Dr. Rahul Rajani

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

मृत्यूपूढे माणूस हतबल आहे!😢😢

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ६ तारखेला माझे आजोबा (आईचे वडील) वारले. आज माझी आजी (आईची आई) त्यांच्या पाठोपाठ गेली. साधारणतः ८६ वय होते. माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य हे गरिबी, कर्जबाजारीपणात व

काबाडकष्ट करण्यात गेले. आता २-३ वर्षांपासून थोडे बरे दिवस आले होते. एक नातू डॉक्टर झाल्याने आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती.

माझ्या आजीचा १९३६ च्या आसपासचा जन्म असला तरी ती शिकलेली होती. तिला चांगले वाचता-लिहिता येत होते. तिच्या बालपणीच्या असंख्य कविता तिच्या अजूनही पाठ होत्या. त्याव्यतिरिक्त ओव्या, बालगीते, अंगाईगीते, म्हणी यांचा खूप मोठा खजिना तिच्यापाशी होता. आता मागच्या एक दोन वर्षात थोडे विस्मरण होऊ लागल्याने पूर्ण आठवत नव्हत्या, एवढेच.

अतिशय मुद्देसूदपणे ती युक्तिवाद करू शकायची. ती ग्रामीण भागात राहूनही गावंढळ राहिली नाही. तिला स्वच्छता आवडायची. तिचा रंग खूप गोरा होता.दिसायला सुंदर होती. ती मराठी खूप सुंदर बोलायची. माहेरी शिक्षणाचा वारसा असल्याने तो प्रभाव तिच्यावर होता. माहेरच्या सर्वांचे तिला खूप कौतुक होते. ती नेहमी सर्वांच्या आठवणी काढत राहायची.

माझ्या आजीचे संपूर्ण आयुष्य शेतकरी कुटुंबात गेले. माझे आजोबा हे एकटे भाऊ. त्यांना एक बहीण होती. त्यांची आई लहानपणीच वारलेली होती. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नाही. माझ्या आजोबांचे लग्न झाल्यावर माझ्या आजीने कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळली. त्यांना ४ मुली व २ मुले झाली. एवढ्या मोठ्या कुटुंबाचे आवरताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. त्यात गरिबी, कर्जबाजारीपणा, शेतातील कष्ट. त्यात पुन्हा माझे आजोबा महानुभाव पंथाचे असल्याने त्यांचा परोपकारी स्वभाव.

माझ्या आजोबांची शेती गावाला, गावाच्या स्टँडला लागून मुख्य रस्त्यावर असल्याने कुणीही तहान-भुकेने व्याकुळलेला व्यक्ती दिसला की आजोबा घरी घेऊन यायचे. मग चहापाणी किंवा जेवण वगैरे आजीला करावे लागायचे. हे सततचे होते. त्यामुळे आजीची कधीकधी चिडचिडही व्हायची. माझ्या आजीने तिच्या उभ्या आयुष्यात कधी कुणाला शिवी किंवा अपशब्द वापरला नाही. ती स्वभावाने अतिशय गरीब पण हुशार अशी स्त्री होती. असे असले तरी ती बोलायला परखड होती.

तसे तिच्या आयुष्यात खूप दुःख होते. दोन मुली लग्न करून वारल्या. त्यापैकी एक मुलगी ४ महिन्याच्या मुलाला टाकून गेली. महेंद्र त्याचे नाव. त्याचे संपूर्ण पालनपोषण माझ्या आजी-आजोबांनी, मामा-मामीने केले. आता तो शिक्षक आहे.

ती माझ्या मावशींच्या मुलींच्या आठवणी सांगायची, तेव्हा एका डोळ्याला दोन दोन धारा लागायच्या. माझ्या लहान मामांचे १९९८ साली लग्न झाले आणि आठच दिवसात ते विहिरीत पडले. त्यानंतर जवळपास दोन वर्षे ते खाटेवर होते. त्यांचे सर्व तिला खाटेवरच करावे लागले. अशी असंख्य दुःखे पचवत ती जगत राहिली.

तिचे जेव्हा लग्न झाले, तेव्हा तिच्या माहेरची परिस्थिती तशी जेमतेमच होती. पण त्यानंतर तिचे भाऊ खूप कर्तृत्ववान निघाले. भडगाव जिल्ह्यातील नेरी, कजगाव या परिसरात तिचे मोठे भाऊ बापूजी हे केळीचे मोठे व्यापारी म्हणून पुढे आले. एक भाऊ बँकेत नोकरीला लागले. त्यांची पत्नी शिक्षिका, पुढे मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. त्यांची परिस्थिती पूर्णतः सुधारली. त्यांचा तिला खूप अभिमान वाटायचा.

त्यांच्यासारखे आपला व आपल्या मुला-मुलींचाही संसार सुधारावा, त्यांनी शिकून नोकरीला लागावे, असे तिला वाटायचे. पण तिची ती इच्छा पहिल्या पिढीत पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही मात्र तिचे स्वप्न साकार केले. आज मी सहाय्यक प्राध्यापक आहे. माझा एक मावसभाऊ महेंद्र हा (ज्याची आई वारलेली आहे) शिक्षक असून सुरतच्या मावशीचा मोठा मुलगा नितीन (विकी) एम.एस्सी. स्टॅटिटिक्स करून आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगारावर कार्यरत आहे. त्याचा लहान भाऊ किरण (कोमल) जे.जे.सारख्या महाविद्यालयात एमबीबीएस करतोय. आमचा एक मामेभाऊ चंद्रशेखर (गणू) बीएचएमएस करून कोकणात चांगली प्रॅक्टिस करतोय. इतरही काहीना काही चांगले करत आहेत. थोडक्यात, अलीकडच्या काही वर्षांत तिला बऱ्यापैकी समाधान लाभत होते.

तिला नेहमी सर्वांची काळजी असायची. मुलं-मुली, सुना, नातवंडे, पणतू, भाऊ-भावजया सर्वांवर ती खूप प्रेम करायची. यांच्यापैकी एकजण जरी भेटलं तरी ती सर्वांची खूप आपुलकीने विचारपूस करायची. सर्वांच्या आठवणींना उजाळा द्यायची.

माझे आईवडील मुंबईला राहायला असल्याने माझ्या बालपणीची ७-८ वर्षे तिच्याकडेच गेले. त्यामुळे तिचा सहवास, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी मला खूप समरसून अनुभवता आल्या. मी नोकरीला गावापासून लांब असल्याने अलीकडे ८-१० वर्षात तिची भेट दिवाळी-आखाजीलाच जास्त व्हायची. पण गेल्या दोन वर्षात ती खाटेला खिळलेली होती. ती काही महिन्यांची किंवा वर्षांची सोबती आहे, असे मला तीव्रतेने वाटायचे. म्हणून मी गेल्या दोन वर्षात कोरोना असूनही गावाकडील फेऱ्या वाढवल्या होत्या. प्रत्येक वेळी वाटायचे की, ही शेवटची भेट असावी. म्हणून दरवेळी रडत-रडतच तिचा व आजोबांचा निरोप घ्यायचो. ती मात्र ‘आते कवय ईशी भाऊ दादा भेटाले’ असे विचारायची. मी तिला ‘लवकरच’ असे उत्तर द्यायचो.

दीड वर्षांपूर्वी मी तिला व माझ्या आजोबांना माझ्या गाडीत बसवून माझा नवीन फ्लॅट बघण्यासाठी नाशिकला घेऊन आलो होतो. त्यानंतर गावी परत सोडूनही आलो होतो. त्यांना खूप आनंद झाला होता.

पण गेल्या दोन-तीन महिन्यात मात्र तिची तब्बेत जास्त ढासळत गेली. दोन महिन्यांपूर्वी माझे आजोबा वारले, तेव्हा तिला आपला नवरा वारलेला आहे, याची जाणीवही होत नव्हती. तेव्हाच आम्हाला कळून चुकले होते की, आता ती जास्त दिवस टिकणार नाही. मागच्या १५ दिवसांपूर्वी तिला सतत २-३ दिवस संडास होत होते. तेव्हा मी व महेंद्र आम्ही तिला भेटून आलो. मी तिचा हात हातात घेतला. काहीच बोललो नाही. तिने स्वतःच डोळे उघडले व ‘दादा’ एवढेच बोलली. नंतर डोळेच उघडले नाहीत. महेंद्रमध्ये तिचा एवढा जीव असूनही तिने त्याला ओळखले नाही. आम्ही जवळपास २० तास सोबत होतो. तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती आमच्याशी बोलली नाही. मग आम्ही डॉक्टरांना बोलवून तीन सलाईन लावल्या. तेव्हा तिची हगवण थांबली. पण तिची जास्त दिवस जगण्याची शक्यता मावळल्याचे आमच्या लक्षात आले. भरलेल्या गळ्याने व जड अंत:करणाने आम्ही तिचा जिवंतपणी शेवटचा निरोप घेतला.

त्यानंतर दररोज फोन करून तब्बेत विचारणे सुरू होते. शेवटी आज पावणे तीनच्या सुमारास तिने शेवटचा श्वास घेतला. आता तिची अगदी शेवटची भेट घ्यायला जाणार आहे! अगदी शेवटची! त्यानंतर ती आम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही.

मृत्यूपुढे माणूस हतबल आहे!😢😢

Exit mobile version