आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन
प्रस्तावना-
भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा देश आहे. भारतात आजही काही मोजक्या भाषांमधूनच लेखन केले जाते. तर १६०० पेक्षा जास्त बोली या फक्त बोलल्या जातात. म्हणजे त्या लिपीबद्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यात लिखित साहित्य हे खूप कमी आहे किंवा जे आहे ते अगदी अलीकडे म्हणजे २५-३० वर्षांत या समूहातील नवशिक्षित वर्गाकडून लिहिले गेलेले आहे. परंतु आज त्या बोलींमध्ये जे मौखिक साहित्य उपलब्ध होते ते अतिशय मुबलक असे आहे. हे मौखिक साहित्य नेमके केव्हा निर्माण झाले हे आज कुणीही सांगू शकत नाही. परंतु पिढ्यानपिढ्यांपासून ते चालत आलेले आहे. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत.
महाराष्ट्रातील आधीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. या तालुक्यात ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर,
ढोरकोळी, मल्हारकोळी, वारली, कोकणा या बोली बोलल्या जातात. या बोलींच्या उच्चारांमध्ये, शब्दसंग्रहामध्ये भेद आहे. असे असले तरी एकमेकांच्या बोली एकमेकांना समजतात व बोलता येतात. या बोलींवर मराठी भाषेचाही काही प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो. ह्या बोलींमध्ये विपुल प्रमाणात लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी लोकसाहित्य उपलब्ध आहे. त्यातून आदिवासी संस्कृती, त्यांच्या प्रथा, परंपरा, लोकजीवन, दैनंदिन व्यवहार, सुख-दुःख यांचे दर्शन घडते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या भावविश्वाचे, त्यांच्या मानसिकतेचे, त्यांच्या सुखदुःखांचेही चित्रण आलेले दिसून येते.
आदिवासी स्त्री ही लोकार्थाने अशिक्षित आहे. पारंपरिक अशा समाजात जगत असताना तिचा शहरीकरण, आधुनिकीकरण यांच्याशी फारसा संबंध आलेला नाही. डोंगरदर्यांमध्ये जगत असताना नवर्यासोबत संसाराचा गाडा ओढणारी कष्टाळू अशी ही स्त्री आहे.
आदिवासी समाजामध्ये स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. ती तिचा जोडीदार स्वतः निवडू शकते. तिच्या मतांचा, विचारांचा आदिवासी समाजात आदर केला जातो. ती घरातील आर्थिक व्यवहार सुद्धा समर्थपणे सांभाळते. अशा या आदिवासी स्त्रीचे विविधांगी दर्शन आदिवासी लोकगीतांमधून घडलेले दिसून येते.
आदिवासी बोलीतील लोकगीतांमधील स्त्रीचित्रण –
मुलगी जेव्हा लग्नानंतर सासरी जाते, तेव्हा तिला माहेरची ओढ असते. सणासुदीला आपल्याला घ्यायला आपल्या माहेरून कुणीतरी येईल, अशी आस तिला लागलेली असते. आधीच्या काळात मोबाईल किंवा इतर कोणतेही संपर्काचे साधन नसल्याने वाट पाहत राहणे हेच या सासुरवाशीण मुलीच्या हातात असायचे. माहेरची हुरहुर मात्र स्वस्थ बसू देत नसायची. तेव्हा ‘क’ ठाकूर या बोलीतील ‘फुलपाखरू’ या लोकगीतातील स्त्री फूलपाखराला सांगते की,
“फुल फुल पाखरू पाखरू
फूल फूल पाखरू पाखरू
ये माझ्या वाडीत वाडीत
गणपतीच्या सणाला
ये माल नियाला”
पुढे या गीतातून ती गणपतीच्या सणासोबत दिवाळी व होळीच्या सणांना मला ‘नियाला’ म्हणजे घ्यायला ये असे त्या फुलपाखराला सांगते. आदिवासी समाजात गणपती (अलीकडे गणेशोत्सवाचे लोण जास्त वाढलेले आहे) दिवाळी व होळीच्या सणाला खूप महत्त्व आहे. या लोकगीतातून सासुरवाशीण स्त्रीची माहेरी जायची ओढ व्यक्त झालेली आहे.
आदिवासी स्त्री ही जेवढी संवेदनशील, प्रेमळ साधी आहे. तेवढीच ती कणखर, स्वाभिमानी व चारित्र्यशीलही आहे. कोणतीही स्त्री जर शुद्ध चारित्र्याची असेल आणि तिच्या चारित्र्यावर कुणी संशय घेतला तर ती ते सहन करू शकत नाही. तिला संताप आल्याशिवाय राहत नाही. ‘इसाळा धंदा’ या लोकगीतातील एका स्त्रीवर तिचा नवरा नेहमी संशय घेतो, तेव्हा तिचा संताप या लोकगीतातून व्यक्त झालेला आहे. तो याप्रमाणे
“फाट्याव जासी माझे मागा येसील
तुल वेलील बांधून घालीन
धन्या आता तरी इसाळा धंदा सेडना
पाण्याव जासी माझे मागा येसील
तुल इहरीत लोटून देन ना
धन्या आता तरी इसाळा धंदा सेडना
आंग धवायल जासी माझे मागा येसील
तुल दाहडात लोटून देन ना
धन्या आता तरी इसाळा धंदा सेडना”
याच गीतातून तिचे दारिद्र्य, कष्टाळूपणा, सोयी-सुविधांचा अभाव पण दिसून येतो. तिला सरपण घ्यायला जंगलात जावे लागते, पाणी भरायला विहिरीवर, आंघोळीला नदीवर जावे लागते. ‘इसाळा धंदा’ म्हणजे संशय घेण्याची चुकीची, घाणेरडी सवय सोडून दे. अन्यथा मी तुला वेलीने बांधून टाकीन, तुला विहिरीत किंवा मग नदीतील खोल डोहात लोटून देईन, असे ती आपल्या नवर्याला सांगते आहे.
वारली या बोलीभाषेत विवाहप्रसंगीची काही लोकगीते आहेत. या गीतांमधूनही आपल्याला स्त्रियांच्या भावभावनांचे दर्शन घडते. ‘गंठणाचा काळा मणी’ या लोकगीतातील स्त्री नवर्याला असे उद्देशून म्हणते की, मी तुमच्यासाठी माझे आई-वडील, भाऊ-बहीण सोडलेले आहेत व सासू-सासरे, नणंद-दीर यांना आपले मानले आहे. त्यांच्याशी नाते जोडलेले आहे. लग्नानंतर सासरी स्त्रीचे नवर्याकडचे अनेक नातेसंबंध तयार होतात. ज्या माहेरी ती लहानाची मोठी होते. ते सर्व नातेसंबंध मागे टाकून तिला या नवीन नातेवाईकांसोबत पुढचा प्रवास सुरू करावा लागतो. नवर्यासाठी ती त्या सर्वांना आपलेसे करते. या लोकगीतातून आदिवासी स्त्रीच्या याच भावनांचे चित्रण आलेले आहे.
आदिवासीतेतर समाजामध्ये मुलीच्या लग्नाच्या वेळेस मुलीच्या आई-वडिलांना मुलाकडच्यांना हुंडा द्यावा लागतो. तसेच बर्याचदा लग्नाचा खर्चही करावा लागतो. मात्र आदिवासी समाजात याच्या उलट प्रथा आहे. याचे चित्रण आपल्याला ‘मुका’ नावाच्या कोकणा बोलीतील लोकगीतात दिसून येते. या गीतात नवर्याच्या आई-वडिलांना लग्नानंतर मुके, अबोल, गप्प किंवा शांत बसलेले पाहून त्यांना कुणीतरी विचारतो की, ‘नवर्याची आई का गं मुकी मुकी?’ किंवा ‘नवर्याचा बाबा का रे मुका मुका?’. तेव्हा तो उत्तर देतो की, ‘पैशाचे पाकीट झालं रितं रे’ व ती उत्तर देते की, ‘तांदळाच्या गोणी झाल्या रित्या रे’. म्हणजे लग्नाच्या वेळेस खूप खर्च झाला व पाहुण्यांच्या जेवणावळीत घरातील भात (तांदूळ) संपला. मात्र असे जरी असले तरी शेवटी ‘रामसिता व आपले परनु रामसिता’ असे उत्तर देतात. या ओळीतून लग्नासाठी खर्च झाला असला तरी मुलाचे लग्न केल्याचे समाधान व्यक्त होते. थोडक्यात, आदिवासी समाजातील मुलीच्या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांना खर्च करावा लागत नाही व मुलाचे आईवडीलसुद्धा खर्च झाला तरी मुलाचे लग्न केले व सून घरात आली याबद्दल समाधान व्यक्त करतात, असे दिसून येते.
प्रत्येक आई-वडील व मुलीचा भाऊ हे मुलीला लग्नाआधी खूप लाडाने, प्रेमाने लहानाचे मोठे करतात. त्यांची अशी इच्छा, अपेक्षा असते की, लग्नानंतर तिचे सासू-सासरे, दीर, ननंद, नवरा यांनीसुद्धा तिची त्याच पद्धतीने काळजी घ्यावी, तिच्यावर प्रेम करावे, तिचे लाड करावेत. हे चित्रण ‘वडाची वड पाना, पाना दुधानी सिंपेली’ या कोकणा बोलीतील लोकगीतातून आलेले आहे. याचा अर्थ वडाचे झाड हे पाण्याने नाहीतर दुधाने वाढविले आहे. त्याच पद्धतीने आम्ही मुलीला प्रेमाने वाढवले आहे.
‘हळदी गोळ गं आंबतील’ या कोकणा बोलीतील लोकगीतातून नवरीला लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावली जाते व तिच्या पायाच्या बोटात चांदीचे जोडवे, दंडात बाजूबंद व पायात तोरडी (पैंजण) घालतात व इतर स्त्रिया त्यावेळेत गाणी म्हणतात असे वर्णन आलेले आहे.
पारंपारिक समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांसाठी त्यांचे घर हेच त्यांचे विश्व असते. ‘बारजा’ म्हणजे नवरी या अतिशय सुंदर अशा लोकगीतांमध्ये नवीन लग्न होऊन आलेली मुलगी जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा तिला घरातील आधीच्या स्त्रिया गीतातून असे सांगतात की,
‘आयकून घे गुणाचे बारजाव’
(हे धृपद दोनदा आलेले असून नंतर प्रत्येक कडव्याच्या सुरूवातीला आलेले आहे.)
‘तुझे उंबरठेवर पाय नको लावजो
उंबरठेचे पायेशी पडजो’
‘तुझे जातेलं पाय नको लावजो
जातेचे पायेशी पडजो’
‘तुझे उखळालं पाय नको लावजो
उखळाचे पायेशी पडजो’
‘तुझे मारडीलं (शिडी) पाय नको लावजो
मारडीचे पायेशी पडजो’
‘तुझे कणगीलं पाय नको लावजो
कणगीलं पायेशी पडजो.’
उंबरठा आपल्या घराच्या मर्यादेशी संबंधित आहे. जाते, उखळ यात अन्नधान्यावर प्रक्रिया केली जाते. चुलीवर स्वयंपाक केला जातो. कणगी ही धान्य साठवण्याची वस्तू आहे. या वस्तूंशी स्त्रियांचा पुन्हा पुन्हा संबंध येतो. त्यांच्या जीवनात या वस्तूंना खूप महत्त्व आहे. म्हणून त्यांना पाय लावायचा नाही तर त्यांना नमस्कार करायचा, असे या लोकगीतातून सांगितलेले दिसून येते.
‘मनात काय येईना’ या लोकगीतातील एक स्त्री ही संसाराची खूप लोभी आहे. असे असले तरी तिच्या मनात विठ्ठलाविषयी भक्तीभाव आहे. तिच्या घरी आषाढ महिन्यात स्वत: विठ्ठल येतो. तेव्हा ती त्याला त्याच्यासाठी आंघोळीला तापी व गंगेचे पाणी देते. त्याला गावठी तांदळाचा भात बनवते. तोंडी लावायला जिरे व लवंगाची फोडणी दिलेली भाजी बनवते आणि त्याला हात पुसायला जरतारीचा रुमाल देते, असे वर्णन आलेले आहे. आदिवासी समाजात अलीकडे वारकरी संप्रदायाचा प्रसार-प्रचार होत आहे. आज आदिवासी भागातूनही लोक आषाढी-एकादशीला दिंडीला जातात. या लोकगीतातील स्त्री ही संसाराची लोभी आहे. ती दिंडीला जात नाही. पण तिच्या मनातील भक्तिभाव मात्र या लोकगीतातून व्यक्त होतो.
मुलीच्या लग्नानंतर ती सासरी नांदायला जाते. सासरी तिला चांगले सासू-सासरे, दीर, ननंद, नवरा मिळणे हा नशिबाचा भाग असतो. ‘पेटी इकडे वाजे पेटी तिकडे वाजे’ या लोकगीतात त्या स्त्रीला असे सांगत आहेत की, तू खूप नशीबवान आहेस. कारण तुला सासरी कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. तुला सासू ही आईसारखी, सासरा वडिलांसारखा, दीर भावासारखा, तर ननंद ही बहिणीसारखी भेटलेली आहे व सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात. एका स्त्रीच्या जीवनामध्ये याच्यासारखे सुख समाधान दुसरे कोणतेच नसते.
याच्या उलट ‘बापा दिलास रे’ या लोकगीतातील स्त्रीच्या सासरी तिला तिच्या सासरचे खूप त्रास देतात. तेव्हा ती आपले आई-वडील व भाऊ यांना ‘बापा दिलास रे’ लोकगीतातून म्हणते की,
‘बापा दिलास रे दिलास रे
वरले मुलकाल
बाप भाळीजला भाळीजला
दारूचे कोपाल
आई दिलास व वरले मुलकाल
आई भाळीजली जरीचे लुगडेल
भावा दिलास रे दिलास रे वरले मुलकाल
भाव भाळीजला भाळीजला
सरटचे पिसाल’
आदिवासी समाजात स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य आहे. पण तिने जर कुणालाही निवडले नसेल तर तिचे आई-वडील तिचे लग्न जमवतात. या लोकगीतातील स्त्री ही आपल्या भावाला व आई-वडिलांना तिला सासरी होणार्या त्रासासाठी दोष देते. तिच्या मते, तिचे वडील हे दारूच्या कपाला, आई ही जरीच्या लुगड्याला, तर भाऊ शर्टाच्या कापडाला भुलला. त्यामुळे त्यांनी आपले लग्न अशा घरात करून दिले. या गीतातून आदिवासींमध्ये मुलाकडचे मुलीच्या नातेवाईकांना कपडेलत्ते करतात, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
प्रत्येक मुलीला अथवा स्त्रीला भावाच्या लग्नाचे मोठे कौतुक व अप्रूप असते. भावाच्या लग्नप्रसंगी तिचीही लगबग व धावपळ सुरू असते. ‘भिंती सारवल्या शेणानी’ या लोकगीतात तो भाऊ म्हणतो की,
‘भिंती सारवल्या शेणानी
माझ्या लाडक्या बहिणीनी
त्यावर काढिल्या रांगोळ्या
त्यावर काढीला पोपट’
थोडक्यात, भावाच्या लग्नामध्ये या लोकगीतातील ती बहीण घर सजवत आहे. घर हे जुन्या पद्धतीचे व साधेच असल्याने ती भिंती सारवत आहे, त्यावर रांगोळ्या, पोपटाचे चित्र काढत आहे. भावाची आंघोळ घालते आहे. भावाच्या लग्नात तिची सारखी लगबग सुरू आहे.
‘आंदण देई रे भाऊराया’ नावाचे एक सुंदर लोकगीत वारली या बोलीभाषेत आहे. या गीतात बहीण आपल्या भावाला सांगते की, मी तुझ्याकडून जे मागणं मागते, ते तू मला दे. मग तो तिला विचारतो की, ‘काय देऊ ग बहिणी बया?’ यानंतर ती आपल्या भावाकडून जी मागणी मागते ते या लोकगीतातील तीन कडव्यांमधून आलेले आहे. ‘वासरासहित पाची गाया’, ‘उसासहित पानमळा’ व ‘बहिणीपरीस लेकीची माया’ अशी मागणी ती करते. प्रत्येक बहिणीला माहेरची माणसं खूप जवळची असतात. त्यात वडिलांचे निधन झालेले असेल तर मुलीला भावाचा आधार महत्वाचा असतो. म्हणून ती बहिणीपेक्षा मला तू लेकीची माया दे अशी मागणी करते.
निष्कर्ष –
१) जव्हार तालुक्यातील ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर, ढोरकोळी, मल्हारकोळी, वारली, कोकणा या बोलींमधून आदिवासी स्त्रीच्या भावभावनांचे, तिच्या समाजातील स्थानाचे, तिच्या स्वभावाचे सर्वांगीण असे चित्रण आलेले आहे.
२) आदिवासी स्त्री ही कुटुंबवत्सल, संवेदनशील असते. भाऊ, आई-वडील, पती, सासू-सासरे, दीर-नणंद यांच्याबद्दल तिच्या मनात अपर प्रेम, ममत्त्व असते, याचे चित्रण आदिवासी लोकगीतांमधून आलेले दिसून येते.
३) आदिवासी समाजामध्ये मुलीच्या लग्नप्रसंगी मुलीच्या घरच्यांना खर्च करावा लागत नाही. हुंडा द्यावा लागत नाही. सर्व खर्च मुलाकडचे करतात. त्यामुळे हुंडाबळीसारखे प्रश्न या समाजात नाहीत.
४) आदिवासी समाजातील लग्नांमध्ये मुलाकडच्यांना सर्व खर्च करावा लागत असला तरी मुलाचे लग्न व सुनेचे आगमन होत असल्याने ते आनंदाने तो सर्व खर्च उचलतात.
५) आदिवासी स्त्रीच्या मनातील माहेराविषयीची अनिवार ओढ अनेक लोकगीतांमधून व्यक्त झालेली दिसून येते.
६) आदिवासी स्त्रीच्या चारित्र्याबद्दल तिच्या नवर्याने जरी संशय घेतला तरी त्याच्याबद्दलचा तिच्या मनातील संताप आदिवासी बोलींमधील लोकगीतांमधून व्यक्त झालेला दिसून येतो.
७) आईवडिलांचे आपल्या मुलीबद्दलचे प्रेम, काळजी या लोकगीतांमधून व्यक्त होतेच. पण काही आई-वडील स्वार्थापायी आपल्या मुलीचे लग्न हे चुकीच्या किंवा मुलीसाठी त्रासदायक अशा घरातही करून देतात, असेही दिसून येते. अर्थात आपल्या मुलीला भविष्यात त्रास होईल, याची कल्पना आधी कुणालाच नसते.
८) घराचा उंबरठा, जाते, उखळ, चूल, कणगी यांचे स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थानाचे चित्रण काही लोकगीतांमधून आलेले दिसते.
संकलक –
- दिलीप मंगा थेतले, गाव- कुंडाचा पाडा, ‘क’ ठाकूर बोलीतील ‘फुलपाखरू’ व ‘इसाळा धंदा’ ही लोकगीते.
- सचिन लक्ष्मण वझरे, गाव- मु. कडाची मेट, पो. साकूर, वारली बोलीतील ‘गंठणाचा काळा मणी’, ‘काय देऊ गं बहिणी बया’ ही लोकगीते.
- कांचन परशुराम महाले, गाव- महालेपाडा, कोकणा बोलीतील ‘मुका’ (सई राजू महाले- वय ५०), ‘वडाची वड पाना पाना दुधानी सिंपेली’ (रखमी तुकाराम भोये- वय ६२), ‘हळदी गोळं गं आंबतील’ (राशी बाळू चौधरी – वय ६०) ही लोकगीते.
- ज्योत्स्ना हरी बोरसे, गाव- कालीधोंड, कोकणा बोलीतील ‘बारजा’ हे लोकगीत.
- मीना गायकवाड, तेलीचा पाडा, कोकणा बोलीतील ‘मनात काय येईना’, ‘पेटी इकडे वाजे पेटी तिकडे वाजे’, ‘भिंती सारवल्या शेणानी’, ‘बापा दिलास रे’ ही लोकगीते.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113