Dr. Rahul Rajani

गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?

गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच

शकत नाहीत. म्हणून त्यांचे प्राध्यापक बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अनेक जण आत्महत्या करत आहेत. अतिशय नैराश्याने वावरत आहेत. ८-१०-१५ वर्षे तासिका तत्त्वावर काम करत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, वशिला आहे, ते पटापट नोकऱ्या मिळवत आहेत.

आज प्रत्येक महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या जाहिराती निघतात. नेट/ सेट उत्तीर्ण झालेले प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अर्ज करतात व प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस मुलाखतीला जातात. वर्षात २०-२५ ठिकाणी अर्ज करतात व वेड्यासारखे भाडे खर्चून इकडून तिकडे महाराष्ट्रभर मुलाखत देत फिरत राहतात व निराश होऊन परततात. याचा खूप नकारात्मक परिणाम त्यांच्या व त्यांच्यानंतर शिक्षण घेत असलेल्या तरुणांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या व एकूणच समाजाच्या मनावर होत आहे. यामुळे बहुजन समाजात, गरिबांमध्ये शिक्षणाप्रती अनास्था निर्माण होत आहे.

ही व्यवस्था बदलावायला हवी व ही आपण सर्वजण मिळून बदलवू शकतो.

या क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण व्हायला हवी. यासाठी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात रिक्त असलेल्या जागांसाठी एकाच वेळेस परीक्षा व्हायला हवी व संवर्ग तसेच मेरिटनुसार सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करायला हवी. तरच तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांचा प्रश्न मिटेल, भ्रष्टाचार थांबेल व उच्चशिक्षणाची गुणवत्ता सुधारेल. हुशार व ध्येयवादी तरुण या क्षेत्रात आनंदाने येतील.

समाजातील सर्व घटकातील सुजाण नागरिकांनो, आपली मुले याच शिक्षण संस्थांमध्ये शिकणार आहेत व त्यापैकी काही जण प्राध्यापक पदाचे स्वप्न पाहणार आहेत. आज जी व्यवस्था आहे, ती जर बदलवली नाही तर त्यांना याच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आयुष्यातील कित्येक वर्षे अशीच नोकरीची वाट बघण्यात वाया जाणार आहेत. तरीही डोनेशन भरावे लागणार आहे व ते ७-८ वर्षे फेडावे लागणार आहे.

म्हणून प्राध्यापकांच्या सरळ सेवा भरतीच्या मागणीसाठी आपल्या लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरा, आंदोलन करा, लढा.

हा आपल्या या व पुढच्या पिढ्यांपुढील ज्वलंत प्रश्न समजा. शिक्षणाची गुणवत्ता सुधारली तरच आपल्या शिक्षण घेत असलेल्या तरुणांना चांगले भविष्य आहे.

(शिक्षक/ प्राध्यापक पदासाठी डोनेशन घेणारा भारत हा जगात एकमेव देश असावा!)

© डॉ. राहुल पाटील

Exit mobile version