स्त्रीवाद, स्त्रीवादी साहित्य : संकल्पना

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क

डावललेले आहेत. हजारो वर्षे स्त्रियांनी हे दुय्यम स्थान, त्यामुळे होणारे शोषण निमूटपणे सहन केले. पण विसाव्या शतकात त्यांना आपल्या हक्कांची जाणीव झाली. आपल्या हक्कांसाठी त्यांनी जागतिक पातळीवर संघटना सुरू करून लढे द्यायला सुरुवात केली. सीमॉन द बोव्हार, एलिझाबेथ गॅस्केल, एमिली ब्राँटी व शार्लट ब्राँटी, शार्लट गिलमन, व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकांनी जागतिक पातळीवर स्त्रीवादाची पायाभरणी केली. जागतिक पातळीवर १९६० नंतर तर मराठीमध्ये १९६० नंतर स्त्रीवादी साहित्य या साहित्यप्रवाहाला सुरुवात झालेली दिसून येते. 

स्त्रीवाद : संकल्पना – 

    स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी स्त्रियांचे समाजातील नेमके स्थान काय आहे, हे समजून घ्यावे लागते. आपल्या कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये मुलगा व मुलगी, स्त्री व पुरुष असा स्पष्ट भेद केला जातो. जन्माला येणाऱ्या बाळापैकी एकाला मुलगा व एकाला मुलगी म्हणून वागणूक दिली जाते. त्याच पद्धतीने त्यांची जडणघडण केली जाते. त्यांचे कपडे, हसणे, बोलणे, वागणे, दिसणे या माध्यमातून त्यांना वेगवेगळे घडवले जाते. मुलींना नातेसंबंधांची जपणूक करायला, आपल्या नात्यातील लोकांची मर्जी संपादायला शिकवले जाते. विवाह हा विधी दोन व्यक्ती तसेच दोन कुटुंबांना जवळ आणणारा असला तरी मुलीलाच मुलाकडे नांदायला जावे लागते. अशा प्रकारे स्त्रियांना दुय्यम व कनिष्ठ पद्धतीने समाजात स्थान दिले जाते. यातूनच मग स्त्रीवाद म्हणजे काय?  हे लक्षात येते. 

    स्त्रीवाद म्हणजे काय? हे ‘ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी साहित्य’ ह्या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे. ते असे – “स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला आपल्या स्वत्वाची जाणीव होणे. तिला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ कळणे. तिला तिच्या अस्मितेचा सार्थ अभिमान वाटणे. तिला तिच्या माणूसपणाबद्दल आत्मियता वाटणे. तिला तिचे हक्क-अधिकार कळणे. तिला तिच्या अवमूल्यनाची आणि शोषणाची जाणीव होणे. तिने आपल्या दडपल्या जाणार्‍या स्वत्त्वासाठी संघर्षप्रवण होणे म्हणजे स्त्रीवाद होय. स्त्रीने ‘बाईपणाची’ कात टाकून ‘माणूसपणाचे’ नवे रूप धारण करणे म्हणजे स्त्रीवाद होय. स्त्रीला तिच्या गुलामीची जाणीव होणे आणि तिने आपल्या गुलामीविरुद्ध बंड करणे ह्यालाच ‘स्त्रीवाद’ असे नाव देता येईल” (ग्रामीण, दलित, स्त्रीवादी साहित्य, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, पु. मु. २०१६, पृ. १११-११२)

स्त्रीवादी साहित्य: संकल्पना- 

    मराठीमध्ये स्त्रियांनी विपुल प्रमाणात साहित्य लिहिलेले आहे. मात्र त्यांनी लिहीलेल्या सर्व साहित्याला ‘स्त्रीवादी साहित्य’ म्हणता येणार नाही. पुरुष लेखकांनी सुद्धा स्त्रियांच्या समस्या, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. मात्र असे असले तरी पुरुषांच्या साहित्यामध्ये स्त्रियांच्या खर्‍याखुर्‍या समस्या, त्यांचे मन यांचे वास्तव चित्रण असूच शकत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांनी कसे वागावे, त्यांचे एकूणच वर्तन कसे असावे, याबद्दल काही निश्चित असे नियम तयार झालेले असतात. अशा व्यवस्थेत स्त्रीमुक्तीचा विचार मांडू पाहणार्‍या पुरूषांचे मनदेखील या व्यवस्थेत तयार झालेले असते. म्हणून त्यांच्यासमोरसुद्धा स्त्रीची एक आदर्श अशी प्रतिमा असते. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये अशा आदर्श स्त्रीचे नमुनेच रंगवलेले असतात. 

    ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला देखील मन आहे, ती स्वतंत्रपणे विचार करू शकते, तिचे शारीर व लैंगिक स्वरूपाचे वेगळे अनुभव, मते, अपेक्षा असू शकतात, हे त्यांना कळू शकत नाही. म्हणून पुरुषांच्या साहित्यातून स्त्रियांचे झालेले चित्रण हे चुकीचे, विपर्यस्त, खोटे असू शकते. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या उक्तीप्रमाणे केवळ स्त्रियाच स्त्रियांचे अनुभव, भावभावना यांचे यथायोग्य वर्णन करू शकतात. म्हणून स्त्रियांनी, स्त्रियांच्या प्रश्नांविषयी, स्वत्वाचा शोध घेत लिहिलेले साहित्य म्हणजे ‘स्त्रीवादी साहित्य’ असे म्हणता येईल. 

व्याख्या-

“ज्यात स्त्रियांचे स्त्रियांनी केलेले चित्रण आहे, ते साहित्य म्हणजेच स्त्रीवादी साहित्य.”

“स्त्रियांचे स्वत:संबंधीचे साहित्य, ज्यातून ‘स्व’च शोध घेतला आहे आणि जे ‘स्व’त्वाच्या जाणिवेने लिहिलेले आहे, असे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य”

 

© Copyright

डॉ. राहुल रजनी

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw 

One thought to “स्त्रीवाद, स्त्रीवादी साहित्य : संकल्पना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *