Dr. Rahul Rajani

कुंकू, टिकली व भिडे

कुंकू व संस्कृतीचा, धर्माचा संबंध जोडणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या.

● धर्माच्या व संस्कृतीच्या नावानेच या देशामध्ये स्त्रियांना भावीण, जोगतीणी म्हणून सोडले जायचे व त्यांचा उपभोग, लैंगिक शोषण ज्यांना ज्यांना शक्य होईल, ते

करायचे.

● धर्म व संस्कृतीच्या नावेच या देशातील नाडर समाजाच्या स्त्रियांना छाती, स्तन उघडे ठेवून समाजात सर्वत्र वावरावे, फिरावे लागायचे.

● धर्म व संस्कृतीच्या नावेच बालविवाह व्हायचे व विधवा झालेल्यांचे केशवपन, सती जाणे, त्यांना नंतर पुनर्विवाह नाकारणे अशा प्रथा अस्तित्वात होत्या. कल्पना करा, ज्या मुली बालपणातच किंवा तरुणपणातच विधवा झाल्या असतील त्यांनी त्यांचे आयुष्य पुढे कसे काढले असेल! त्यांचे किती लैंगिक कुपोषण किंवा शोषण झाले असेल. समाजाने, धर्माने, संस्कृतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक कामभावनेला शमविण्याचा समाजमान्य असा कोणताही पर्याय समोर ठेवलेला नव्हता.

● अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तेव्हा जरा आत्मपरीक्षण करा.

● कुंकू, टिकली लावायची की नाही लावायची हे आता स्त्रियांना ठरवू द्या व त्याचा संबंध संस्कृती, धर्म याच्याशी जोडू नका.

● त्या घरात-सार्वजनिक जीवनात जीन्स, टी शर्ट, ड्रेस, साडी, घरात गाऊन घालणे, टिकली/ कुंकू लावो न लावो, जोडवे/ मंगळसूत्र/ पैंजण वापरो किंवा न वापरो, केस छोटे-मोठे कशीही ठेवो, पण एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्यांचा सन्मान करा.

● संस्कृती, धर्म यांचे जतन, संवर्धन करण्याचे ओझे त्यांच्यावर लादू नका. आजच्या काळात त्याही शिकलेल्या आहेत, अनेक जणी परंपरा व आधुनिकता यात गोंधळलेल्या असतील. पण त्या सर्व बाबतीत निर्णय घ्यायला सक्षम आहेत.

● तसेच नीतिमान, सभ्य, उत्तम, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी धर्माची व आधारलेल्या संस्कृतीची आवश्यकता नाहीये. (धर्माने हजारो वर्षात काय काय केले आहे ते थोडे वाचले तरी कळते.) तर आधुनिकता, परिवर्तनावर विश्वास, स्वातंत्र्य, सर्व प्रकारची समता, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कबुद्धी, परस्पर आदर-सन्मान अशा काही गोष्टींची आवश्यकता आहे.

प्रश्न कुंकू, टिकली लावावी की नाही हा नाहीये. प्रश्न असा आहे की, कुंकू, टिकली न लावलेल्या मुलींशी, बायकांशी सार्वजनिक जीवनात वावरताना, त्या त्यांचा व्यवसाय, नोकऱ्या करताना त्यांच्याशी बोलायचे नाही का? त्यांना त्यांचे काम करू द्यायचे नाही का?
उद्या हे साडी नेसल्याशिवाय, नथ, पैंजण, पडदा, घुंगट असल्याशिवाय बोलू देणार नाहीत आणि तुम्ही यांचे फायदे सांगणाऱ्या पोस्ट टाकणार.

तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार भारत माता सधवा असेल तर तिचा पती कोण आहे?

भिडे गुरुजींच्या बऱ्याचशा विधानांवरून ते प्रचंड मागासलेल्या, बुरसटलेल्या, पुरुषप्रधान व कालबाह्य विचारांचे असल्याचे स्पष्ट होते.

(एका पोस्टवर प्रतिक्रिया)

© – डॉ. राहुल पाटील

Exit mobile version