Dr. Rahul Rajani

‘बारोमास’ कादंबरी- २

             एकनाथला आता आभाळात ढग येऊ लागल्याने पावसाळा सुरू होईल असे वाटते. त्यासोबतच आता पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंता त्याला सतावू लागते. त्याच्या कुटुंबात तोच आता कर्ता आहे. व्यवहार त्याच्याच हातात आहे. लहान भाऊ मधू याचे शेतकीचे शिक्षण झालेले असूनही त्याला शेतीत बिलकूल रस नाही. तो गावातील त्याच्या काही सुशिक्षित परंतु बेरोजगार व रिकामटेकड्या मित्रांबरोबर गावाबाहेरच्या माळरानावर जुन्या ऐतिहासिक खुणा असलेल्या ठिकाणी खोदकाम करून सोने, जुन्या काळातील दागिने शोधण्यासाठी दररोज रात्र-रात्रभर जातो.  त्याला त्याबद्दल घरातल्यांनी काही बोलले तर तो सांगतो की, “मले सोनं उकरायले जाऊ देत नाई, त नाई जात. मंग मले जीप देऊन द्या एक. सन्नान चिखली-खामगाव आशा सवार्‍या वाह्यतो. अन् दणकावून पैसे कमावून आणतो.” (पृ. ६) पण जीप घेण्यासाठी घरात कुणाकडेच पैसे नसल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही.

             एकनाथची आई जेव्हा दोन लुगड्यांना दांडे भरून म्हणजेच दोन लुगडे जोडून वापरते, तेव्हा एकनाथला खूप दुःख होते. कारण बी. एड. झाल्यावर तो आईला म्हणाला होता की, तुला प्रत्येक पगारावर नवं लुगड आणत जाईल. परंतु नोकरी न लागल्यामुळे त्याची हीदेखील इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

             एकनाथची बायको अलका ही मोहाडी या तालुक्याच्या गावातील इंजिनियरची मुलगी आहे. तिचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झालेले आहे. त्यांच्या लग्नाला चार वर्ष झालेले आहेत. एकनाथचे शिक्षण व हुशारी बघून तिच्या वडिलांनी तिचा विवाह एकनाथशी लावून दिलेला होता. नवर्‍याला नोकरी लागल्यावर आपण शहरात चांगल्या घरात सर्व आयुष्य ऐषोआरामात राहू, ही तिची स्वप्ने एकनाथला नोकरी न लागल्यामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे ती नेहमी असमाधानी, कातावलेली, संतापलेली राहते. नवर्‍याला नेहमी घालून पाडून बोलते. पुन:पुन्हा माहेरी निघून जाते. तिच्या वडिलांच्या घरी सर्व सुखं व सोयी सुविधा असल्याने तिथे राहिल्यावर तिची तब्येत सुधरून जाते. सासरी यायची तिची इच्छा नसते. परंतु नाईलाजास्तव तिला सासरी येऊन काही दिवस का असेना राहावे लागते. काही दिवस कसेबसे काढल्यावर पुन्हा जरा काही घडले, खुट्ट झाले की ती माहेरी निघून जाते.

            लग्नानंतरची पहिल्या एक दोन वर्षातच तिचा अपेक्षाभंग होतो. त्यानंतर एकनाथ सोबतच्या-प्रत्यक्ष नवर्‍यासोबतच्या शारीरिक संबंधांना ती बलात्कार म्हणते. ती गरोदर राहिली की मोहाडीला गेल्यावर गर्भपात करून घेते. पुढे ती कॉपर टी बसवून घेते. तिच्या मते, तिची मुले या खेड्यात शेणामातीत लहानाचे मोठे होताना तिला पाहवले जाणार नाहीत. दरिद्री शेतकर्‍याची मुले म्हणून त्यांना काहीच भवितव्य नसेल तर त्यांना जन्माला घालण्यात काहीच अर्थ नाही. सासरी येताना तिला लागणारे साबण, कपडेलत्ते व इतर सर्व सामान ती माहेरून आणते. कारण सासरी यापैकी तिला काहीच मिळणारे नसते. एकनाथच्या घरी संडाससाठी पायखाना असतो. त्यातील दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे तिला तिथे जायला अवघड जाते. नंतर ती समोर राहणार्‍या शिक्षिका असलेल्या वारे बाईंकडे संडाससाठी जाऊ लागते. घरात चुलीवर स्वयंपाक करणे, शेणामातीने घर सारवणे इत्यादी सर्व कामे ती अतिशय संतापाने व अनिच्छेने करत राहते.

                  एकनाथबद्दल तिच्या मनात नंतर खूप तिरस्कार व अनादर निर्माण होत जातो. एकनाथला दरेगावच्या महाविद्यालयात एक लाख रुपये डोनेशन दिल्यावर प्राध्यापकाची नोकरी लागणार होती. परंतु त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते व कल्याणीचा मळा विकून किंवा गहाण ठेवून तेवढे पैसे तो जमा करू शकला असता. परंतु, तो एकाच ठिकाणी तेरा एकर मळा होता. त्यात बारमाही पाणी असलेली विहीर होती. नानूआजाची समाधी होती. त्यामुळे घरच्यांची व स्वतः त्याचीही तो मळा विकायची बिलकूल इच्छा नव्हती. त्यामुळे तो डोनेशन देऊ शकला नाही. अनेक महाविद्यालयांमधील मुलाखतींमध्ये त्याची निवड व्हायची. पण डोनेशनअभावी त्याला नाकारले जायचे. पुढे डोनेशनचा रेट वाढत जातो व नोकरी एकनाथच्या आवाक्याबाहेर चालली जाते. तरीही अलकाला असे वाटते की, त्याने वाटणी करून घ्यावी, शेत विकावे व त्या पैशांतून शहरात झेरॉक्स दुकान किंवा स्टेशनरीचे दुकान, कॉम्प्युटर क्लास यापैकी काहीतरी सुरू करावे. परंतु एकनाथ शेत विकायला तयार होत नाही.

                  एकदा अलकाला माहेरी जाऊन कित्येक दिवस झालेले असतात. तेव्हा एकनाथ तिला घ्यायला जातो. तेव्हा तिच्यासह तिच्या लहान बहिणींकडून त्याच्या काही ग्राम्य सवयींची अवहेलना केली जाते. इथे एकनाथच्या असे लक्षात येते की, इंडियातील लोकं भारतातील लोकांकडे अशाच तुच्छतेच्या नजरेने बघतात. शहरे म्हणजे इंडिया व खेडी म्हणजे भारत!

                अलका त्याच्यासोबत सांजोळला सासरी येते. पण काही दिवसांनी एका साध्या वादातून मधू (छोटा दीर) तिच्या मुस्कटात मारतो. ती बेशुद्ध पडते. यानंतर ती कायमची माहेरी निघून जाते. काही महिन्यांनंतर एकदा ती एकनाथला मोहाडी येथे रस्त्यावर दिसते. तो तिला हाका मारतो. परंतु, ती तिच्या बहिणीसह रिक्षात बसून निघून जाते. यानंतर कादंबरीच्या शेवटपर्यंत त्यांची भेट होत नाही. (क्रमश:)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Exit mobile version