Dr. Rahul Rajani

आनंदाचे डोही, आनंद तरंग – बुद्धविचारांच्या संग

             माझे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे की, मला एखाद्या गोष्टीचा जेवढा त्रास होतो किंवा कुणीतरी मला त्रास देतं, माझे जेव्हा काहीतरी नुकसान होते, माझ्यासाठी परिस्थिती प्रतिकूल बनत जाते तेव्हा मला त्या गोष्टींचा उलट खूप फायदा होतो. कारण त्या गोष्टींनी

मी खचून जात नाही. तर उलट मला स्वतःला आतून अधिक मजबूत बनविण्यासाठी त्यांचा वापर करून घेत असतो. अशा गोष्टींमुळे मीही काही काळ अस्वस्थ, बैचेन होतो. पण त्यातून मी लगेच सावरतो.

             दुःख, संकटं, नुकसान, अपमान, अपयश, आपल्याबद्दलचा अपप्रचार, फसवणूक या गोष्टी सुरूच असतात. त्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून त्यांचा स्वीकार करायला हवा. म्हणजे हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. मी ते स्वीकारतो. या कटू प्रसंगांकडे मी अनुभव म्हणून पाहतो. हे अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातात. अशा प्रसंगांतून  काहीतरी शिकून मी पुढे मार्गक्रमण करीत असतो. हे प्रत्येकाला नाही जमत. काही जण ‘असे माझ्याच बाबतीत का घडले? मी कमनशिबी आहे’, असा विचार करून स्वतःलाच त्रास करून घेतात. व्हायबल होतात. अशा गोष्टींना कुणाला तरी जबाबदार धरतात. मग त्या व्यक्तीवर डुख धरतात. सूड भावना, द्वेष, तिरस्कार अशा नकारात्मक गोष्टींना बळी पडतात व मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात.

म्हणून परिस्थिती कशीही असो, कुणी आपल्याशी कसेही वागो आपण मनाने दुर्बल, कमकुवत होता कामा नये व आपली ऊर्जा अशा नकारात्मक गोष्टींमध्ये वाया घालवता कामा नये. आपल्या जीवनाचे काही एक ध्येय असायला हवे व त्यावरील आपले लक्ष विचलित होऊ देऊ नये. माझेही एक ध्येय राहिलेले आहे. ते म्हणजे ‘जीवन खूप सुंदर आहे. मी त्याला अधिक सुंदर बनविणार!’

           अलीकडे काही दिवसांपासून मी काहीसे असेच कटू अनुभव घेत आहे. तेव्हा या गोष्टींना कसे सामोरे जायचे, अशा परिस्थितीत कसे वागायचे त्याबद्दल मी विचार, चिंतन करत असताना मला बुद्धाचे व संतांचे विचारच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात, हे लक्षात आले आणि मी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथातील बुद्धाच्या विचारांचे, संदेशाचे वाचन, त्यांचे मनन व चिंतन सुरू केले व मला त्यातून खरोखर दररोज खूप आनंद मिळतो आहे. म्हणजे कटू अनुभवांचा, मनाविरुद्ध गोष्टींचा मला पुन्हा एकदा माझ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे फायदा होतो आहे.

            गूळ कोणत्याही बाजूने खा तो गोडच लागतो. सूर्याचा एक किरण अंधाराचा नाश करून टाकतो. तसा बुद्धविचार आहे. त्याच्या सानिध्यात ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असा एक सुखद अनुभव घेता येतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, व्यक्ती, वास्तव याकडे पाहण्याचा एक व्यापक व नवा दृष्टिकोन प्राप्त होतो. यामुळे पुण्य वगैरे पदरी पडते असे नाहीये.

यातून मला जगण्याचे तत्त्वज्ञान, उच्च-शाश्वत अशी मानवी मूल्ये कळत आहेत. त्यामुळे मनावर सुसंस्कार घडत आहेत. सदाचाराने कसे वागावे, कठीण परिस्थितीतही आपले चित्त, एकाग्रता ढळू न देता, तक्रार न करता शांत पण ठामपणे कसे जगावे, हे समजत आहे.

मी हे आधीही वाचले होते. पण हे नित्यनूतन आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर, वेगवेगळ्या परिस्थितीत आपण यातून नवीन काहीतरी शिकत असतो आणि म्हणून मी त्या सर्व व्यक्तींचा, परिस्थितीचा खूप आभारी आहे. कारण त्यांच्यामुळे मी आधीपेक्षा या वेळेस बुद्धाच्या अधिक जवळ गेलो आहे.

भवतु सब्ब मंगलं!!!

 

धन्यवाद!

© राहुल 

Exit mobile version