Dr. Rahul Rajani

   ‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

          ‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.

          बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी

जंगलात मिळाला होता. तेव्हापासून ससा त्याचा दोस्त झाला होता. या सशाशिवाय त्याला करमायचे नाही. तो सशाला रंगीत कागद, कापडाचे तुकडे गळ्यात-पायात घुंगरू बांधून सजवायचा. त्याने त्याच्या गळ्यात एक दोरी बांधलेली होती. गावातील मुलं त्याच्या भोळसटपणाचा फायदा घेऊन त्याची गंमत घ्यायचे. त्याच्या कमरेला दोरी बांधून त्याला नाचवायचे. बाब्या कधीही कुणालाही विरोध करायचा नाही. त्याला कुणीही काहीही बोलले तरी तो फक्त हसायचा.

          त्याची ही अवस्था पाहून त्याच्या आईला खूप वाईट वाटायचे. आपल्या चुकीमुळे आपल्या मुलाची अशी अवस्था झाली, म्हणून ती स्वतःला दोष देत पश्चाताप करायची. पण आता काहीही इलाज नव्हता. बाब्यामुळे गावातील लोकांची चांगली करमणूक, मनोरंजन व्हायचे. तो एखाद्या हॉटेलसमोरून गेला, थांबला तरी हॉटेलवाले त्याला भजी वगैरे खायला द्यायचे.

          बाब्याच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती गरिबीची होती. त्याचे वडील रोजंदारीने कामाला जायचे. त्याला तीन-चार भावंडे होती. त्याला दोन बहिणी होत्या.

          एकदा त्या गावांमध्ये सर्कस येते. सर्कसीत हत्ती, घोडा, सिंह, वाघ इत्यादी प्राणी आलेले असतात. बाब्या व इतर मुलांना ते दिसते. बाब्या घरी आल्यावर सर्कशीच्या आवाजाच्या दिशेने बोट दाखवून ‘हूं हूं’  आवाज काढत सर्कस बघायला जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा त्याचे वडील त्याला व त्याच्या भावंडांना त्याच्या आईसह सर्कस बघायला पाठवतात. सर्कशीत हत्ती, घोडा, वाघ, झुलणाऱ्या मुली यांच्या कवायती होतात. दोन बुटक्यांच्या गंमती होतात. नंतरचे खेळ दाखवण्यासाठी काही साहित्य स्टेजवर आणले जात होते. तेवढ्यात बाब्या रिंगणीच्या दोऱ्या  बाजूला सारून सशाला घेऊन रिंगणात जातो. तिथे जाऊन तो उड्या मारू लागतो. दात विचकून हसू लागतो. हसता-हसता नाचत राहतो. त्याची ही गंमत बघून गावकरी सर्कशीतला पैलवान व इतर लोक पोट धरून हसतात. त्याच्या आईलाही त्याचे कौतुक वाटते. थोड्या वेळाने सर्कशीतील पैलवानाला बघून घाबरून तो जागेवर येऊन बसतो.

          बाब्या सर्कशीत नाचल्याची दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावभर चर्चा होते. सर्वजण त्याचे कौतुक करतात. बाब्याचे वडीलही कौतुकाने हसतात.

दुसर्‍या दिवशी सर्कशीचा मालक बाब्याच्या घरी येऊन बाब्याला सर्कशीत काम करण्यासाठी पाठवायला सांगतो. त्याला खाऊन-पिऊन २५ रुपये महिना देऊ, त्याची पोटच्या मुलासारखी काळजी घेऊ, असे सांगतो. बाब्याच्या आई-वडिलांपुढे प्रश्न उभा राहतो की, अशा मंदबुद्धी मुलाला अनोळखी लोकांसोबत कसे पाठवायचे. पण ते विचार करतात की, हा मुलगा असा कमी डोक्याचा, याला नीट बोलता येत नाही. पुढे मोठा झाल्यावर हा काय करेल. हा गावात पण व्यवस्थित राहत नाही. विहिरीवर, नदीवर, मोटारींपुढे जातो. याला आपण कुठे-कुठे सांभाळायचे. त्यापेक्षा सर्कशीत गेल्यावर याला काहीतरी शिस्त तरी लागेल, दोन नवीन गोष्टी शिकेल, आपल्यालाही पैसे मिळतील. असा विचार करून ते संध्याकाळी सर्कशीच्या मालकाला भेटून त्याला सर्कशीत पाठवायला होकार देतात.

          दुसर्‍या दिवसापासून बाब्या सर्कशीत जाऊ लागतो. सर्कशीचा मालक या गोष्टीची लाऊडस्पिकरवरून चांगली जाहिरात करतो. बाब्याची गंमत बघायला आधी पूर्ण गाव नंतर शेजारच्या गावातील लोकं तिकीट खिडकीवर गर्दी करू लागतात. मालकाला त्याचा खूप फायदा होतो. बाब्याला वानरासारखे सजवले जाते. त्याच्या सशालाही कपडे घातले जातात. तो लोकांचे खूप मनोरंजन करतो. त्याच्या खेळाला तूफान गर्दी येत असल्यामुळे मालक दुसर्‍या दिवसापासून खेळांची संख्या वाढवतो. सर्कशीचा त्या गावातील मुक्कामही वाढवतो. 

          रात्रीच्या खेळानंतर सकाळी मात्र सर्कशीतले इतर लोक बाब्याला झाडझूड, लिद गोळा करणे, त्याच्या पाट्या डोक्यावरून वाहणे इत्यादी कामे करायला लावतात. बाब्याकडून ते टोपलं सांभाळले जात नाही. अंगावरचे लिदचे टोपले घेऊन तो खाली पडतो. त्याचे पूर्ण अंग लिदने भरते.

असाच काही दिवस बाब्या सर्कशीत काम करत राहतो.

          एके दिवशी खेळ आटोपल्यावर सर्वजण झोपायच्या तयारीला लागतात. पण बाब्याला त्याचा ससा दिसत नाही. तो सशीसाठी अस्वस्थ होतो. त्याला सर्कशीत इकडे-तिकडे शोधत राहतो. त्याला तो हत्तीच्या पायाखाली मेलेला सापडतो. बाब्याला खूप दुःख होते. तो हुंदके देऊन रडू लागतो. मेलेल्या सशाला घेऊन रडतो व घरी येतो. दुसर्‍या दिवशी मालक परत त्याला घ्यायला पाठवतो. त्याची इच्छा नसतानाही त्याला सर्कशीत नेतात. त्या दिवशी त्याच्यासोबत सशाऐवजी वानर पाठवतात. वानर त्याचे तोंड ओरबाडून घेतो. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते. मालक त्याच्या आई-वडिलांची माफी मागतो.

          अशा प्रकारे पंधरा दिवस झाल्यावर सर्कशीत येणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागते. मग मालक ते गाव सोडण्याचा निर्णय घेतो. तो सर्व आवरून गाड्यांमध्ये भरून जायला निघतो. मात्र बाब्याला सोबत घेऊन जात नाही. तेव्हा बाब्याचा बाप त्या मालकाला तुम्ही माझ्या मुलाला सर्कशीत भरती करणार होतात. मग त्याला घेऊन का जात नाहीत? असे विचारतो. तेव्हा मालक त्याला “तुह्या पोराचं सर्कशीतलं कौतुक तुह्या गावापुरतं, तुह्य गाव व्हतं म्हून लोकंबी कौतुकानं येत होते. परक्या गावात त्याले कोण विचारते? त्याले तं धड बोलताही येत नाही. भुईले भार आनं खाले भारी”, असे उत्तर देतो. मालक बाब्याच्या बापाला पाच दिवसाच्या कामाचे फक्त ५ रुपये देतो. बाब्याचा बाप त्याला तुम्ही माझ्या मुलाच्या भरोशावर हजारो रुपये कमावले आणि मला फक्त पाच रुपये देता का? पूर्ण महिन्याचा पगार द्यावा लागेल, असे सांगतो. तेव्हा मालक त्याला “ऐ भडव्या, कोनाले सांगतं बे? नखरे करसीन तं जिता वाघापुढं टाकन. समजला काय? बारा गावचं पानी पेल्लो म्हन्लं”, अशी धमकी देतो. त्यासोबत त्याच्या सर्कशीतला पैलवान व इतर पाच-सात गडी त्याच्या बाजूला येऊन उभे राहतात. म्हणून घाबरून बाब्याचा बाप माघार घेतो व घरी आल्यावर मुलावरच संताप काढतो.

          ससा मेल्यामुळे त्यानंतर बाब्या एकटा पडतो. त्यांच्यातील चैतन्य मावळून तो उदास दिसू लागतो. तो नेहमी काहीतरी शोधत रस्त्यावरुन फिरत राहतो.

          अशा रीतीने ‘ससा आणि सर्कस’ या कथेतून एका मंदबुद्धी मुलाचे विश्व साकारलेले आहे. मंदबुद्धीच्यासोबत त्याच्या आईबापाचे दारिद्र्यही त्याच्या दुःखात भर घालते. दारिद्र्यामुळेच त्याचे आई-वडील त्याच्यावर योग्य उपचार न घेता त्याला उलट सर्कशीत काम करायला पाठवतात व त्याच्या कामातून दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा बाळगतात. बाब्या जरी वेडपट व मंदबुद्धी असला तरी त्याला मन होतं, भावना होत्या, सशाबद्दल प्रेम होतं, त्याच्या सहवासाची आस होती. सशाच्या मृत्यूने त्याचे जीवन नैराश्यमय होऊन जाते.

          दुसरीकडे सर्कशीचा मालक बाब्याचा त्याच्या स्वार्थासाठी वापर करून घेतो. त्याला बाबाच्या बापाला दिलेल्या आश्वासनाशी काहीही देणे-घेणे नसते. पंधरा दिवस बाब्याला सर्कशीत काम देऊन तो त्याच्या जोरावर हजार रुपये कमावून त्याच्या वडिलांना त्या बदल्यात फक्त ५ रुपये मोबदला देऊन त्याची बोळवण करतो. यावरून हा सर्कशीचा मालक शोषक प्रवृत्तीचा असल्याचे दाखवले आहे.

          या कथेत बाब्या, त्याची आई, वडील, पैलवान, सर्कशीचा मालक इत्यादी पात्रे आहेत. त्यापैकी बाब्या हे मुख्य पात्र असून इतर गौण पात्र आहेत. ह्या कथेचे निवेदन मराठीतून तर संवाद नागपुरी बोलीतून आहे. बाब्याचे दुःख, त्याचा निरागसपणा, त्याच्या आई-वडिलांचे त्याच्याबद्दलचे प्रेम, मालकाचा स्वार्थीपणा इ. गोष्टी निवेदन व संवादातून लेखकाने समर्थपणे साकारलेल्या आहेत.

Exit mobile version