Dr. Rahul Rajani

सहजीवनाची १० वर्षे

आज माझ्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे कशी निघून गेली, फुलपाखरासारखी उडून गेली, ते कळलंही नाही. १० वर्षात खूप बदलले, माझ्या जगण्यातही खूप बदल झाले. हळूहळू प्रगतीची एक एक पायरी चढत गेलो. सुखी जीवनासाठी जे-जे हवे असते, ते सर्व मिळत गेले. यात अर्थातच माझ्या सर्व कुटुंबाची साथ मोलाची आहे.
१० वर्षांपूर्वी अतिशय गरिबीत माझ्या संसाराची सुरुवात झाली. लग्न झाले तेव्हा मी फेलोशिपवर (JRF) होतो. दीड वर्षानंतर नोकरी मिळाली. मग आम्ही जव्हारला म्हणजे नोकरीच्या ठिकाणी राहायला गेलो. नोकरी तर मिळाली परंतु एका तांत्रिक कारणामुळे पहिले पाऊणे तीन वर्षे पगार सुरू झाला नाही. नंतर मात्र सर्व सुरळीत सुरू झाले.
या सर्व संघर्षाच्या काळात गरिबीचा कोणताही अनुभव व सवय नसताना माझ्या पत्नीने- वैशूने मला मोलाची साथ दिली. म्हणून मीही मानसिकरित्या स्थिर राहू शकलो व माझ्या करियरमध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती साधू शकलो.

याप्रसंगी एक गोष्ट सांगायला पाहिजे- वैशूसोबत माझे लग्न ठरत असताना माझ्या आईजवळ एका पुरोहिताने “यांची भांडणं होतील, यांचे जमणार नाही. सहा महिन्यात लग्न मोडणार किंवा टिकलेच तर मग मुलबाळ होणार नाही”, असे भविष्य वर्तविले होते. पण मी ठाम राहिलो व वैशूशीच लग्न केले. आज १० वर्षे पूर्ण झालीत, परंतु एकदाही आमचे कडाक्याचे भांडण झाले नाही. मला २ गोंडस मुले आहेत. आमचा अगदी सुखा-समाधानाने, एकमेकांना समजून घेत, एकमेकांना त्यांचा अवकाश देत संसार सुरू आहे. यावरून मला एवढंच सांगायचं आहे की, तुम्हाला जी व्यक्ती आवडली असेल, तिला असं कुणाच्या सांगण्यावरून सोडू नका.

आज या प्रसंगी मी तिच्यावर ३-४ वर्षांपूर्वी लिहिलेली एक कविता इथे टाकत आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल.

ती माझ्या मनात
घर करून गेली
मनाचा कोपरान् कोपरा
उजळून गेली …१…

तिचं भोवती असणं
हवंहवंसं वाटायचं
तिचं नसणं
असह्य करून जायचं
हळूहळू माझ्या मनात
ती ‘मोठी’ होत गेली …२…

ती हसायची
तिचे डोळेही हसायचे
ओठावरले हसू
खूप सांगून जायचे
तिला पाहूनच माझी
शुद्ध हरपून गेली …३…

ती होती, तिचे
एक अस्तित्व होते
उंच उंच शिखरं
तिच्यापुढे झुकत होते
जगायचे कसे, ती
मला शिकवून गेली …४…

जीवनात माझ्या आली
जीवनच बनून गेली
दोन फुलं हातावर
हळूच ठेवून गेली
प्रेमाची भेट मला
अशी देऊन गेली …५…

आता मी माझा
राहिलोच नाही
तीही अशीच स्वतःला
विसरून जाई
माझ्या सुखदु:खांची
ती सावली बनून गेली …६…

आता नको काहीही
तिजवाचून मला
सहवास लाभो तिचा
असाच क्षणाक्षणाला
तिच्याशिवाय जगण्याची
कल्पनाही करवत नाही …७…

कविता अशी माझी ही
सुरू कोठून झाली
कसे सुचले शब्द
शब्दांना अर्थ येई
एकेक शब्द माझा
धन्यवाद तिला देई …८…

(१४/१०/२०१६)

या काळात आम्हा दोघांना साथ दिल्याबद्दल सर्व कुटुंबियांचा, नातेवाईकांचा, मित्र परिवाराचा व समाजाचाही मी खूप आभारी आहे. सर्वांशिवाय जगण्याला अर्थ तरी कुठे आहे! 🙏🙏

Exit mobile version