बस एवढंच…बाकी काही नाही
काही क्षण पकडून ठेवावेसे वाटतात चिमटीत
पण जातात निसटून क्षणार्धात…
आणि शिरतो आपण दुसर्या क्षणांमध्ये
आपल्याही नकळत…
काही घटनाचित्रे कायमस्वरूपी, हुबेहूब तशीच
नजरेसमोर राहावीत, असे वाटत राहते उगीच
पण धूसर, अस्पष्ट होत जातात ती… हळूहळू…
व नंतर काही टिंबेच उरतात… स्मृतिपटलावर…
काही व्यक्ती मेंदूत घुसून जातात आरपार
आभासी, काल्पनिक, काहीशा वास्तविक अस्तित्वासकट
आणि मग विसरताच येत नाही त्यांना…
श्वासांतापर्यंत…
अशीच वाढत जाते मेंदूत गर्दी
क्षणांची, घटनाचित्रांची, व्यक्तींची
जी टिकून राहते मेंदू गाSSर पडेपर्यंत
बस एवढंच…बाकी काही नाही
(०४/०८/२०१९ – नागपूर येथून मराठी उजळणी वर्ग आटोपून परतताना…)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113