मीही सुवर्णपदक परत करणार होतो!

मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा

असायची, तिथे मला दुसरा क्रमांक दिला जायचा व दोन जागा असतील तिथे तिसरा. याचा अर्थ तुम्ही समजू शकता.

मुलाखती देऊन देऊन मी वैतागलो होतो. विद्यापीठाकडून जे कुलगुरूनियुक्त प्रतिनिधी तसेच विषयतज्ज्ञ मुलाखती घ्यायला यायचे, तेही संस्थेला मॅनेज केलेल्या उमेदवारांची निवड करून निघून जायचे. तेही काही करू शकत नव्हते. तेव्हा माझ्याही मनात माझे दोन्ही सुवर्णपदक विद्यापीठाला परत करण्याचा विचार येऊ लागला होता. पण गोखले एज्युकेशन सोसायटीने फक्त मुलाखतीच्या माध्यमातून माझी निवड केली व मी या दुष्टचक्रातून बाहेर पडलो.

आज ५०-५५ लाख रुपये घेतल्याशिवाय साहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड केली जात नाही. गोखले एज्युकेशन सोसायटीसारख्या मोजक्या संस्था सोडल्या तर ९०% संस्था डोनेशन घेतात. पण कुणीही नेट/ सेट उत्तीर्ण विद्यार्थी, तासिका तत्वावर काम करणारे उमेदवार याविरोधात आवाज उठवत नाहीयेत. कारण बिचाऱ्यांना या व्यवस्थेत यायचे आहे व सध्यातरी त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. तसेच जवळपास सर्वच संस्था सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने ते या व्यवस्थेत खूप मोठा उठाव झाल्याशिवाय बदल घडवून आणणार नाहीत. पण या व्यवस्थेत बदल व्हायला हवा. जर गरिबांची व तुमची, माझी सर्वांचीच मुले विनावशिला व विनाडोनेशन सन्मानाने फक्त मेहनत करून या व्यवस्थेत यायला हवीत, असे वाटत असेल, आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असे वाटत असेल तर समाजातील सर्वांनीच ही व्यवस्था बदलण्यासाठी एकदा खूप मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

(वस्तुस्थिती – महाराष्ट्रात आज किमान १५००० मुलं-मुली नेट, सेट, पीएचडी आहेत व अतिशय कमी वेतनावर नोकरी करीत आहेत. पर्मनंट नोकरी मिळत नाही, डोनेशनअभावी मिळू शकत नाही म्हणून अनेकांनी आत्महत्या करून घेतल्या आहेत. त्यांना बऱ्याचदा फुकटात राबवून घेतले जाते. कुणीही काहीही काम सांगतो. अनेक जण ३०-३५ वर्षांचे होऊन गेले तरी त्यांचे लग्न होत नाहीये. ज्यांची झाली आहेत त्यांना घर चालवणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य इ. करणे मुश्कील होऊन बसलेले आहे. वर्षानुवर्षे कोंडी फुटत नाहीये. काहीही मार्ग दिसत नाहीये. अतिशय नैराश्यग्रस्त जीवन जगत आहेत. हे आम्ही रात्रंदिवस बघत आहोत.

त्यांना डोनेशनशिवाय नोकरी मिळण्याची कोणतीही व्यवस्था नाहीये. सिस्टिममधील सर्व घटक मॅनेज आहेत. महाराष्ट्र सरकार वर्षानुवर्षे पदभरती करत नाहीये. माझ्या ओळखीचे अनेक जण १५-२० वर्षांपासून विनाअनुदानित/ तासिका तत्त्वावर काम करत आहेत. त्यांची वेदना समजून घेणे गरजेचे आहे. उद्या आपल्या घरातही असा कुणी तयार होऊ शकतं.

आपल्या देशात समाजाच्या उभ्या-आडव्या रचनेमुळे एकाचे दुःख दुसऱ्यापर्यंत पोहचत नाही. म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्यामागे इतर घटक फार मोठ्या संख्येने उभे राहत नाहीत. म्हणून सगळेच दुःख सहन करतात. त्यामुळे happy indexमध्ये आपले स्थान अतिशय खाली आहे.)

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *