‘चिमण्या’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेखाचा आशय

        ‘चिमण्या’ हा ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील अतिशय लहानसा असा लेख आहे. या लेखातून लेखकाने चिमण्यांचे भावविश्वदेखील रेखाटलेले आहे. एखाद्याचे घर उद्ध्वस्त केल्यावर ते कायमस्वरूपी आपला राग धरतात, हे चिमण्यांच्या माध्यमातून लेखकाने स्वानुभवातून या ठिकाणी मांडलेले आहे. चिमण्यांचा स्वभाव हा या बाबतीत माणसांच्या स्वभावाशी मिळता-जुळता असतो, हे आपल्याला हा लेख वाचल्यावर लक्षात येते.

         लेखकाच्या घरात नेहमी चिमण्या यायच्या. पण लेखक आतापर्यंत त्यांना वैतागलेला नव्हता. या आधी त्या त्यांची घरटी

लेखकांची पुस्तके, बाहुल्या, फ्लॉवरपॉट्स या ठिकाणी तयार करत होत्या. पण या वेळेस त्यांनी त्यासाठी लेखकाचा ऑईलपेंटवाल्या फोटोवर घरटे तयार करायला सुरुवात केलेली होती. लेखकाला हा फोटो अतिशय प्रिय होता. या आधी दोन-चार चिमण्यांचे येणे, काड्या वगैरे आणून घरटी तयार करणे, चिवचिवाट करणे याकडे लेखकाने कानाडोळा केलेला असतो. पण लेखकाला आता ते सहन होत नाही व तो त्यांना पळवून लावण्याचे प्रयत्न करू लागतो.

           त्या घरातच येऊ नयेत, म्हणून लेखक सुरुवातीला दारे, खिडक्या बंद करून घरात बसतो. पण असे किती वेळ बसणार? त्यात पुन्हा त्या खिडक्यांच्या काचांवर चोची मारतात. त्या आवाजाने लेखक अस्वस्थ होतो. त्यात पुन्हा त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागते. मग लेखक त्या घराचे व्हेन्टीलेटर्स उघडतो. तर त्यातून चिमण्या येऊ लागतात. मग आता तो हातात काठी घेऊन  त्यांच्यावर पाळत ठेवू लागतो. त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. पण पुन्हा असे किती वेळ करणार? मग तो त्यांचे घरटे निपटून घराबाहेर फेकून देतो. हे पाहून चिमण्या बाहेर आक्रोश करतात. पण त्या दिवशी मात्र घरात येत नाहीत.

          त्या दिवशी सैन्यातून निवृत्त झालेला बाळू वैद्य लेखकाकडे येतो. तोही एकदा अशाच पद्धतीने चिमण्यांच्या त्रासाने हैराण झालेला असतो. मात्र त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तो एअर गन घेऊन तिने पाच-दहा चिमण्या मारून टाकतो. त्यांनतर त्या पुन्हा बाळूकडे फिरकत नाहीत. पण चिमण्यांच्या बाबतीत त्यांचा खून करण्यापर्यंतचा क्रूरपणा करणे लेखकाला शक्य नसते.

            दुसऱ्या दिवशी चिमण्या पुन्हा यायला लागतात व मोडलेले घरटे तयार करायला सुरुवात करतात. आता काय करावे असा प्रश्न लेखकाला पडतो. तेव्हा त्याला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे चिमण्यांचे घरटे जर उपटून टाकले व अंगणात जाळले की त्या पुन्हा त्या वास्तूत येत नाहीत. लेखक दुपारी तसे करतो. ते छोटेसे घरटे अंगणात नेऊन जाळून टाकतो.

           दुसऱ्या दिवशी एकही चिमणी लेखकाच्या घरात येत नाही. लेखकाला आनंद होतो. पण तो आनंद जास्त वेळ टिकत नाही. लेखक अस्वस्थ होऊ लागतो. चिमण्या अंगणात नाहीत, घरात नाहीत. असे का? म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ काय? असे प्रश्न लेखकाला पडू लागतात. ‘त्यांचे घरकुल आपण पेटवून दिले म्हणून त्यांनी आपल्यावर बहिष्कार तर टाकला नाही ना?’ असा विचार लेखकाच्या मनात येऊन जातो. लेखक दलित जातीत जन्माला आलेला असल्याने माणसांनी त्यांच्यावर, त्यांच्या जातीवर टाकलेल्या बहिष्काराचे अनुभव लेखकाने अनेकदा घेतलेले असतात. ते पचवलेलेही असतात. पण आता चिमण्यांनीही आपल्यावर बहिष्कार टाकला की काय असे लेखकाला वाटू लागते व संतापाच्या भरात त्यांचे घरकुल जाळून आपण त्यांचा अपराध केलेला आहे, अशी अपराधी भावना त्याच्या मनाला जाचू लागते. लेखकाला आता पश्चाताप होतो. पण माणसांच्या जगात ज्या पद्धतीने क्षमा मागता येते व समोरचा माफ करू शकतो, तशी सोय प्राण्यांच्या जगात असेल का? असा प्रश्न लेखकाच्या मनात येतो. बाळू वैद्य व त्याचे कृत्य हे सारखेच क्रोर्याचे आहे, असे आता लेखकाला वाटू लागते.

            आपण लहान मुलांना चिऊ-काऊची गोष्ट सांगतो. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींनीदेखील सांगितलेली अशीच चिमण्यांची गोष्ट लेखकाला आठवते. अशा अतिशय गरीब, चिमण्यांच्या घराची वाताहत आपण केली म्हणून लेखकाला अपराध्यासारखे, गुन्हेगारासारखे वाटू लागते. त्यांनी लेखकावर टाकलेला बहिष्कार त्याला असह्य होतो. चिमण्यांनी पुन्हा आपल्या घरात यावे म्हणून मुठभर तांदूळ घेऊन तो अंगणात टाकतो; पण एकही चिमणी येत नाही. यामुळे लेखक खूप अस्वस्थ होतो. त्यांना घरात येऊन त्या फोटोवर घरटे बनवायला सोपे जावे म्हणून लेखक त्या फोटोवर एक डबा ठेवतो. तरीही चिमण्या येत नाहीत. लेखकाने चिमण्यांचे घरटे जाळलेले असते, आपला फोटो बघून त्या येत नसाव्यात म्हणून लेखक स्वतःचा फोटोच तेथून हलवतो. तेव्हा कुठून तरी चिवचिव आवाज येतो. लेखकाला खूप आतून बरे वाटते. तो तिला बघण्यासाठी, जणू तिच्या स्वागतासाठीच त्याची सारी शक्ती एकवटून उभा राहतो. पाहतो तर एक अनोळखी चिमणी क्षणभर लेखकाच्या दारात उभी असते. पण तेवढ्यात चिमण्यांचा एक कळप झंझावातासारखा येऊन तिला आपल्यासोबत घेऊन जातो. लेखक ते पाहत राहतो.

            लेखकाने त्याच्या आयुष्यातील हा अनुभव या लेखातून या ठिकाणी मांडलेला आहे. आपण चिमण्यांच्या बाबतीत असे क्रूर वागलो व त्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकला, याचे दु:ख, खंत लेखकाला पुढे कायमस्वरूपी राहून जाते. पुढे तो जेव्हा लहान मुलांना चिऊ-काऊच्या गोष्टी सांगायचा तेव्हा त्याला या घटनेची आठवण यायची व आपण एकीकडे त्यांच्या गोष्टी सांगतो, पण आपणच कधीकाळी त्यांच्या घराला आग लावली होती, याची आठवण लेखकाला येत राहते व या स्वतःच्या वागण्यातील विसंगतीने त्याचे मन त्याला आतून कुरतडत राहते.

 

डॉ. राहुल पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *