Dr. Rahul Rajani

बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?

प्रिय बंधू-भगिनींनो,

               हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला

नव्हता. तर इथल्या उच्चवर्णीयांनी मनुस्मृतीच्या आधारे त्यावर बंदी घातली होती. म्हणून आपल्या मागासलेपणाला मुस्लिम जबाबदार नसून येथील वर्णव्यवस्था व ती टिकवून ठेवणारे जबाबदार आहेत आणि हे लक्षात येऊ नये, बहुजन समाज त्यांच्यावर उलटू नये, म्हणून ते मुस्लिम, पाकिस्तान यांना शत्रू म्हणून पुढे करत असतात.

            लक्षात ठेवा, आपल्या शेकडो पिढ्या बरबाद केल्या गेल्या, तरी आपण कुणाला डोक्यात ठेवलेले नाही. कारण इतिहास वाचायला, समजून घ्यायला आपला बधीर बहुजन समाज तयारच नाही. आपले बौद्धिक पंगूत्व अजूनही कमी होत नाही.

            पण छत्रपती संभाजी महाराजांनी काही गद्दारांना हत्तीच्या पायी दिलेले, गांधीहत्येनंतर थोड्याफार प्रमाणात ब्राह्मणांवर झालेले हल्ले व काश्मीरमध्ये पंडितांचे झालेले स्थलांतर, इतिहासात अशा मोजक्याच घटना त्यांच्या विरुद्ध घडलेल्या आहेत, मात्र ते कधीही विसरणार नाहीत. कारण त्यांच्याकडे ज्ञानाची परंपरा आहे. ते आपल्यासारखे बधीर नाहीत.

कल्पना करा की, किमान गेल्या ७००-८०० वर्षांपासून बहुजन समाजाला शिक्षण घेता आले असते तर आज बहुजन समाज किती तरी पुढे राहिला असता व आपला देशही किती तरी विकसित राहिला असता.

भारतावर आक्रमण करणारे ग्रीक, शक, हुनाण, गझनी, सुलतान, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच सर्व जिंकतच गेले. कुणीच हरले नाही, त्याला कारण इथली चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था आहे. तसेच येथील राज्यकर्त्यांना हाताशी धरून मनुस्मृतीच्या आधारे ती टिकवून ठेवणारे आहेत. मुस्लिम नाहीत.

          बंधू-भगिनींनो, हे लक्षात घ्या व आता एकविसावे शतक आहे. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. अनेक समाजसुधारक व राज्यघटना निर्माणकर्ते यांच्या अफाट अशा कष्टांतून आपल्याला सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य, शिक्षणाची-विकासाची संधी प्राप्त झालेली आहे, त्यांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत, हे डोक्यात जरा पक्के बसवा.

             आताशी कुठे बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लगेच काय पुन्हा देवाधर्माच्या नावाने बिथरल्यासारखे करत आहात? हजारो वर्षे धर्म व देवच छातीशी कवटाळून बसलेले होते ना? काय मिळाले? जरा विचार करा व आता तरी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे, सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. आपल्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्यांना ओळखा. आपण कुणाच्याही विरोधात नाहीत, आपल्याला कुणावरही सूड उगवायचा नाही. फक्त आपल्याला लोकशाही मार्गाने आपल्यासाठी हितकर लोकांना शांततेच्या-लोकशाहीच्या मार्गाने निवडून आणायचे आहे आणि यांच्या देवाधर्माच्या जाळ्यात अडकायचे नाहीये. आपल्याला देव-धर्माचा त्यागही करायचा नाहीये. राज्यघटनेने आपल्याला उपासनेचे स्वातंत्र्य दिलेले आहेच. पण त्याचा गैरफायदा कुणाला घेऊ द्यायचा नाहीये व धर्मही काळाच्या व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या-विवेकाच्या कसोटीवर तपासून घ्यायचा आहे.

               मित्रांनो, अजून आपली मंजिल खूप दूर आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर आधारलेला समाज उभा होईल व तो स्थिर होऊन पुढे शेकडो वर्षे टिकून राहील, तेव्हा चार्वाक, बुद्ध, बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल, आपल्या भावी पिढ्यांना सुखासमाधानाचे दिवस अनुभवायला मिळतील आणि आपला भारत देश जगात शोभून दिसेल.

             तेव्हा डोळस व्हा! जागे व्हा! जागे रहा! ध्येयप्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका!

© डॉ. राहुल

Exit mobile version