कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर
(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)
मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.
विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी
साहित्यातील ज्ञानसूर्य’, ‘मराठी साहित्यातील एक तपस्वी’, ‘ज्ञानतपस्वी’, ‘भारतीय साहित्यातील महामेरू’, ‘विश्वाला गवसणी घालणारा साहित्यमहर्षी’ इ. विशेषणे वापरून त्यांचा गौरव केला, त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विंदा करंदीकर यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी धालवल (ता. देवगड, जिल्हा रत्नागिरी – सध्याचा सिंधुदुर्ग) या गावी झाला. त्याचे मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. काव्यलेखनासाठी त्यांनी विंदा करंदीकर हे टोपण नाव धारण केले व नंतर त्याच नावाने ते साहित्यविश्वात ओळखले जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुर्ल्याच्या सरकारी शाळेत, माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या न्यू स्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्याच राजाराम महाविद्यालयात तर बी.ए. आणि एम.ए.ची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली. करंदीकरांनी अर्थार्जनासाठी प्राध्यापकीय व्यवसाय स्वीकारत मुख्यतः रूइया महाविद्यालय (माटुंगा) व एस.आय.इ.एस.महाविद्यालय (शीव), मुंबई येथे इंग्रजीचे अध्यापन कार्य केले.
पूर्णवेळ साहित्यलेखनासाठी त्यांनी १९७६ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
विंदा करंदीकरांचा सुरूवातीच्या काळात सामाजिक, राजकीय विचारांशी, चळवळींशी संबंध आला होता. प्रारंभी सावकरवादी असलेले विंदा नतंर मार्क्सच्या साम्यवादी विचारांकडे आकृष्ट झाले. गांधीजींच्या विचारांचाही काही प्रमाणात त्यांच्यावर प्रभाव होता. १९४२ चे चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात त्यांचा सहभाग होता. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता.
कविता हे करंदीकरांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. त्यांनी पहिली कविता १९३६ साली लिहिली. त्यांचा ‘स्वेदगंगा’ हा पहिला कवितासंग्रह १९४९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘मृदगंध’ (१९५४), ‘धृपद’ (१९५९), ‘जातक’ (१९६८) ‘विरूपिका’ (१९८१), ‘अष्टदर्शने’ (२००३) इ. कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘संहिता’ (सं. मंगेश पाडगावकर- १९७५), ‘आदिमाया’ (सं. विजया राजाध्यक्ष- १९९०) हे त्यांचे निवडक कवितांचे संपादित संग्रह. या व्यतिरिक्त त्यांचे १२ बालकवितासंग्रहही प्रकाशित झालेले आहेत.
विंदांच्या कवितेची जडणघडण मराठीतील केशवसुत, माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर तर इंग्रजीतील इलियट, हॉपकिन्स, ब्राऊनिंग यासारख्या कवींच्या संस्कारातून झालेली आहे. सोबतच फ्राईड व मार्क्स (वर सांगितल्याप्रमाणे) या विचारवंतांच्या विचारांचा संस्कारही त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वावर झालेला होता. त्यांची प्रारंभीची कविता सामाजिक, मार्क्सवादी आहे. असे असूनही विंदांनी कोणत्याही विचारसारणीला बांधून घेऊन आपली जाणीव मर्यादित करून घेतली नाही. कोणाच्याही कवितेचे, आशयाचे, विचारांचे, अभिव्यक्तीचे, शैलीचे अनुकरण केले नाही. या सर्वांचे प्रभाव, संस्कार पचवून त्यांनी स्वतःचे ‘मी’पण, ‘स्व’त्व जपले. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
विंदा करंदीकरांची ‘क्षेत्रज्ञ’ ही एक कविता आहे. क्षेत्र, क्षेत्रज्ञ हे शब्द गीतेतले आहेत. ‘क्षेत्रज्ञ’ म्हणजे
जीवन जाणून घेणारा आणि ‘क्षेत्र’ म्हणजे संपूर्ण जीवन. विंदांची कविता वाचताना, ती समजून घेताना, तिचा अभ्यास करताना वाचकांची अशीच अवस्था होते. मानवी जीवनाच्या जवळ- जवळ सगळ्या अंगांना विंदांनी आपल्या कवितेतून साकार केलेले आहे. त्यामुळे त्यांची कविता वाचणे म्हणजे संपूर्ण मानवी जीवन समजून घेणे असेच आहे. शोषण, शोषणावर उभा असलेला समाज, वेगवेगळ्या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून त्यांची दुःखे, अगतिकता, लाचारी, त्यांची होरपळ (धोंड्या न्हावी, कावेरी डोंगरे, बकी, यशोदा देशपांडे), आधुनिक समाजाची दिशाहीनता, निरर्थकता, प्रेमभावना, त्याच्या विविध छटा, इंद्रियनिष्ठ शारीर अनुभव, क्रांतीची अपरिहार्यता, आशावाद, काही कवितांतून अटळ हिंसा तर काही कवितांतून शांततेची – अहिंसेची आवश्यकता, समर्थन, आत्मतत्वाच्या साक्षात्काराची ओढ, असे मानवी जीवनाचे, समाजाचे वेगवेगळे पैलू त्यांनी कवितेतून शब्दांकित केले.
विंदांची कविता एकाच वेळेस भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळात संचार करते. शोषणाचे चित्रण करतांना ती त्याचा इतिहासही शोधते आणि
“पिरॅमिडच्या दगडाखाली
माझी छाती पिचली होती”;
“चीनच्या त्या भिंतीवरती
बुरुजागणिक भूत आहे.”
(दातापासून दाताकडे, पृ.१०४)
या पंक्तीतून ते इजिप्शियन संस्कृती व चीनची प्राचीन भिंत हे भूतकाळातील ऐतिहासिक संदर्भ देतात. भारतीय संस्कृतीत याचा शोध घेताना ते ‘चिंधी’ या कवितेत (चिंधी- दु:खाचे प्रतिक)
‘चिंधी होती कृष्णाआधी ;
चिंधी उरली कृष्णेनंतर’ (चिंधी, ११७)
ते अशा प्रकारे दुःखाचा, शोषणाचा इतिहास उभा करतात. वर्तमानातील अनेक संदर्भातून ते ही व्यवस्था उभी करतात.
भविष्यातील आशावाद ते
‘लाल धूळ उडते आज;
याच्या मागून येईल स्वार’
(माझ्या मना बन दगड पृ. ६०),
या व इतर कवितांतून व्यक्त करतात.
चिंतनशीलता हे करंदीकरांच्या कवितेचे महत्वाचे वैशिष्टय आहे. इतिहास, विज्ञान, बुद्धिनिष्ठ भूमिका, साम्यवाद यातून त्यांची चिंतनशील दृष्टी दिसून येते. संदर्भबहुलता हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय. रामायण, महाभारत, भारतीय-पाश्चात्यांचा इतिहास, तेथील पुराणे, ग्रीक साहित्य, त्यांच्यातील कथांचा, प्रतिकांचा समर्पक व योग्य वापर ते आपल्या कवितांतून करतात. मानवी जीवनातील कोणताही अनुभव त्यांना कवितेसाठी वर्ज्य नाही. जीवनाविषयी अनिवार निष्ठा त्यांच्या कवितेतून दिसून येते. ते जसे शोषणाचा इतिहास उभा करतात, तसेच ते प्रेमभावनेचे चित्रण करतात. अध्यात्म व विज्ञान, अध्यात्म व शुद्ध शारीर अनुभव यातील भिंतीही ते नाहीशा करतात. करंदीकरांनी आपल्या स्वतःच्या कवितेचे
१) सामाजिक जाणिवेचे क्षेत्र
२) लैंगिक जाणिवेचे क्षेत्र
३) व्यक्तिदर्शनाचे क्षेत्र
४) चिंतनात्मक जाणिवेचे क्षेत्र
असे वर्गीकरण केलेले आहे. मात्र ही क्षेत्रे परस्परांपासून वेगळी व अलग नाहीत. यांच्या एकत्रीकरणातून, एकरूपतेतून, परस्परानुप्रवेशातून त्यांची कविता आकार घेते.
‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशा’त करंदीकरांच्या काव्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितले आहे. ‘करंदीकरांच्या काव्यात व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे तसेच पार्थिवापासून अपार्थिवापर्यंतचे व्यापक अनुभव क्षेत्र सामावले आहे. पार्थिवतेचे आकर्षण, सामाजिक भान, विज्ञाननिष्ठ आणि अध्यात्मिक कुतूहल यांचा संगम त्यांच्या काव्यात आहे. चिंतनशील पिंडामुळे विश्वरहस्याचा शोध हेही त्यांच्या काव्यातील एक केंद्रवर्ती सूत्र आहे.’
अशा प्रकारे संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेणारी, जीवनाच्या सर्व मूर्त – अमूर्त विचारांना, तत्वांना स्थान देणारी, मूल्ल्यांचा आग्रह धरणारी, समतेवर आधारित समाजरचना स्थापन करू पाहणारी विंदांची कविता अनेक स्थित्यंतरांतून घडत गेली. त्यातून तिने आशयाची नवी क्षेत्रे शोधली, नवीन सूत्रे दिले. या सर्वंकष आशयाला अभिव्यक्त करण्यासाठी त्यांनी अविष्काराची अभिव्यक्तीचीही नवी रूपे शोधली. तालचित्रे, मुक्तसुनीते, विरूपिका, स्वच्छंद ही नवीन आकृतीबंध तसेच ‘गझल’, (आततायी) अभंग’, ‘सूक्ते’ या पारंपरिक नव्या-जुन्या प्रकारांचा वापर त्यांनी काव्यात केला. भाषेचे, शैलीचे अभिव्यक्तीचे नवनवीन प्रयोग केले. ‘प्रयोगासाठी प्रयोग’ न करता आशयाला व्यक्त होताना जाणवणाऱ्या अपरिहार्यतेतून त्यांनी अभिव्यक्तीच्या रूपांचा वापर केला. अक्षर, मात्रा, ओळी यांचे बंधन स्वीकारले नाही. सहजता, स्वाभाविकता हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्टय सांगता येईल.
वरील कवितांव्यतिरिक्त करंदीकरांनी बालकविताही लिहिल्या. त्यांचे एकूण १२ बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. बालकविता हा काव्यप्रकार म्हणून जाणिवपूर्वक हाताळणारे ते मराठीतले पहिलेच कवी. मराठी बालकवितेचा पायाच जणू त्यांनी घातला. बालकविता अनेकांनी लिहिल्या, मात्र करंदीकरांच्या बालकवितेत लहान मुलांपासून बारा वर्षाचे किशोरवयीन मूलं, त्यांचे मित्र व नातेवाईक, त्यांची घरे, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांचा निरागसपणा इ. अनेक बाबी येतात.
‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशात त्यांच्या बालकवितांचे स्वरूप सांगितले आहे. ते असे ‘करंदीकरांच्या बालकविताही पारंपरिक बालगीतांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांत आघातयुक्त छंदाचा वापर असून नाद आणि अर्थ यांची गंमतशीर गुंफण केली आहे. बालकांच्या भावविश्वाशी समरसता, नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती यांच्यासोबतच अभिजात आणि प्रसन्न विनोद या बालकवितांत आढळतो’. या बालकवितांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या लहान मुलांपर्यंत पोहचले. त्यांचे ‘आजोबा’ बनले. लहान मुलांची बालसुलभ उत्सुकता, कुतूहल, त्यांची निरीक्षण करण्याची शक्ती, मुलांच्या वागण्या-बोलण्यात असणारी लय, नादमयता, त्यांची विशिष्ट अशी भाषा, त्यांचे शब्द, तसेच करंदीकरांच्या स्वभावातला मिश्किलपणा, कल्पकता यातून त्यांची बालकविता आकारास येते. त्यांच्यानंतर अनेकांनी बालकविता लिहिल्या. करंदीकरांच्या बालकवितांपुढे ते अधिक मजल मारू शकले नाहीत.
कवी म्हणून मिळत गेलेल्या प्रसिद्धीमुळे करंदीकराचे लघुनिबंध काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले. त्यांचे ‘स्पर्शाची पालवी’ (१९५८), ‘आकाशाचा अर्थ’ (१९६५) आणि ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’ (सं. विजया राजाध्यक्ष-१९६६) हे तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. करंदीकरांच्या लघुनिबंधांमध्येही काव्य आहे. म्हणजे गद्यशैली आणि काव्यशैली यांचे मिश्रण झालेले आहे. संवेदनक्षमता, भावनात्मकता, हळुवारपणा, कोटिबाजपणा, आलंकारिकता ही त्यांच्या लघुनिबंधाची काही वैशिष्टये सांगता येईल. स्वतःचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, ते कसे असावे, कसे जगावे या संबंधीचे विचार ललित्यपूर्ण शैलीतून लहान, लहान घटना प्रसंगातून, व्यक्तिचित्रातून त्यांनी लघुनिबंधातून मांडले आहेत. मात्र १९६५ सालीच कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आपले लघुनिबंधलेखन थांबविले.
या व्यतिरिक्त करंदीकरांच्या
‘परंपरा आणि नवता’ (१९६७) या समीक्षाग्रंथाला मराठी समीक्षेत मानाचे स्थान आहे. तसेच त्यांचे ‘लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट’ (१९९१), ‘अ क्रिटीक ऑफ लिटररी व्हॅल्यूज’ (१९९७) हे इंग्रजी समीक्षाग्रंथ, जगप्रसिद्ध ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांच्या ग्रंथाचा ‘ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ (१९५७) हा अनुवाद, ‘फाउस्ट भाग १’ (१९६५), ‘राजा लियर’ हे अनुवादित साहित्य, संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव’ (१९८१) हे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभावाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या काही कवितांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. याशिवाय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या मात्र असंग्रहित मराठी कविता, मुलाखती, असंग्रहित भाषणे असे विपूल साहित्य करंदीकरांच्या नावावर आहे. या सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी मोलाची भर घातलेली आहे व त्यांना समृद्ध केले आहे, एवढे मात्र निश्चित.
त्यांच्या या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यात केशवसुत काव्यपुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचे दहा पुरस्कार, सिनियर फुलब्राइट पुरस्कार (१९६७), सोव्हियत लँड नेहरू वाङ्मय पुरस्कार (१९७०), महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक (१९८५), कविराज कुसूमाग्रज पुरस्कार (१९८७), अखिल भारतीय कवितेसाठी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील कबीर सन्मान पुरस्कार (१९९१), मानाचा जनस्थान पुरस्कार (१९९३) , टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लिट. पदवी (१९९६) व सर्वात महत्वाचा व प्रतिष्ठेचा, भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा २००३ सालचा साहित्य अकादमीचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
विंदा वैयक्तिक आयुष्यात जसे जगले तसेच साहित्यातून त्यांनी स्वतःला प्रकट केले. आपल्या विचारांशी, तत्वांशी, मूल्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, त्यांची प्रतारणा केली नाही. ते खऱ्या अर्थाने संन्यस्त वृत्तीचे होते. साहित्य लेखनासाठी त्यांनी आधी १९७६ साली व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर कवितेच्या प्रांतातूनही १९८१ साली निवृत्ती जाहिर केली (अर्थात आतल्या प्रतिभेने त्यांना नंतरही लिहितेच ठेवले.)
‘देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्यांचे हात घ्यावे’
असा संदेश देणारे विंदा आयुष्यभर सगळ्यांना देत राहिले. भरभरून देत राहिले. त्यांना वेळोवेळी पुरस्कारातून मिळत गेलेली रक्कम त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करणाऱ्या संस्थांना दान केली. मृत्यूनंतरही देहदान व नेत्रदान करून त्यांनी ‘बोले तैसा चाले’ ही लाकोक्ती सार्थ ठरविली.
कवितेतून ‘असहाय दुःखितांना आनंद देत जावे/ आनंद देत असतां, आनंद घेत जावे’ असे म्हणणारे विंदा आयुष्यभर आपल्या कवितेतून दुसऱ्यांना आनंद देत राहिले.
आयुष्यातला क्षणन् क्षण समरसून, मनापासून जगलेले विंदा ‘मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे’ असे म्हणून आसक्तीविरहित आयुष्य जगले. साहित्याच्या रूपाने सर्व मानवजातीसाठी आपल्या मराठी भाषिकांना अभिमान वाटावा असा अनमोल ठेवा मागे ठेवून ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. एका नवीन प्रवासासाठी…! एका नव्या सत्याच्या शोधासाठी…!
- संदर्भ ग्रंथ –
१. बहुपेडी विंदा- विजया राजाध्यक्ष
२. लोकसत्ता व इतर वर्तमानपत्रे
3. संहिता – विंदा करंदीकरांची निवडक कविता, (संपा.) मंगेश पाडगावकर
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw