विठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने…

बा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून, माणसांच्या मुखातून तुझेच ध्वनी बाहेर पडतात!

इथल्या मातीत जीवनरस तूच ओतलेला आहेस!
तूच इथे संतांची मांदियाळी निर्माण केलीस. त्यांची माय व बापही झालास. तुला समोर ठेवून ज्ञानोबा, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई

कान्होपात्रा, साने गुरुजी, गाडगेबाबा अशा असंख्य संतांनी इथली वैचारिक भूमी नांगरून काढली. या जमिनीत समतेचे, बंधूतेचे, विवेकाचे, सद्विचारांचे पीक पेरले व विषमता, अंधश्रद्धा, कर्मकांडे, ग्रंथप्रामाण्य यांचे तण त्यांनी उपटून टाकले. इथे एक उत्तम संस्कृती निर्माण केली.

आमच्या संतांनी तुला मायबाप तर मानलेच. पण तुला सखा, प्रेयसी, प्रियकरदेखील मानले. तू त्यांचा सर्वस्व होतास. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालवीशी हाती धरूनिया’ ही भावना उरी घेऊन आमचे संत जगले. तुझ्या आधाराने त्यांनी आयुष्यातील सुखदुःख, अपमान, अवहेलना, शारीरिक यातना, वेदना सहन केल्या आणि समाजाला दया, प्रेम, शांती, निर्भयता, निर्मळपणा, साधेपणा इत्यादी मूल्ये शिकविली.

बा विठ्ठला,
आमच्या आई-वडिलांव्यतिरिक्त तू असा एकमेव आहेस ज्याच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळू-बागडू शकतो. आम्ही तुझ्याशी भांडू शकतो. ‘अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असे म्हणू शकतो व तुझ्या गळ्यात दोर टाकून तुला धरू शकतो. इतका तू आम्हाला जवळचा आहेस. तुझ्यात व आमच्यात कोणीच मध्यस्थी नाही. कुणीही सरळ व सहज तुझ्याशी हितगुज साधू शकतो. दोन्ही हात कटेवरी ठेवून शांतचित्ताने प्रेमळ नजरेने तू आमच्यावर स्नेहवर्षा करतोस, आमच्या सुखदुःखाची काळजी वाहतोस.

पण विठ्ठला, बघता बघता सगळे कसे उफराटे होऊ लागले रे! तुझ्या साध्या भोळ्या लेकरांच्या वारीत धारकरी, सनातनी, मनुवादी लांडगे वेषांतर करून कोल्ह्यांना घेऊन केव्हा घुसले व त्यांची दिशाभूल करू लागले हे कळलेच नाही रे! तुझ्या लेकरांनी निर्माण केलेल्या समतेच्या, प्रेमाच्या, विवेकाच्या या भूमीत द्वेष, तिरस्कार, हिंसा, अविवेक, धर्मांधता इत्यादीचे तण ते पेरू पाहत आहेत व काही जण त्याला बळी पडत आहेत रे! खरोखर काळजी वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रे!असो. आमच्या संतांचे विचारधन व तुझा आशीर्वाद नक्कीच आम्हाला या काळातही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

विठ्ठला, माय बापा,
मला तुझ्या तोंडून माझ्या तुकासोबत नेमके काय घडले? माझ्या ज्ञानोबाला एकविसाव्या वर्षीच समाधी का घ्यावी लागली? त्यानंतर निवृत्ती, सोपान, मुक्ता यांची पुढील दोन-तीन वर्षातच जीवनयात्रा कशी संपली? नामदेवांना महाराष्ट्र का सोडावा लागला? चोखामेळ्याला काय काय भोगावे लागले? हे सर्व ऐकायचे आहे. तू तुझ्या डोळ्यांनी ते बघितलेले आहेस. मला एकदा तरी सांगशील का रे? काही नाही. मी कुणाचाही सूड घेणार नाही. फक्त ऐकून घेणार व पोट भरून रडून घेणार. सांगशील ना मला?

खरं तर मी नास्तिक आहे. पण तू आम्हाला सगळ्यांना इतका व्यापून राहिला आहेस की तुझ्यावाचून आमचे वेगळे अस्तित्व शक्य नाही. तुझ्याशी नेहमी मनोमन संवाद सुरूच असतो. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्याशी प्रकट संवाद साधला एवढेच.

बा विठ्ठला,
आमचा मायबापा, आमचा सखा, आमचा सगासोयरा तूच आहेस. आमच्यावर तुझे प्रेम असेच असू दे व तुझ्या लेकरांना चांगले-वाईट, सत्य-असत्य, कालबाह्य-कालसापेक्ष, विवेक-अविवेक, श्रद्धा-अंधश्रद्धा, निर्मळ भक्ती- भक्तीचा बाजार, कर्मकांडे, खरे-खोटे यांतील फरक समजण्याची सद्बुद्धी दे, हीच आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुझ्या चरणी प्रार्थना!

तुझेच अजाण लेकरू,
राहूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *