‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका

‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/

स्त्रिया व एक तृतीयपंथी तरुण यांच्या जीवनसंघर्षाचे चित्रण या मालिकेत करण्यात आलेले आहे. हे कुठेही घडू शकते. म्हणजे हे सामाजिक, कौटुंबिक वास्तव भारतात, भारतीय कुटुंबातदेखील आपल्याला बघायला मिळू शकते.

अतिशय सुंदर कथानक, दैनंदिन जीवनातील घटनाप्रसंग, व्यक्तिरेखा, अर्थपूर्ण व विचारप्रवृत्त करणारे संवाद, अलीकडच्या काळातील भारतीय मालिकांमधील धक्कातंत्रे, वास्तवापासून फारकत, वरून-खालून-उजवीकडून-डावीकडून-मागून-पुढून फ्लॅश मारून, कधी स्लो, कधी फास्ट चित्रीकरण इ. दोषांचा अभाव ही या मालिकेची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून मालिकेच्या सर्व घटकांच्या मांडणीत गुणवत्ता बघायला मिळते.

या मालिकेतील पात्रांची भाषा उर्दू आहे. पण हिंदी समजणाऱ्या भारतीयांना ही भाषा अतिशय सहजपणे समजते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून ही मालिका बघू शकतात, इतकी चांगली ही मालिका आहे.

स्त्रीवाद नेमका काय व कसा असतो, स्त्रियांना जगताना कोणकोणत्या प्रश्नांना, समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातून त्या कसा मार्ग काढतात, स्वतःचे स्त्रीत्व, आत्मभान जपून स्वतःला सिद्ध करतात, हे समजून घेण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरू शकते.

या मालिकेतील व्यक्तिरेखा एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात, एकमेकांना मदत करतात. नातेसबंधांमधील उत्कटता, समृद्धता तुम्हाला ही मालिका बघताना जाणवेल.

या मालिकेचे टायटल साँग खूप सुंदर व प्रेरणादायी आहे. ‘कोशिश करले यारा, हे तेरा जहाँ सारा, तू उड जा बेफिकर, बेफिकर, बदले चाहे सितारा, तू बदले वक्त की धारा, खुद से भी ना तू डर बेफिकर’

तेव्हा प्रत्येकाने नक्की ही मालिका बघा व काहीतरी चांगले बघितल्याचा अनुभव घ्या.

© डॉ. राहूल पाटील

लिंक खाली दिल्या आहेत.
एपिसोड पहिला- https://youtu.be/FIOkTk_ml3w

एपिसोड दुसरा- https://youtu.be/YNpNd2CVg_Q

एपिसोड तिसरा- https://youtu.be/mLTLfBsZPH0

एपिसोड चौथा- https://youtu.be/SQPgmwZ7GvA

एपिसोड पाचवा- https://youtu.be/DsLl8OtCqHA

एपिसोड सहावा- https://youtu.be/s4JMcsMC1dg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *