Dr. Rahul Rajani

हाल्या हाल्या दुधू दे (कादंबरी)- बाबाराव मुसळे – परिचय

          ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही बाबाराव मुसळे यांची पहिली कादंबरी. डाॅ. आनंद यादव आणि द. दि. पुंडे यांनी या कादंबरीची ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ म्हणून निवड करून तिची योग्यता मान्य केलेली आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली.

         ग्रामीण भागातील न्यानबा या निम्नस्तरिय शेतकऱ्याची शोकांतिका या कादंबरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आनसा (पत्नी), सोबा (मुलगी), पर्कास (मुलगा), संबा (पुतण्या), वछिला (चूलत सून), शंकर पाटील,

संतोबा सावकार, त्याची आडदांड मुलं, रंगा व इतर, न्यानबाचा  मेहुणा, रखमी, तिचा नवरा, सोबाचा सासरा, पती, तिच्या ननंदेचा दीर यासारखी इतर पात्रे या कादंबरीत येतात. वऱ्हाडी बोलीचा यथोचित वापर, उत्कृष्ट प्रसंगवर्णन, तृतीयपुरूषी  निवेदनतंत्राचा वापर यासारख्या गोष्टी या कादंबरीची बलस्थाने आहेत.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या YouYube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

 

          या कादंबरीची सुरूवात सोबाच्या लगीनघाईने होते. सोबाचा मामा तिच्यासाठी स्थळ आणतो. मुलाकडचे खूप श्रीमंत असतात.  मुलगी सुखात राहिल, म्हणून न्यानबा त्याची ऐपत नसतानाही ५००० रु. हुंडा देऊन मुलगी द्यायला तयार होतो. सोबाच्या मामाने घाई केल्यामुळे न्यानबाला शंकर पाटलांचा सल्लाही याबाबतीत घेता येत नाही. तसं करायला सोबाचा मामा नकार देतो. आता लग्नासाठी पैसे जमवायची जबाबदारी न्यानबावर येऊन पडते. मामाने आधी मदत करायचे आश्वासन दिलेले असते. परंतु एेनवेळेस तो हात वर करून देतो व त्याचा व्याही संतोबा सावकारकडे (जो न्यानबाच्या गावचा असतो) त्याला घेऊन येतो. तो न्यानबाची काही शेती गहाण ठेवून त्याला कर्ज द्यायला तयार होतो. न्यानबाने त्याची पायरी उभ्या आयुष्यात कधी चढलेली नसते. कारण शंकर पाटील व संतोबा सावकाराचं जमत नाही व न्यानबा शंकर पाटलांच्या बाजूचा असतो. तसेच संतोबा सावकाराचा असा लौकिक असतो की तो बेमानीने लोकांच्या जमिनी बळकावतो. शेवटी मुलीच्या लग्नासाठी व सोबाच्या मामामुळे त्याला सावकाराकडून मदत घ्यावी लागते व तेथूनच त्याच्या अधोगतीला सुरुवात होते. 

        सोबाचे लग्न होते, सावकाराला त्याच्या वाट्याचे शेत मोजून दिले जाते. तो मोजणाऱ्याला पैसे देऊन जास्तीची जमीन बळकावून घेतो. मोजणीच्या वेळेस शंकर पाटलांना न्यानबा बोलावतो. ते सावकाराला आवडत नाही. शेत खरेदीला ३-४ महिने झालेले असतात. तो त्याचे १००० रुपये व्याज घेतो.  थोडं खोटं बोलून न्यानबाही त्याच्याकडून ५००० ऐवजी  ७५०० रुपये कर्ज घेतो. एकदा शेतात काम करत असताना न्यानबाकडनं नकळत सावकाराला दिलेल्या जमिनीत २-३ वखरं वखरलं जातं. याचं निमित्त करून सावकाराचा मुलगा रंगा त्याच्याशी भांडण उरकून काढतो. वखरणीसाठी  न्यानबानं शंकर पाटलाचे बैल आणलेले असतात.  त्यांना काठीने हाणतच तो गावात आणतो. वखरचे पातं लागून बैलांचे पाय व काठीने हाणून पाठ जखमी होते. त्याच्यातून रक्त येते. वरून सावकार न्यानबाने रंगाला मारल्याचा आळ घेतो व मुलांकडून त्याला मार-मार मारतो.  न्यानबा बेशुद्ध पडताे व काही दिवस आजारी पडतो.

          कर्जाची फेड एका वर्षात व्हायला हवी, यासाठी न्यानबा उरलेल्या ५-६  एकरमध्ये हे सर्व एच. फोर. लावतो. त्यासाठी बियाणे सोबाच्या सासऱ्याकडून आणतो. त्याच्याआधी त्याने कधीच एच. फोर. लावलेला नसतो. वास्तविक एच. फोर.साठी खत, फवारणीचे औषध वगैरे गोष्टींचा खर्च येणारच होता, पण न्यानबा जोखीम पत्करतो. येथून न्यानबाच्या संकटांची मालिका सुरू होते. पुढच्या सात-आठ महिन्यात त्याच्या आयुष्यात सर्व विपरित घडत जाते व त्याचे सर्व कुटुंब उद्ध्वस्त होते. सोबा माहेरी येते. आसरांच्या विहिरीत पडते. नंतर तिच्या गळ्यातील एक टापूस हरवतो. तिच्या सासरचे तिला घ्यायला येत नाहीत तेव्हा तिला न्यानबा जेमतेम पोहोचवून येतो. नागपंचमीच्या दिवशी त्याच्या घरात साप निघतो. नंतर सोबाला रात्रीच्या रात्री तिच्या घरा समोरचा पाटील पोहोचवून जातो. सोबाच्या सासऱ्याने तिला जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याने मोठ्या मुलाच्या दोन पत्नींचा असाच खून केलेला असतो. सोबा जेमतेम वाचते. शंकर पाटील व न्यानबा सासऱ्याला कारण विचारायला जातात तर तो तिच्या चरित्र्याचे कारण सांगतो. नंतर त्याच्याच चारित्र्याविषयी न्यानबा व आनसाला कळते. इकडे त्यानेच दिलेला बैल पुरात वाहून गेलेला असतो. न्यानबाला गळ्यात गाठ होते. खूप त्रास होतो. डॉक्टर, वैद्य, बाहेरचं औषध-पाणी असे अनेक उपचार होतात, शेवटी काहीच फरक पडत नाही. डॉक्टरांकडे जातो, तर कॅन्सरचा आजार निघतो. दरम्यानच्या काळात कारकूनाला सोसायटीचे पैसे भरायला ५०० रुपये दिलेले असतात, तर तो ते भरतच नाही. ते पुन्हा त्याला द्यावे लागतात.

          इकडे सोबाचा नवरा तिच्या नणंदकडे जाऊन राहत असतो. त्याचा सोबात खूप जीव असतो. तिच्या नणंदचा दीर सोबाच्याच गावाला रस्त्याच्या कामावर येत असतो. त्याच्या हस्ते तिला निरोप यायला सुरुवात होते. शेवटी तिच्या नादाने तो प्रचंड आजारी पडतो. इकडे न्यानबाही आजारी असतो. एके रात्री सणाच्या दिवशी त्याच्या मोटरसायकलवरून तीन – चार तासांसाठी ती नवऱ्याला भेटायला जायचं ठरवते. त्यासाठी रखमाची मदत घेते. मागे रखमा शंकर पाटलाच्या घरून एंड्रिनचा, एंडोसल्फानचा डबा, खत वगैरे चोरून परस्पर विकायची व ते न्यानबामुळे उघडकीस आलेले असते. तेव्हा ती इकडे रस्त्याच्या कामावर जायला लागते. तिकडे लबाडी करायला जाते तर सोबाच्या नणंदचा दीर तिला व तिच्या नवऱ्याला कामावरून काढून टाकतो. ती सोबाकडे जाते, रडते, कुढते. सोबा त्याला विनंती करते तेव्हा तो त्यांना कामावर घेतो. या दोन गोष्टींमुळे तिचा या दोन्ही घरांवर राग असतो. तिलाही आयती संधी चालून येते. ती त्या दिवशी तिला गावाबाहेर घेऊन जाते. मोटरसायकलवर सोबाला बसवते. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे काही लोकं दोघांवर हल्ला करतात व दोघांना बेशुद्ध होईस्तोवर मारतात. नंतर त्यांना कुणीतरी शंकर पाटलांकडे नेऊन सोडतं, गावात दोघांत संबंध असल्याची गोष्ट पसरते. दोघांची बदनामी होते. रखमा व तिचा नवरा अधिक पसरवतात. पुढे सोबा आसराच्या विहिरीत आत्महत्या करते. या घटनेने न्यानबा व आनसा दोघं खचतात. नंतर सत्य त्यांच्या समोर येते, पण आता काही उपयोग नसतो.

          दरम्यानच्या काळात न्यानबाच्या लक्षात येते की, त्याने पेरलेल्या एच. फोर.चे बियाणे नर जातीचे आहे. त्याला एका पैशाचेही उत्पन्न येणार नाही. आता कर्ज फिटायचीही कोणतीच शक्यता नसते. त्याच्या गळ्यातली जखम वाढतच जाते. त्यात पू होत जातो. त्यातच मुलांच्या भांडणात पर्कासला मार बसतो, त्याच्या नाकातून रक्त येऊ लागते. त्याला अकोल्याला घेऊन जातात. आनसा, संबा त्याच्यासोबत असतात. ते परत येतात, तेव्हा न्यानबाचे निधन झालेले असते. असे एकूण कथानक या कादंबरीचं आहे. या सर्व घटना एका मागोमाग घडत जातात. म्हणजे सर्व काही व्यवस्थित सुरू असताना फक्त सात ते आठ महिन्यातच हे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. व्यवस्थेचा हा हाल्या. त्याच्यावर न्यानबा विश्वास ठेवतो. हाल्या शेवटी हाल्याच. तो काही दूध देत नाही.

          या कादंबरीतील या  घटना काहीशा असंभाव्य वाटतात. फक्त सात – आठ महिन्याच्या कालावधीत एकाच कुटुंबाच्या जीवनात इतक्या घटना व त्याही त्यांना विनाशाकडेच घेऊन जाणाऱ्या घडतात. यावर वाचकाचा सहजासहजी विश्वास बसत नाही. सोबाच्या लग्नाअगोदर सर्व ठीक असते. गरिबी असते. मात्र कोणत्याच गोष्टीचा असा ताण नसतो. त्यानंतर इतक्या कमी कालावधीत घर उद्ध्वस्त व्हावे, तेही एखाद्या भौगोलिक किंवा इतर आपत्तीमुळे नव्हे, तर लहान-सहान घटनांच्या-संकटांच्या मालिकेमुळे यावर विश्वास नाही बसत.

          दुसरे म्हणजे या कादंबरीतील पात्रांची स्वभाव चित्रणे खूपच साचेबंद आहेत. एखादं पात्र वाईट तर वाईट व एखादे चांगले तर चांगलेच. शंकर पाटील, संबा, वछिला, न्यानबा, सोबा चांगली तर चांगलीच व सावकार, रंगा, सोबाचा मामा, सासरा, रखमा, रखमाचा पती वाईट तर  कादंबरीभर वाईटच. मग काहीही घडो, चांगलं पात्र चांगलंच वागेल व वाईट पात्र वाईटच कृत्य करेल, हा या कादंबरीचा सर्वात मोठा दोष म्हणता येईल.

          द. दि. पुंडे यांनी या कादंबरीला शोकांतिका म्हटलेले आहे. न्यानबाच्या पूर्ण कुटुंबाचा या कादंबरीत विनाश झालेला आहे. असे असले तरी ही शोकांतिका प्रभावी उतरलेली नाही. कादंबरी वाचून वाचक अस्वस्थ होत नाही किंवा त्याला गलबल्यासारखेही वाटत नाही.

          असे जरी असले तरी ग्रामीण भागाचे, तेथील जनजीवनाचे, ग्रामीण संस्कृतीचे, परस्परांशी असलेल्या संबंधांचे, कृषिजीवनाचे, दारिद्र्याचे, वर्षातील सर्व ऋतूंचे, वेगवेगळ्या ऋतूंचे शेतीवर होणाऱ्या परिणामांचे वास्तव चित्रण लेखकाने केलेले आहे. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा, सरकारी ध्येयधोरणांचा आढावाही लेखकाने बऱ्यापैकी घेतलेला आहे. त्यामुळे या कादंबरीतून ग्रामीण वास्तवाचे दर्शन घडते.

          (३१/०१/२००९-शनिवार)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या YouYube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

 

Exit mobile version