जैन इ. सर्व हिंदू. ‘सिंधू’ शब्दाचा अपभ्रंश म्हणजे ‘हिंदू’. ‘स्तान’ म्हणजे राहण्याची जागा, ठिकाण. जसे अफगाणिस्तान, कझाकिस्तान आताचे पाकिस्तान इ.
पुढे ‘हिंदू’ हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला, प्रचलित झाला, रूढ झाला. सुरुवातीला हा शब्द ‘सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे’ या अर्थाने वापरला गेला होता, म्हणजे स्थानवाचक होता. त्यानंतर तो एका धर्माचे अभिधान, नाव म्हणून वापरला जाऊ लागला. आता विशिष्ट लोकं राजकारण करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत आणि हे राजकारण ‘विशिष्टांचे’ वर्चस्व पुन्हा स्थापित करण्यासाठी केले जात आहे.
एक मात्र खरं आहे की, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतांच्या साहित्यात, गीतेत, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये, रामायण, महाभारतामध्ये, वेदांमध्ये ‘हिंदू’ हा शब्द नाहीये. मी हे सर्व साहित्य जरी वाचलेले नसले तरी लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर, गं. बा. सरदार, आ. ह. साळुंखे, वि. का. राजवाडे यांचे काही ग्रंथ, वाङ्मयाचे खंड व इतर अनेक अभ्यासकांचे ग्रंथ वाचले आहेत. संत साहित्यावरील समीक्षा वाचली आहे. मराठीतील अनेक ख्यातनाम अभ्यासकांनी, काही पंथ संस्थापकांनी वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म, सनातन धर्म, आर्य धर्म इ. शब्द वापरले आहेत. महाराष्ट्रातील संतांनी ‘भागवत धर्म’ तर रामदासांनी महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र धर्म’ हा शब्द वापरला आहे.
‘हिंदू’ हा आपल्या सर्वांचा एकत्र उल्लेख करणारा शब्द जरी असला तरी हा धर्म हजारो जातीपातींचा व चार वर्णांचा मिळून बनलेला आहे. (त्यात पुन्हा आदिवासी, अतिशूद्र हे कोणत्याही वर्णात मोडत नाहीत.) असे राहिले असते तरी काही हरकत नव्हती. पण या जातींमध्ये प्रचंड श्रेष्ठ-कनिष्ठता, विषमता दिसून येते. त्यानुसार त्यांचे समाजातील स्थान ठरले. त्यानुसार हजारो
वर्षे त्या-त्या जातींना तशी वागणूक दिली गेली. त्यामुळे इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णांनी इतरांचे प्रचंड शोषण झाले. त्यांच्या शेकडो पिढ्या गुलामागत, पशुगत राबवल्या गेल्या. त्यांना शस्त्र व शास्त्र धारण करण्याचा हक्क नाकारला गेला. त्यांचे शक्य तेवढे खच्चीकरण केले गेले. इथल्या स्त्रियांचे आयुष्य हजारो वर्षे बालविवाह, जरठकुमारी विवाह, विधवा विवाहास बंदी, घटस्फोटाचा अधिकार नसणे, केशवपन, शिक्षणाचा हक्क नसणे अशा अनेक अनिष्ट प्रथा-परंपरा इ. मुळे नरकासम होते. आजही अनेक लोकं काहीसा तसाच आग्रह धरतात. म्हणून बाबासाहेबांनी या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला.
भारतात प्राचीन काळापासून विविध पंथ होते, विचारधारा होत्या, दर्शने होती. वैदिक धर्मातील कट्टरता, पशुबळी, हिंसा, विषमता याविरुद्ध विद्रोह करून जैन, बौद्ध अशा अवैदिक विचारधारा उभ्या राहिल्या. पुढे शीखही वेगळे झाले. भारतात आर्य-अनार्य असा संघर्ष गेल्या ५००० वर्षांपासून सुरू आहे. पुढे यात शक, हुनान, मुस्लिम, ख्रिश्चन इ. राज्यकर्ते, त्यांची संस्कृती यांची भर पडली. या सर्वांचे विचार, राहणीमान, भाषा, संस्कृती, वेशभूषा, खानपान इ. च्या आदान-प्रदानातून, देवघेवीतून, प्रभव-प्रभावातून आताचा भारत साकारला आहे, हे आपण अभ्यासून समजून घ्यायला हवे.
१९४७ साली आपण लोकशाही स्वीकारली. राज्यघटनेने आपल्याला धर्मस्वातंत्र्य, उपासनेचे स्वातंत्र्य दिले. मात्र धर्माने निर्माण केलेली जात, लिंग, पंथ, वंश इ. मुळे निर्माण झालेली विषमता मोडून काढली. सर्वांना एकसमान केले. म्हणून आपल्या म्हणजे येथील शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले. त्यांना शिक्षणाची, नोकरीची, जातीव्यतिरिक्त दुसरा व्यवसाय निवडण्याची व त्यातून स्वविकासाची संधी मिळाली.
तेव्हा धर्म ही आपल्यासाठी महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आपल्याला सदाचरण, मुल्ल्ये, संस्कार इ. काही प्रमाणात धर्माच्या आचरणातून मिळत असतात, हे मान्य. मात्र कुणामुळे आपल्या जगण्याला, आपल्या असण्याला अर्थ प्राप्त झाला, कुणामुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला, हे आपण जाणून घ्यायला हवे. तसेच आपल्या धर्मभावनेचा कुणीही आर्थिक, राजकीय कारणांसाठी, सत्तेवर येण्यासाठी गैरफायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून धर्मावरून चाललेले राजकारण थांबेल.
अजून बरंच बोलण्यासारखे व लिहिण्यासारखे आहे. तुम्ही प्रतिक्रिया द्या. मी लिहीत जाईल.
© डॉ. राहुल रजनी
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw