Dr. Rahul Rajani

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

                दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेतील सहभाग व राखीव जागांची तरतूद यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. ते आपल्या

हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यात आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना, इ. गोष्टी दिसून येतात. दुसर्‍या कोणत्याही साहित्यप्रवाहात आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

दलित साहित्य हे समाजातील सर्व प्रकारच्या अन्याय, शोषण, विषमता याविरुद्ध बंड पुकारते. ते लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद अशा मानवी मूल्यांचा आग्रह धरते. ज्या ठिकाणी ही मूल्ये पायदळी तुडवली जात असतील, त्याठिकाणी ते विरोध करते. बाबुराव बागुल यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “जो जो या समाजाविरुद्ध लढणारा दृष्टिकोन घेऊन साहित्यनिर्मिती करील आणि चुकलेल्या समाजाला वाटेवर आणील तो दलित साहित्यातील असेल.” दलित साहित्य हे आक्रमक स्वरूपाचे असून माणसाचे माणूसपण नाकारणार्‍या परंपरांना दलित साहित्य नाकारते. दलित साहित्य हे समाजाशी व श्रेष्ठ अशा मानवी मूल्यांशी बांधिलकी मानणारे साहित्य आहे.

दलित साहित्याच्या संदर्भात ‘जन्मतः दलित असलेल्या लेखकाने लिहिलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य’ किंवा ‘दलितांचे जीवन, त्यांची दुःखे याविषयी कोणत्याही लेखकाने लिहिलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य’ अशा दोन परस्पर भिन्न भूमिका मांडल्या जातात. यापैकी योग्य भूमिका कोणती? हे समजून घेण्यासाठी आपल्याला ‘दलित जाणीव’ म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. दलित जाणीव ही जीवनाच्या परिवर्तनाचा विचार आहे. आशावादी दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकीशी अतूट नाते, आत्मभान, आत्मशोध, नकार, वेदना, विद्रोह, परिवर्तनवाद, मानवाला मध्यवर्ती मानणे, वंश-वर्ण व जातिव्यवस्थेला कडाडून विरोध, निरीश्वरवाद, जडवाद, गतिवाद ही दलित जाणिवेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी या संदर्भात असे म्हटलेले आहे की, “दलित असणे व दलित जाणीव असणे हे भिन्न आहे. दलित जाणिवेतून दलित जीवनविषयक जे वाङमय निर्माण होते ते दलित वाङमय.”

थोडक्यात, दलित जाणिवेतून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य. दलित जाणिवेची वरील वैशिष्ट्ये जन्मत: दलित लेखकांच्या साहित्यात आढळतीलच असे नव्हे. उदा:- कवी ग्रेस हे जन्मतः दलित आहेत. परंतु त्यांनी लिहिलेले साहित्य हे दलित साहित्य नाही. कारण त्यांनी दलित जाणिवेतून ते लिहिलेले नाही. याउलट दलितेतर लेखकाने लिहिलेले साहित्यही दलित साहित्य असू शकते. मात्र त्यात वरील वैशिष्ट्ये असायला हवीत. परंतु भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातिव्यवस्थेचे चटके दलितेतर समाजाने तेवढ्या तीव्रतेने सहन केलेले नसल्याने, तो अनुभवच त्यांनी घेतलेला नसल्याने त्यांनी दलितांचे जीवन मांडणारे साहित्य लिहिले तरी त्यात दलित जाणिवेची वरील वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. तर सहानुभूतीचा भाव अधिक असतो.

या काही व्याख्यांवरून दलित साहित्याचे स्वरूप स्पष्ट होते.

दलित साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे. त्यात सामाजिक जाणिवा, प्रत्यक्ष जीवनानुभव, दु:ख, भोगलेले, सोसलेले सर्व काही कुठलाही आडपडदा न ठेवता व्यक्त होते. दलित साहित्याचे स्वरूप अभ्यासताना आपल्याला या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा लागतो.

दलित साहित्याचे स्वरूप पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अभ्यासता येईल.

१) आत्मभान

२) आत्मशोध

३) नकार आणि विद्रोह

४) बांधिलकी

१) आत्मभान –

दलित लेखकांनी साहित्याच्या माध्यमातून समग्र परिवर्तनाचा जो लढा, जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आहे, त्याच्या मुळाशी त्यांना प्राप्त झालेले आत्मभान हे आदिकारण आहे. कारण “एखाद्या जनसमूहाला आत्मभान प्राप्त झाल्याशिवाय सांस्कृतिक चळवळ उभी राहू शकत नाही.” ( प्रा. वाघमारे)

आपण इतरांच्या सारखे आहोत, याची जाणीव म्हणजे आत्मभान. केवळ इतरांच्या सारखे आहोत असे नाही, तर इतरांच्या बरोबरीचे आहोत, आपणही माणूस आहोत, याची जाणीव प्राप्त होणे म्हणजे आत्मभान येणे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये हजारो वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातिव्यवस्था, जातीवर आधारलेले व्यवसाय, जात ही जन्मजात प्राप्त होणे इ. गोष्टीमुळे इथल्या शूद्र, अतिशूद्र यांना अतिशय हीन व पशूंप्रमाणे वागवले गेले. पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, ईश्वरी व्यवस्था इ. भोंगळ तत्त्वज्ञानाच्या मदतीने ही व्यवस्था टिकवली गेली. अशा व्यवस्थेत आपणही माणूस आहोत, इतरांसारखे आहोत, किंबहुना इतरांच्या बरोबरीचे आहोत, हा मनात विचार येणे, स्वत:विषयीचे हे भान येणे शक्य नव्हते. मात्र १९ व्या शतकात म. फुले व २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य यामुळे इथल्या समस्त शूद्र-अतिशूद्र वर्गाला हे आत्मभान प्राप्त झाले. यातूनच मग स्वतःविषयीचा शोध सुरू झाला. यातूनच जी संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था यामुळे आपले माणूसपण नाकारले गेले होते, त्या सर्वांविरुद्ध विद्रोह व नकार दलित साहित्यात अवतरला. थोडक्यात, आत्मभान हे दलित साहित्याचे आदिकारण आहे.

याचे चित्रण आपल्याला दलित कविता, कथा, आत्मकथने, नाटके, कादंबर्‍या अशा सर्वच वाड्मय प्रकारांमध्ये आढळून येते.

२) आत्मशोध –

दलित समाजाला म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्यामुळे आत्मभान प्राप्त झाले. त्याचे परिणामस्वरूप दलित लेखक, विचारवंत हे इथली समाजव्यवस्था, संस्कृती, धर्म, परंपरा, धर्मग्रंथ त्यात आपले स्थान काय आहे, याचा शोध घेऊ लागले. या शोधातून त्यांच्या असे लक्षात आले की, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुय्यम, हीन, पशुपातळीवरची वागणूक दिली गेलेली आहे. अतिशय दारिद्र्यावस्थेत आपल्या पूर्वजांना व आपल्याला जगण्याला भाग पाडले गेलेले आहे. अपमान, अवहेलना, अन्याय सहन करत आपल्या समाजाने इथपर्यंत वाटचाल केलेली आहे. धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यावर त्यातही आपली क्रूर, रानटी अपमानकारक वर्णनांनी संभावना करण्यात आलेली आहे. हे त्यांच्या लक्षात आले. याचे चित्रण मग दलित लेखक करू लागले.

शरणकुमार लिंबाळे, बाबुराव बागुल, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, दया पवार, योगिराज वाघमारे, हिरा बनसोडे, बेबी कांबळे, कुमुद पावडे इ. सर्व दलित लेखकांच्या साहित्यात आपल्याला घटनाप्रसंग, कथानकाच्या माध्यमातून हा आत्मशोध घेतलेला दिसून येतो.

रा. ग. जाधव यांनी या संदर्भात खूप महत्त्वाची मांडणी केलेली आहे. ते म्हणतात की, “दलित हा असा समाज आहे, भारतीय समाजात आपले एक न्याय्य स्थान व दर्जा प्रस्थापित करण्यासाठी दलित समाज झगडत आहे. पण असा झगडा करण्याची गरज कुठून, कशी व केव्हा निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठीही तो समाज धडपडत आहे. एका अवनत, अन्याय्य व अर्थहीन जिण्याचा धनी ठरण्याचे दुर्दैव आपणावर का ओढवले, याचा शोध घेण्यासाठी दलित मन आतुर झाले आहे. मीच केवळ नव्हे, तर आम्ही कोण होतो, हे जाणून घेण्यास ते मन उत्सुक झाले आहे. माझ्या या काळोख्या वर्तमानाची कूस कोणत्या नि केव्हाच्या भूतकाळात दडलेली आहे, याचा वेध घेण्यासाठी ते मन अधीर झाले आहे. कोणत्या देशी कोणत्या काळी, कोणते माझे पूर्वज, कसे जगले या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते मन तळमळत आहे. दलितत्वाचे मूळ आणि कूळ जाणून घेण्यासाठी ते मन तडफडत आहे. असे दलित मन जेव्हा सृजनशील बनते, आत्माविष्कार करू पाहते, स्वतःला जाचणार्‍या प्रश्नांना निर्मितीरूपाने जाणून घेण्याचा प्रयल करू लागते, तेव्हा त्यातून ‘बलुतं’ (दया पवार), ‘पोखरण’ (केशव मेश्राम), ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ (माधव कोंडविलकर) ‘आठवणींचे पक्षी’ (प्र . ई . सोनकांबळे) , ‘शूद्र’ (सुधाकर गायकवाड) यांच्यासारख्या साहित्यकृती निर्माण होतात.”

या दलित लेखकांच्या आधी म. फुले यांनी ‘दशावतार’, ‘गुलामगिरीची प्रस्तावना’ व इतर साहित्यातून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथात शूद्रांच्या इतिहासाचा मागोवा घेतलेला आहे. हे वैचारिक स्वरूपाचे साहित्य असून यातूनच नंतर दलित लेखकांनी प्रेरणा घेऊन आपल्या ललित लेखनातून त्यांची विविध रूपे चित्रित केलेली दिसून येतात.

३) नकार आणि विद्रोह –

वेदना आणि विद्रोह हे दलित साहित्याचे महत्त्वाचे विशेष आहेत. या दोन वैशिष्ट्यांची विविध रूपे दलित साहित्यात प्रकट झालेली दिसून येतात. मुळात १९५६ साली बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला, ही भारतीय समाजजीवनातील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना असून असे करून त्यांनी इथल्या विषमता, भेदभाव, अन्याय्य व्यवस्थेला नकार दिलेला असून एका समतापूर्ण समाजनिर्मितीसाठी तिच्याविरुद्ध पुकारलेला शांततापूर्ण विद्रोहच होता. दलित लेखकांनी यातूनच प्रेरणा घेतलेली आहे.

आपल्या मानवत्वाच्या प्रस्थापनेसाठी दलित समाज आक्रमक व संघर्षशील झालेला आहे. त्याच्या आड येणार्‍या जात, वर्ण, धर्म, संस्कृती, परंपरा, देव या सर्वांना त्यांनी नाकारले आहे.

त्र्यंबक सपकाळे यांच्या एका कवितेतील

“आम्ही गॉड मेकर

देतो नोटीस तुझ्यावर

निग्लिजन्स ऑफ ड्युटीची

युवर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड”

या ओळी तसेच दया पवार यांच्या

“हे महाकवे

तुला महाकवी तरी कसे म्हणावे?

हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा

एक जरी श्लोक तू रचला असतास…

तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते.”

या कविता नकार व विद्रोह यांची चांगली उदाहरणे आहेत.

दलित कथा, आत्मकथनांमध्ये या वैशिष्ट्यांचे विविध अविष्कार बघावयास मिळतात. दलित लेखकांना वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात असे अनेक अनुभव येतात की, दलितांमधील बरेचजण पारंपरिकता, जुनी व्यवस्था यांना चिकटून असतात, परिवर्तनाला विरोध करतात, दलितांमध्ये मुळातच असलेली जातिव्यवस्था मोडण्याऐवजी टिकवून ठेवतात. अशा प्रवृत्तींनाही दलित साहित्य नकार देते. याचे चित्रण शंकरराव खरात यांची ‘एक संघर्ष’ ही कथा, शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन, दत्ता भगत यांची ‘एकटी’ ही एकांकिका या व इतर अनेक साहित्यकृतींमध्ये आलेले दिसून येते.

अलीकडच्या काळात नकार आणि विद्रोह यांचे एक वेगळे रूप दलित साहित्यात बघावयास मिळते. ते असे की, दलितांमधील काही लोकं शिकले, मोठ्या पदावर काम करू लागले, श्रीमंत, प्रतिष्ठित झाले. यापैकी काहीजण आपल्या समाजाशी, नातेवाईकांशी जाणीवपूर्वक लांब राहून पांढरपेशा समाजाशी आपले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते देखील आपल्या वर्गाला कमी लेखू लागले असल्याचे दिसून येऊ लागले. दलित लेखकांनी या प्रवृत्तीवर आपल्या साहित्यातून कडाडून टीका केलेली असून तिला विरोध दर्शविला आहे. गंगाधर पानतावणे यांच्या ‘मुखवटे’ या एकांकिकेतील अधिकारी व योगीराज वाघमारे यांच्या ‘बेगड’ या कथेतील औरंगाबाद येथे शिकणारा तरुण ही या प्रवृत्तीची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

४) बांधिलकी –

दलित साहित्य हे परंपरा, धर्म, अन्याय्य संस्कृती, पारंपरिक समाजव्यवस्था, विषमता, चातुर्वर्ण्य व्यवस्था इत्यादी गोष्टींना नकार देते. त्याविरुद्ध विद्रोह पुकारते. असे असले तरी दलित साहित्य हे मूल्यांचा पुरस्कार करणारे, उदात्त मानवी मूल्यांची बांधिलकी सांगणारे साहित्य आहे.

दलितांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक मरणप्राय यातना सहन केल्या. त्यांना अमानुषपणे वागवले गेले. मात्र तरीही दलित साहित्यामध्ये सूडाचे चित्रण आलेले फारसे दिसून येत नाही. कारण दलित साहित्याच्या मुळाशी बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान व गौतम बुद्ध यांचे प्रज्ञा, शील, करुणा इ. मूल्ये आहेत.

दलित साहित्य हे आशावादी स्वरूपाचे साहित्य आहे. प्रचंड दारिद्र्यात, विषमता असलेल्या समाजात जगत असतानाही नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवीला ‘याच वस्तीतून आपला सूर्य येईल’, याबद्दल खात्री आहे व त्यासाठी ‘तोवर मला गातच राहिले पाहिजे’ असे म्हणताना ते दिसून येतात. नामदेव ढसाळांसारखा कवी आपल्या कवितेतून व्यवस्थेवर घनघोर हल्ला चढवताना दिसतो. पण त्यासोबत नव्या समाजव्यवस्थेची मांडणी करतानाही दिसून येतो.

दलित साहित्य हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी मूल्यांचा पुरस्कार करणारे साहित्य असून त्या मूल्ल्यांशी उघड-उघड बांधिलकी सांगणारे साहित्य आहे. दलित साहित्य देव, वर्ण, जात, धर्म यापेक्षा माणूस श्रेष्ठ मानते. माणसाच्या माणूसपणाच्या आड येणार्‍या सर्व गोष्टींना विरोध करते.

दलित साहित्यात ‘बांधिलकी’ या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. “जो दारूण अनुभव लेखकाने घेतला, त्याच्या प्रकटीकरणात अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना त्यांचा अडसर येतो. हा अडसर झुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करण्याचे धाडस दाखविणे’, (दत्ता भगत) या दृष्टिकोनातूनही दलित साहित्यातील बांधिलकी या पदाकडे बघता येते. कारण कथा, कविता, विशेषतः आत्मकथनांमधून आपला अपमानजनक भूतकाळ मांडणारे दलित लेखक आज समाजात विविध पदांवर कार्यरत असून समाजात त्यांना प्रतिष्ठा आहे. हा भूतकाळ उभा केल्यामुळे त्यांचे पूर्वायुष्य लोकांसमोर येऊन त्यांना ओळखणार्‍यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. असे असतानाही दलित लेखक आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून साहित्य लिहितात. उदा. दया पवार, प्र. ई. सोनकांबळे, शरणकुमार लिंबाळे, नरेंद्र जाधव, किशोर शांताबाई काळे इत्यादींची आत्मकथने.

अशा पद्धतीने एकीकडे उदात्त अशा मानवी मूल्ल्यांशी नाते सांगणे तर दुसरीकडे स्वत:च्या वेदनादायक अशा अनुभवांशी प्रामाणिक राहून लेखन करणे, या अर्थाने दलित साहित्यात बांधिलकी ही या पदाचा अर्थ असल्याचे दिसून येते.

दलित साहित्याने मराठी व एकूणच भारतीय साहित्यामध्ये वास्तववादी साहित्याचा एक जोरकस असा प्रवाह निर्माण केला. हजारो वर्षांपासून ज्यांचे शोषण होत होते, अशा समाजातून पुढे आलेले लेखक, कवी कथा, कविता, आत्मकथने इ. साहित्यप्रकारातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. साहित्यातून अन्याय, अत्याचार, शोषण, विषमता इ. विरुद्ध आवाज उठवू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद इ. मूल्ल्यांशी बांधिलकी सांगू लागले. या साहित्याने मराठी साहित्याला आशय, अभिव्यक्ती व भाषा अशा सर्व अंगानी समृद्ध केलेले आहे.

डॉ. राहुल भालेराव पाटील,

सहाय्यक प्राध्यापक,

मराठी विभाग,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
Exit mobile version