मानवजातीची आज जी प्रगती घडून आलेली आहे. ती काही अचानक व एका रात्रीत घडून आलेली नाही. गेल्या लाखो वर्षात हळूहळू एक एक टप्पा गाठत, पायर्या चढत माणूस आज इथवर येऊन पोहचलेला आहे. त्याच्या या विकासामध्ये अनेक शोध कारणीभूत ठरलेले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या शोधांची ओळख आपणास करून देणार आहे. आजचे हे मानवी जग कसे घडलेले आहे, तयार झालेले आहे, हे आपणास कळावे. हा उद्देश या लेखनामागे आहे.
आजच्या या लेखात मी आपणाला मानवाच्या विकासामध्ये अतिशय क्रांतिकारक ठरलेल्या भाषेच्या शोधाविषयी सांगणार आहे.
भाषेचा शोध:
भाषेच्या शोधाने मानवजातीला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले. या शोधात मानवाला कोणत्याही शरीरबाह्य भौतिक गोष्टींची मदत घ्यावी लागली नाही. मानवप्राण्याच्या बुद्धीत हळूहळू होत गेलेले विकास, त्याचवेळेत त्याच्या नाक, कान, घसा, कंठ, जीभ, दातांची रचना इ. (वागिंद्रियांमध्ये) अवयवांमध्ये झालेले बदल व हळूहळू होत गेलेल्या उत्क्रांतीमुळे भाषेची निर्मिती व्हायला मदत झाली.
निसर्गातील प्राणी, पक्षी, इतर सजीव, निर्जीव घटक यांच्या आवाज व ध्वनीच्या निरीक्षणातून व नंतर अनुकरणातून मनुष्य
एकापेक्षा अनेक ध्वनी निर्माण करू लागला. त्या ध्वनींचे तो वर्गीकरण करू लागला. म्हणजे एक ध्वनी हा दुसर्यापासून वेगळा आहे हे त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. ध्वनींची अर्थपूर्ण जुळणी करून तो त्याच्या आजूबाजूच्या वस्तू, प्राणी, पदार्थ व वनस्पतींचा विविध शब्दाने निर्देश करू लागला. त्यांच्यासाठी विविध शब्द निर्माण करून ते वापरू लागला. असे अनेक शब्द निर्माण झाले, त्यापैकी काही रूढ झाले. तर अनेक काळाच्या ओघात मागे पडले.
या शब्दांच्या विशिष्ट जुळणीतून तो वाक्यरचना करायला लागला. अशा पद्धतीने काही लाख वर्षाच्या वाटचालीत माणसाने भाषा आत्मसात केली व त्या भाषेचा विकास घडवून आणला. जगाच्या वेगवेगळ्या भूप्रदेशात अशा पद्धतीने स्वतंत्रपणे असंख्य भाषा निर्माण झाल्या. उत्क्रांतीतत्त्वामुळे माणसाच्या वागिंद्रियांमध्ये भाषानिर्मितीला अनुरूप बदल घडून आले, ही गोष्ट खरी असली तरी भाषा मात्र खास माणसाने त्याच्या बौद्धिक सामर्थ्याने शोधून काढलेल्या आहेत.
भाषांचा वैज्ञानिक दृष्टीकोणातून अभ्यास व्हायच्या आधी सर्व भाषा या देवाने निर्माण केलेल्या आहेत, असा समज सार्वत्रिक होता. त्या संदर्भातील दंतकथाही प्रचलित होत्या (“उत्तुंग मनोरा बांधून थेट स्वर्गारोहण करण्याच्या संघटित मानवी प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी, त्यांच्यात बेबनाव होण्यासाठी परमेश्वरानेच परस्परांना अनाकलनीय अशा विविध भाषा निर्माण केल्या.”- भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, जून २०१७, पृ. ५१). मात्र अभ्यासकांनी, भाषावैज्ञानिकांनी वरील प्रक्रिया लक्षात आणून दिल्यावर जगातील सर्व भाषा या देवाने निर्माण केल्या आहेत, हा समज मागे पडला.
याच भाषेतून तो आपल्या मनात आलेल्या भावना व विचार यांनाही शब्दबद्ध करू लागला. यातूनच माणसामाणसांमध्ये नातेसंबंध तयार होऊन ते घट्ट झाले. याच भाषेतून तो कविता, गाणी, गोष्टी व इतर साहित्याची मौखिक स्वरुपात रचना करू लागला. व्यावहारिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वरुपाच्या संकल्पना व ज्ञानाची निर्मिती करत राहिला. यातूनच पुढे कुटुंब, विवाह, राज्य, विविध संस्था उभ्या राहिल्या. म्हणूनच भाषेचा शोध हा मानवी इतिहासाला कलाटणी देणारा सर्वात महत्त्वाचा व क्रांतिकारक असा शोध ठरतो.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113