Dr. Rahul Rajani

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

    मराठीमध्ये स्त्रियांनी तसे विपुल प्रमाणात साहित्यलेखन केलेले असले तरी ते सर्व स्त्रीवादी साहित्यात मोडत नाही. त्यापैकी बरेचसे साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांवर देखील प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांची एकूणच जडणघडण पुरुषप्रधान संस्कृतीतच झालेली असल्यामुळे पती किंवा प्रियकराविषयी प्रेम, पुरुषशरणता, स्वत:कडे

दुय्यम स्थान घेणे इ. आशय व्यक्त करणारे राहिलेले आहे. तरीही हळूहळू काळानुसार या आशयात बदल होत गेलेला असतो. 

    अगदी सुरुवातीपासून सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, विभावरी शिरूरकर यांसारख्या मोजक्या लेखिका अतिशय समर्थपणे सामाजिक व वैचारिक मांडणी करताना किंवा स्त्रियांचे दु:ख, वेदना, त्यांच्या मनातील खळबळ इ. चे चित्रण करताना दिसून येतात. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्वातंत्र्य, राज्यघटनेची निर्मिती, शिक्षणाचा प्रचार-प्रसार, स्त्रियांची जागतिक पातळीवरील आंदोलने यामुळे अनेक स्त्रियांना आत्मभान येऊ लागले व त्यातून त्यांच्या साहित्याच्या आशयातही कालानुक्रमानुसार बदल झालेला दिसून येतो. 

अ. कविता

    १९५० पर्यंतच्या काळात संजीवनी मराठे, शांता शेळके (वर्षा-१९४७), इंदिरा संत (शेला), लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी या महत्वाच्या कवयित्री असलेल्या दिसून येतात. संजीवनी मराठे यांचा पहिला काव्यसंग्रह ‘काव्यसंजीवनी’ हा १९३२ साली प्रकाशित झाला. यानंतर त्यांचे ‘राका’, ‘संसार’ व ‘छाया’ हे कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितेत भावनांची उत्कटता, आर्तता, भावुकता यांचे दर्शन घडते. तसेच प्रेम, कुटुंब, संसार यातील भावनांची अनुभूती हे त्यांच्या कवितांचे विषय आहेत. 

    या काळातील कवितांविषयी पुढील संदर्भ महत्त्वपूर्ण आहे. “पिता, पुत्र, पती आणि प्रियकर ही स्त्री जीवनातील शरीरनिष्ट अशी नाती आहेत. त्यातल्या त्यात ‘पती’ आणि ‘प्रियकर’ ही नाती अत्यंत नाजूक व आत्मिय आहेत. आपल्याकडे साहित्याला कलावंताच्या जीवनाचा आरसा मानण्याचा प्रघात आहे . त्यामुळे काही कवयित्रींनी आपले पूर्वायुष्यातील ‘प्रेम’ व ‘प्रियकर’ उघडकीस येऊ नये म्हणून पुरुषमुखी कविता लिहिल्याचे जसे जाणवते तसे त्यांच्या कवितेत पतीवरच प्रियकराच्या रूपाचे कलम केल्याचेही दिसते. कुठल्याही कलाकृतीची उंची ही त्या कलावंताच्या अभिव्यक्तीमधील प्रामाणिकपणावरच अवलंबून असते. त्यामुळे अशा कविता सत्त्व हरवल्यासारख्या भासतात, पतीबरोबर माहेर – सासरच्या भावना जशा व्यक्त होतात, तशा प्रियकरासमवेतच्या भेटीगाठी, रात्रीची विविध रूपे, निसर्गाचे नाना आविष्कार, आठवणी, शपथा व सहबासातील उत्कट सुख – दुःखाच्या स्मृती, दिली – घेतलेली वचने, प्रणयाने वेढलेली अतृप्त देहिक तडफड आणि विश्वासघाताने पाठ फिरवलेली फसवी क्षितिजे यांची अनेक उत्कट आणि उग्र चित्रे स्त्रियांच्या कवितांमधून व्यक्त झालेली दिसतात. अत्यंत वैयक्तिक अशा तरल संवेदनक्षम अनुभवातून ह्या कविता जशा व्यक्त झाल्या आहेत, तशा स्त्रीवर होणान्या अन्यायाच्या तीव्र निषेधातूनही.” (ग्रामीण, दलित व स्त्रीवादी साहित्य, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, पु. मु. २०१६, पृ. ९९) यातून स्त्रियांच्या साहित्याचे विषय, त्यांची वैशिष्ट्ये आलेली दिसून येतात. 

    पुढच्या काळात मात्र मल्लिका अमर शेख (वाळूचा प्रियकर), नीरजा, अश्विनी धोंगडे (स्त्रीसूक्त), रजनी परुळेकर (प्राजक्त फूल), अनुराधा पाटील (दिगंत), शैला सायनकर (रक्तकमळांचे रान) , पद्मा गोळे, अनुराधा पोतदार, शिरीष पै, सरिता पदकी, प्रभा गणोरकर, आसावरी काकडे, सुलभा हेलकर, निला भागवत, अंजली कीर्तने, सुमती लांडे, अरूणा ढेरे, सिसिलिया कार्व्हालो, प्रज्ञा लोखंडे, ज्योती लांजेवार, कल्पना दुधाळ इ. महत्वाच्या कवयित्री आहेत.

    अलिकडच्या कालखंडातील कवयित्री आपले शारीर अनुभव, दुःख, वेदना, ग्रामीण-शहरी जीवनात, आधुनिक समाजात त्यांची होणारी ससेहोलपट, कौटुंबिक जीवन जगताना होणार्‍या हालअपेष्टा, पुरुषप्रधान संस्कृतीत अनुभवायला येणारे दुय्यम स्थान याचे चित्रण करतात. 

आ. कथा व कादंबर्‍या- 

    स्त्रियांच्या कथांचा विचार करू जाता शांताबाई यांची १८९६ मध्ये ‘मासिक मनोरंजन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली कथा ही मराठीतील लेखिकेने लिहिलेली पहिली कथा होती व म्हणून शांताबाई या पहिल्या स्त्री कथाकार मानल्या जातात. त्यानंतर विभावरी शिरुरकर यांच्या ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह, ‘हिंदोळ्यावर’ ही कादंबरी यांनी खऱ्या अर्थाने स्त्रियांचे दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातील ताणतणाव, रूढी, परंपरा यामुळे त्यांचा होणारा कोंडमारा, सुशिक्षित व आर्थिक मिळकत असणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न  अतिशय धाडसाने आपल्या कथा कादंबऱ्यांमधून मांडले. स्त्रियांच्या स्त्री म्हणून असणाऱ्या भावभावनांचे एवढे समर्थ व बंडखोर चित्रण त्या आधी कोणत्याही स्त्री अथवा पुरुष लेखकांच्या साहित्यात आलेले नाही.

    त्यानंतर  कुसुमावती देशपांडे, वसुंधरा पटवर्धन,  गीता साने,  (हिरवळी खाली – कादंबरी), प्रेमा  कंटक, शकुंतला परांजपे, मालतीबाई दांडेकर, सुधा साठे या कथा व कादंबरी लेखिका आपल्याला १९५० पर्यंत स्त्रियांचे अनुभवविश्व आपल्या साहित्यातून मांडताना दिसून येतात. नंतरच्या काळात गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, कमल देसाई, उर्मिला पवार, प्रिया तेंडुलकर, कविता महाजन, प्रतिमा इंगोले, छाया दातार, अंबिका सरकार, शांता गोखले इत्यादी महत्त्वाच्या लेखिका आपल्याला कथा-कादंबऱ्या लिहिताना दिसून येतात. त्यांच्या साहित्यातून वैवाहिक, कौटुंबिक जीवनातील विविध अनुभव, प्रश्न, विवाहबाह्य, विवाहपूर्व संबंध, पतीबद्दलचे विविध अनुभव, पुरुषासोबतची मैत्री, लैंगिक अनुभव, नोकरी करतानाचे विविध प्रश्न, कुमारी माता, शरीरकेंद्री अनुभव, पती व इतर पुरुषाकडून मिळणारी दुय्यम व अन्यायकारक  वागणूक, स्त्री-स्वातंत्र्य अशा विविध विषय हाताळलेले दिसून येतात.

इ. आत्मचरित्रे –

    मराठी साहित्यात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणावर आत्मचरित्रे लिहिलेली आहेत. या आत्मचरित्रांमधून त्यांनी आपल्या व्यथा, वेदना, दुःख व्यक्त केलेले दिसून येते. त्याचप्रमाणे बऱ्याचशा आत्मचरित्रांमधून त्यांच्या स्वतःबद्दल कमी तर नवऱ्याबद्दलच जास्त माहिती आलेली असते. आपला पती कसा कर्तबगार आहे, त्याचे राजकीय, सामाजिक किंवा साहित्यिक क्षेत्रातील कार्य, मोठेपण व्यक्त करण्यासाठी बऱ्याच लेखकांनी आत्मचरित्रांचे लेखन केलेले दिसते. 

    १९५० मध्ये रमाबाई रानडे यांनी लिहिलेले ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र मराठीत स्त्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र म्हणता येईल. त्यानंतर पार्वतीबाई आठवले (माझी कहाणी – १९२८), लक्ष्मीबाई टिळक (स्मृतिचित्रे -१९३४), शांता आपटे (जाऊ मी सिनेमात – १९४०), आनंदीबाई कर्वे (माझे पुराण -१९४४), लीलाबाई पटवर्धन (आमची अकरा वर्ष -१९४५) अशा अनेक आत्मचरित्रांची नावे घेता येतील. यातील ‘स्मृतिचित्रे’ हे महत्त्वाचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रामधून पतीबदल प्रेम, समर्पणशीलता, लिंगभाव, पतीनिष्ठा, पतीसोबतच्या आठवणी इत्यादी गोष्टी प्रामुख्याने व्यक्त झालेल्या आहेत.

    स्वातंत्र्योत्तर काळात गोदावरी परुळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ (१९७०), शीलवती केतकर यांचे ‘मीच हे सांगितले पाहिजे’ (१९६९), हंसा वाडकर यांचे ‘सांगते ऐका ‘ (१९७२), माधवी देसाई यांचे  ‘नाच गं घुमा’,  सुनिता देशपांडे  यांचे ‘आहे मनोहर तरी’, मल्लिका अमर शेख यांचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ (१९८४), कुमुद पावडे यांचे ‘अंतःस्फोट’ (१९८१) ही महत्त्वाची आत्मचरित्रे आहेत. यातून स्त्रियांनी आपल्या वाट्याला आलेले भलेबुरे अनुभव, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांना प्राप्त झालेले आत्मभान, त्यातून वेदना व विद्रोह व्यक्त करणारे आहेत. 

    शांताबाई कांबळे यांचे ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ (१९८६), बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमुचं’, नजुबाई गावित यांचे ‘आदोर’ (१९९५) ह्या आत्मचरित्रांमधून दलित, आदिवासी स्त्रियांच्या वाट्याला येणारे विदारक अनुभव व्यक्त झालेले आहेत. 

सारांश

    स्त्रियांच्या वरील सर्व साहित्यातून स्त्रीवादी जाणिवा जरी व्यक्त झालेल्या नसल्या तरी स्त्रियांचे अनुभव, भाव-भावना, त्यांचा सामाजिक कौटुंबिक जीवनातील संघर्ष, करियर, आर्थिक मिळकत करणाऱ्या स्त्रियांचे विविध अनुभव आलेले आहेत. जे पुरुष कल्पना करूनही मांडू शकत नाहीत, अशा स्त्रीविशिष्ट अनुभवांचे दर्शन आपल्याला या साहित्यात घडते. हे या स्त्रीवादी साहित्याचे मोठेच बलस्थान मानावे लागेल. 

©Copyright

डॉ. राहुल रजनी

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

Exit mobile version