जेव्हा उगारतो आम्ही
आमच्याच माणसांवर हत्यारतेव्हा आकाशातील गिधाडे
खदाखदा हसू लागतात.
जेव्हा झाडाची एक फांदी
दुसऱ्या फांदीला तोडायचे
रचते कारस्थान
तेव्हा ते झाडही होते भयभीत
जेव्हा आग लावून आपल्याच घराला
नाचू लागतात आग लावणारे
तेव्हा ती अग्नीही
होते विस्मयचकित
जेव्हा घुसतो सैतान माणसाच्या मनात
आणि मारू लागतो तो
स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी
तेव्हा थरथरते कुऱ्हाडीचे पातेही
जेव्हा माणसंच उठतात माणसांतून
वागू लागतात पशूंप्रमाणे
तेव्हा काही क्षण का होईना
अचंबित होतात हिंस्र पशूही
(०६/१२/२०२१)
© राहुल रजनी