Dr. Rahul Rajani

विद्यार्थिधर्म म्हणजे काय?

मित्रांनो,

मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत

असताना मिळवले आहे.

यासाठी मी कोणत्याही पूजाअर्चा, विधी, मूर्ती-लिंगावर पाणी टाकणे, उपास-तापास, आध्यात्मिक गुरू-बाबा करणे, पदयात्रा, आरत्या, कीर्तने यांना उपस्थिती इ. धार्मिक, आध्यात्मिक गोष्टी केल्या नाहीत. (हे सर्व धर्मांना लागू होते.)

नाही म्हणायला मी २००३-२००५ दरम्यान स्वाध्याय केंद्रात जायचो. दुसऱ्या गावात जाऊन केंद्र चालवायचो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तेही खूप मनापासून केले. पण त्यातील अर्थशून्यता मला एम.ए. करत असताना अभ्यासातून, वाचनातून लगेच लक्षात आली व मी ते पूर्णपणे त्याज्य केले.

मित्रांनो, विद्यार्थ्याचा एकच धर्म असतो व तो म्हणजे विद्यार्थीधर्म. ह्या धर्माचे पालन करणे म्हणजे नियमितपणे सातत्यपूर्ण वाचन, प्रशिक्षण, तासिकांना उपस्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांच्यात अभ्यास, अभ्यासू शिक्षक, मार्गदर्शक यांच्याशी चर्चा, चिंतन इ. गोष्टी करणे. यात न चुकणे, नेहमी काही ना काही शिकत राहणे, नवीन कल्पना, संकल्पना इ. वर काम करणे, संशोधकवृत्ती जोपासणे, नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे व जीवनात त्यांचा वापर करणे.

या प्रक्रियेतून बाहेर पडल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या त्या क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्ती घडत नाही.

यासोबत सहज श्रद्धा असेल तर हरकत नाही. पण त्यामुळे मला काहीतरी मिळेल व मिळत आहे, अशी आशा बाळगणे व कर्मकांडे करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे.

आता तुम्हीच ठरवा की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे.

(मी किती यशस्वी आहे, हे सांगणे या पोस्टचा हेतू नाही. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी यातून करिअर, शिक्षण या गोष्टींचा व देवाधर्माचा काही संबंध नसतो, हे लक्षात आणून देणे, हा या पोस्टमागील हेतू आहे.

कारण गावात (नाशिकसारख्या शहरातही) छोट्या छोट्या मुलांना त्या प्रदीप मिश्रा व इतरांची बडबड ऐकून शिवलिंगावर दररोज पाणी टाकायला जाताना पाहत आहे. त्याचप्रमाणे बैठका, स्वाध्याय, पारायणे, तीर्थयात्रांची नियोजने या माध्यमातून लोकांना दैववादी, स्थितीशील, पुराणमतवादी, निर्बुद्ध बनविण्याची कारस्थाने सुरू आहेत. म्हणून हा प्रपंच केला. बाकी कुणी काय घ्यायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे.)

आपलाच शुभचिंतक,

Exit mobile version