नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण
त्यांना फक्त ऐनकेनप्रकारे सत्ता मिळवायची होती.
त्यांनी स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचे आश्वासन दिले होते, पण ते पाळले नाही. सुरुवातीलाच त्यांनी भूसंपादन विधेयक आणले होते, पण लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केल्याने त्यांना ते सोडून द्यावे लागले व आता तर ते शेती क्षेत्र कार्पोरेट क्षेत्रासाठी खुले करत आहेत.
त्यांनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, तेही त्यांनी कधी पाळले नाही. उलट नोटबंदी, गबाळ GST व दक्षिण भारतीय चित्रपट स्टाईल लॉकडाऊन (तशीच नोटबंदीची घोषणाही होती.) यासारख्या निर्णयांमुळे त्यांच्या काळात कोट्यवधी रोजगार बुडाले आहेत. रघुराम राजन, अमर्त्य सेन यांसारख्या जागतिक अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारला नेहमी त्यांचे धोरण बदलायला सांगितले, पण यांनी ऐकले नाही. उर्जित पटेल यांनी यांच्या अशाच धोरणामुळे शेवटी राजीनामा दिला. त्यांच्या १-२ आर्थिक सल्लागारांनी याच गोष्टींना वैतागून राजीनामा दिला आहे. (त्यांची नावे तुम्हीच शोधा. तुम्हाला अवश्य सापडतील.)
पेट्रोल, डिझेलमधून विक्रमी करांची वसुली, gst मधूनही चांगली मिळकत, काँग्रेसने सुरू केलेल्या कंपन्या विकून मिळविलेला पैसा, रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडवर डल्ला मारून मिळविलेला अफाट पैसा इतके सारे असूनही सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना त्याचा काहीही लाभ होत नाहीये. कारण यांना अर्थशास्त्रच कळत नाही. म्हणून माझ्यासारखा असंख्य लोकांचा भ्रमनिरास होत गेला आहे.
यांनी कोरोना काळात फिल्मी स्टाईलने लॉकडाऊनची घोषणा केली. तद्नंतर कोट्यवधी लोकांना शेकडो- हजारो किमी स्थलांतर करावे लागले. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले. हे भारत-पाक फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर होते. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडाला.
याच काळात यांनी बंगालच्या निवडणुकीत मास्क न वापरता घेतलेल्या लाखोंच्या सभा, कुंभमेळ्याला दिलेली परवानगी यामुळे दुसरी लाट भारतात आली व झपाट्याने पसरली. यामुळे भारतातील लाखो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला, कुटुंबे उद्ध्वस्त झाली व लाखो लोकं उपचाराच्या खर्चामुळे कर्जबाजारी झाले.
बाकी त्यांचे व माझे काहीही वैयक्तिक शत्रूत्त्व नाही. त्यांनी काही माझा केळीचा बाग कापून नेलेला नाही. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा! फक्त हे त्यांच्याने न पेलवणारे ओझे त्यांनी जास्त दिवस सांभाळू नये व देशाचे अजून जास्त नुकसान करू नये, म्हणून हा सर्व खटाटोप चाललाय. मोदीभक्तांनीही वैयक्तिक घेऊ नये व थोडे पुस्तकांचे वाचन-बिचन वाढवावे, आयटी सेलच्या फोटो-व्हिडिओ व मॅसेजवर अवलंबून राहून बुद्धीचा ऱ्हास करून घेऊ नये, हा फुकटचा सल्ला!
धन्यवाद!
आपलाच,
डॉ. राहुल