांसाठी माउंट अबूला ‘ओम शांती’ वाल्यांच्या केंद्रात राहूनही आलो होतो. माझ्याकडे तेथील फोटोही आहेत. त्या काळात मी चिकित्सा करणाऱ्या, चर्चा घडवू पाहणाऱ्या पुरोगामी विचारांच्या लोकांच्या कार्यक्रमांना प्रताप महाविद्यालयात (अमळनेर, जि. जळगाव) हाणून पाडले होते. त्यासाठी प्रसंगी आक्रमक झालो होतो. हळूहळू काही गोष्टी कळत गेल्या. त्यासाठी मला
अभ्यासक्रमातील दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, वैचारिक साहित्य तसेच सांस्कृतिक इतिहासावरची पुस्तके, समाजसुधारकांचे कार्य व साहित्य, ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ व इतर ग्रंथांचे वाचन इ. गोष्टींची खूप मदत झाली. आता मी पूर्णतः बदललोय. अंधश्रद्धा, विभूतीपूजा, परंपरांचे अंधानुकरण, उदात्तीकरण या गोष्टी समाजाच्या, गोरगरिबांच्या विकासासाठी किती घातक आहेत, हे चांगले लक्षात आलेय आणि स्वाध्याय, ओम शांती, बाबा, बुवा हे याच गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करतात.
मागील काही वर्षांपासून जाती-धर्म-वंश-लिंग यांच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा, तसे वागण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या समाजात एवढे सोपे नाहीये असे वागणे. पुन्हा मीही याच समाजात लहानाचा मोठा झाल्याने त्याचे काही गुण-दोष माझ्यातही आलेत. पण त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करतोय. यातच एक प्रकारच्या मुक्तीचा अनुभव येतोय. केवढे मोठे निरर्थक ओझे आपण डोक्यावर घेऊन फिरत होतो, हे आज कळतेय.
आज आमचे विचार अनेकांना पटणार नाहीत. पण ही धुंदी उतरली की ते आपोआप जमिनीवर येतील व त्यांना वस्तुस्थिती कळेल.
वरील प्रकारच्या अभ्यासातून कोणताही माणूस बदलू शकतो, यावर मात्र माझा गाढ विश्वास आहे.
(शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक, साहित्य इ. विषयांवरील माझे अधिकचे लेखन वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या youtube channel ला भेट द्या.
ब्लॉगची लिंक- Drrahulrajani.com
Youtube channel ची लिंक – https://www.youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw)