Dr. Rahul Rajani

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन 

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन

              राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित केलेल्या आणि स्वतः लिहिलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सुमारे १२५ इतकी असून या ग्रंथांची पृष्ठसंख्या सुमारे ४४००० इतकी आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मनी, चिनी, पर्शियन, अरबी, तिबेटी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, तमिळ, कानडी इतक्या भाषा

अवगत होत्या. हिंदीच्या ३३ स्थानिक उपभाषांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. अशा वेगवेगळ्या भाषाकुळातील जगातील इतक्या महत्त्वाच्या भाषांची जाणकार असलेली व्यक्ती किती बुद्धिमान, विद्वान असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

              ‘वोल्गा ते गंगा’ हा राहुल सांकृत्यायन यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. या ग्रंथात मानव समाजाच्या इसवी सन पूर्व ६००० ते इसवी सन १९२२पर्यंतच्या म्हणजे जवळपास ७९२२ वर्षांच्या वाटचालीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे चित्रण करण्यात आलेले आहे. पण हा इतिहास त्यांनी एखादा इतिहासाचा ग्रंथ लिहावा या पद्धतीने लिहिलेला नसून ललितकथांच्या स्वरूपात मांडलेला आहे. म्हणून हा ग्रंथ अतिशय वाचनीय असा झालेला आहे.   

              या ग्रंथात एकूण १९ ललित कथा आहेत. त्यापैकी पहिल्या तीन कथांमध्ये मानवी समाजाच्या आदिम कालखंडातील स्त्री-जीवनाचे चित्रण केलेले आहे. त्यात पहिली कथा ‘निशा’ ही आहे. या कथेत इसवी सन पूर्व ६००० (आजपासून ८००० वर्ष), दुसऱ्या ‘दिवा’ या कथेत इसवी सन पूर्व ३५०० (आजपासून ५५०० वर्ष) तिसऱ्या ‘अमृताश्व’ या कथेत इसवी सन पूर्व ३००० (आजपासून ५००० वर्ष) वर्षांपूर्वीच्या मानवी समाजाचे चित्रण केलेले आहे. पहिल्या कथेत पूर्णपणे पशुपातळीवरील जीवनाचे चित्रण आलेले आहे. उत्तरोत्तर पशूपासून मानवी पातळीवर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी संस्कृती पूर्णतः निर्माण झालेली नाही. काही प्रथा, परंपरा रूढ झालेल्या असल्या तरी आदिमतेच्या असंख्य खाणाखुणा, अवशेष अजूनही स्पष्टपणे दिसून येतात.

              या शोधनिबंधातून ‘निशा’, ‘दिवा’ व ‘अमृताश्व’ या तीन कथांमधून आदिम काळातील स्त्रीजीवन कसे चित्रित झालेले आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे.

              ‘निशा’ या कथेतून असे लक्षात येते की, अतिआदिम अवस्थेतल्या काळात अजून टोळ्या निर्माण झालेल्या नव्हत्या. तोपर्यंत फक्त कुटुंबच होते. या कुटुंबांमध्ये फार तर १५ ते २०-२५ सदस्य असायचे. ते एखाद्या गुहेत राहायचे. त्या काळातील कुटुंब स्त्रीसत्ताक असायचे. म्हणजे त्या कुटुंबांवर स्त्रियांची सत्ता चालायची. ‘निशा’ या कथेत १६ जणांचे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबावर निशा नावाच्या ४०-५० वर्षाच्या स्त्रीची सत्ता होती. त्या काळात कुटुंबाची सत्ता ही त्या कुटुंबातील सर्वात बलाढ्य स्त्रीकडून ती म्हातारी झाल्यावर त्या कुटुंबातील सर्वात बलाढ्य स्त्रीकडे जात असे. निशाच्या आधी तिच्या आईची त्या कुटुंबावर सत्ता होती. तिच्यानंतर तिच्या मुलीकडे म्हणजे लेखाकडे तिच्या कुटुंबाची सत्ता जाण्याची शक्यता होती. कारण लेखा ही तिच्या सर्व मुलींमध्ये अधिक बलाढ्य, शूर, धाडसी व शक्तिशाली होती. पण असे असले तरी कुटुंबावरील वर्चस्वासाठी तिचे तिच्या एखाद्या बहिणीशी भांडण झाल्याशिवाय राहणार नाही, असे वर्णन या ठिकाणी आलेले आहे. पुढील संदर्भावरून ते अधिक लक्षात येईल. “निशेच्या परिवारात ती स्वत:च सर्वात वडील आणि अधिकारसंपन्न देखील आहे, पण आता तिचा तो अधिकार फार काळ टिकणे शक्य नाही. वर्षा दोन वर्षात ती स्वतः म्हातारी आजी बनेल आणि मग सर्वात बलवान असलेली निशापुत्री लेखा हिचे राज्य होईल. त्या वेळी लेखाबरोबर तिच्या बहिणीचे भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी नैवैद्यादाखल परिवारामधील काही माणसे लांडग्याचित्त्यांच्या दाढा, अस्वलांचे पंजे. बैलांची शिंगे, वोल्गाचे पूर यांना बळी जात असल्यामुळे प्रत्येक राणीमातेचे कर्तव्य आपला परिवारक्षय न होऊ देण्याचे असते. आतापर्यंत असेच होत आले. लेखाच्या बहिणीतून एखाददुसरी तरी स्वतःचा सवता परिवार निर्माण करायला समर्थ होईल.” (निशा, पृ.१०) यावरून त्या कुटुंबाचे भरणपोषण करणे, अन्नाची सोय करणे, संरक्षण करणे हे त्या कुटुंबप्रमुख स्त्रीचे कर्तव्य होते. त्याचप्रमाणे कुटुंबावरील वर्चस्वासाठी बहिणी-बहिणींमध्ये संघर्ष व्हायचा, असे दिसून येते.

              त्याचप्रमाणे या कथेत वर्णन केल्याप्रमाणे कुटुंबावर स्वतःची सत्ता अबाधित राहावी, यासाठी स्वतः आई आपल्या मुलीचा खून, हत्या करायलाही मागे-पुढे पाहत नसे, हे या कथेतून दिसून येते. कारण या कथेत शेवटी निशा ही लेखाचे यश, तिचा कुटुंबातील इतर मुली, स्त्रिया, पुरुष यांच्यावरील दबदबा, भीती बघत राहते. कुटुंबाची सत्ता हळूहळू आपल्या हातातून लेखाकडे जात आहे, हे तिच्या लक्षात येते. म्हणून ती लेखाचा काटा काढण्याचा, तिला संपवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती लेखाच्या छोट्याशा मुलाचा वापर करते. वोल्गा नदीच्या काठावर खेळत असलेल्या लेखाच्या छोट्या मुलाला खाण्यासाठी नदीच्या दिशेने ती फळे फेकते व ते पकडण्यासाठी मुलगा पुढे जातो. तेव्हा तो नदीत पडतो. त्याला वाचवण्यासाठी लेखा नदीत उडी घेते. ती मुलाला एका हातात पकडून पोहत असताना निशा तिच्या गळ्यावर हाताची पकड देऊन तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत त्या दोन्हीजण मरतात व त्यांच्यानंतर त्या कुटुंबातील सर्वात बलवान स्त्री रोचना ही राणी म्हणजे कुटुंबप्रमुख बनते. अशा प्रकारे कुटुंबावरील सत्तेसाठी आई व मुलगी, बहिणी यांच्यात संघर्ष, त्यासाठी एकमेकांची हत्या करणे इ. गोष्टी घडून येत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारात पुरुष तटस्थ असलेला दिसून येतो. त्या काळात पुरुषांवर स्त्रियांचे पूर्णपणे वर्चस्व असायचे. “निशेप्रमाणेच इतर परिवारात देखील त्यांच्या मातांची हुकमत होती; पित्यांची नाही.” (निशा, पृ.१०)

             दुसऱ्या कथेत पहिल्या कथेनंतरच्या ३५०० वर्षानंतरच्या समाजाचे चित्रण आलेले आहे. या काळात टोळीव्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. या टोळीची प्रमुख स्त्री असायची. त्याचप्रमाणे त्या टोळीत जे कुटुंब असायचे, त्यांची प्रमुख सुद्धा स्त्रीच असायची. “कारण आईच्या जिवंतपणीच तिच्या वंशविस्ताराचा एक लहान परिवार होत असे, तो अशा अर्थाने की त्या परिवारामधील व्यक्ती त्या आईच्या नावाने ओळखल्या जात असत. उदाहरणार्थ- दिवेची आई वारली आणि दिवा कितीतरी मुलामुलींची माता झाली तर त्यांना दिवासूनु (दिवापुत्र) आणि दिवादुहिता (दिवपुत्री) या नावाने ओळखण्यात येईल.” (दिवा, पृ. १७) “जन एका जिवंत मातेचे राज्य नाही, तर अनेक जिवंत मातांच्या परिवारांचा एक मेळ होऊन एक जन होतो.” (दिवा, पृ. १९) यावरून त्या काळातील कुटुंब हे स्त्रियांच्या नावावरून ओळखले जायचे, असे लक्षात येते. म्हणजे मानवजातीच्या आदिम अवस्थेमध्ये कुटुंबांवर स्त्रियांची हुकमत चालायची, असे दिसून येते.

              ‘दिवा’ नावाच्या दुसऱ्या कथेत अनेक कुटुंबांनी मिळून तयार झालेल्या एका जनाचे म्हणजेच टोळीचे चित्रण आलेले आहे. हा काळ इसवी सन पूर्व ३५०० असल्याचे लेखकाने म्हटले आहे. ‘निशा’नंतर अडीच हजार वर्षांनी ‘दिवा’ ही एका कुटुंबाची तसेच अनेक कुटुंबांनी बनलेल्या १५० जणांच्या एका जनविस्ताराची म्हणजेच एका टोळीची नायिका/ प्रमुख म्हणून आपल्यासमोर येते. “जन एका जिवंत मातेचे राज्य नाही, तर अनेक जिवंत मातांच्या परिवारांचा एक मेळ होऊन एक जन होतो.” (दिवा, १९) या जनाला ‘निशाजन’ असे म्हटलेले आहे. कारण हा वंशविस्तार जुन्या काळात होऊन गेलेल्या निशा नावाच्या एका स्त्रीपासून झालेला आहे. या जनविस्ताराचा संपूर्ण कारभार एक समिती पाहत असली तरी साऱ्या जनविस्ताराची नायिका एक स्त्री होती. तिचे नाव दिवा होते. या टोळीत अनेक परिवार होते. याच कथेत दुसरी एक टोळी आहे. तिचे नाव उषाजन आहे. म्हणजे त्या टोळीची प्रमुखही एक स्त्री आहे.  

              आदिम काळात स्त्री ही पुरुषांइतकीच धाडसी, कर्तबगार, नेतृत्व गुण असलेली दिसून येते. तिला शस्त्र चालवता यायचे, हाताळता यायचे, लांडगा/ अस्वल अशा हिंस्र प्राण्यांना ती शस्त्रासह सावधगिरीने पण पुरुषांइतक्याच धाडसाने सामोरे जायची. कुटुंबाचे संरक्षण करायची. हिस्त्र प्राण्यांना मारताना, ते मेल्यावर धारदार शस्त्राने त्यांच्या देहाचे तुकडे करताना ती कचरत नाही. नंतरच्या काळात ते आजपर्यंत ज्या पद्धतीने स्त्री व पुरुष यांची कायमस्वरूपीची श्रमविभागणी घडून आलेली आहे किंवा घडवून आणलेली आहे, ज्यात स्त्रियांच्या वाट्याला चूल व मूल, घरकाम व पुरुषांच्या वाटेला धाडसाची, बाहेरची कामे अशी श्रमविभागणी त्या काळात झालेली दिसत नाही.

              ‘निशा’ या कथेमध्ये निशा, तिच्यासोबत असलेली एक साधारणतः बावीस वर्षांची व दुसरी सोळा वर्षांची तरुणी या पुरुषांसोबत शिकारीसाठी जातात. धाडसी कृत्ये करतात. त्यांच्यासोबत अजून चार पुरुष आहेत. पण निशाकडे त्या कळपाचे नेतृत्व आहे. तिच्यावर त्या कुटुंबाची, त्या कळपाची जबाबदारी आहे. शिकारीवर जाताना निशा ही सर्वांच्या पुढे असते. गुहेत जाताना सर्वात आधी ती जाते. अस्वलांना मारून झाल्यावर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ती इतरांना खायला देते. परततानाही तीच पुढे असते. लांडग्यांची चाहूल तिलाच लागते. तेव्हा तीच सर्वांना सावध करते. स्वसंरक्षणासाठी ती व्युहरचना आखते. त्यानुसार स्वतःचे व कळपाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. लांडग्यांशी चाललेल्या झटापटीत एक लांडगा सोळा वर्षांच्या तरुणीवर हल्ला करतो. तेव्हा ‘मा’ म्हणजे निशा हीच त्या लांडग्याच्या पोटात भाला खुपसून त्याला ठार करते. एका अर्धमेल्या लांडग्याच्या गळ्याची शीर तोडून ती इतरांना त्याचे रक्त पिण्यासाठी सुकर करून देते. त्यानंतर कळपातील पुरुषाने एक लांडगा मारून टाकल्यावर इतर लांडगे त्याच्याभोवती गोळा झालेले असतात. तेव्हा ती तेथून पळून जाताना सर्वांना पुढे करते व पाठीमागून हल्ला होऊ शकतो म्हणून सर्वांच्या मागे राहते. घरी आल्यावर अस्वल, लांडगा यांच्या मांसाचे तुकडे करून तीच मुलांना व इतरांना खायला देते.  

              पुढे निशाची मुलगी लेखा ही देखील खूप धाडसी, बलिष्ठ असल्याचे दिसून येते. ती ‘एखाद्या हरिणीप्रमाणे पहाडावरून चढते’. एका पहाडाच्या उंच सुळक्यावर मधाचे पोळे असते. तिथे पोहोचण्याचे धाडस माणसंच काय पण अस्वलांमध्येही नसते. पण ती काठीला काठी बांधून पालीप्रमाणे वर जाते. जाळ लावून त्या माशांना पळवून लावते व खाली धरलेल्या चामड्याच्या बुधल्यात तीस शेरापेक्षा अधिक मध पडते. याचे सर्वजण कौतुक करतात. कारण त्यांच्यापैकी कुणालाही ते करणे शक्य झाले नसते. अशा धाडसी स्त्रिया आदिम काळात होत्या. 

              ‘दिवा’ या कथेत जेव्हा निशाजन व उषाजन या दोन टोळ्यांचे मृगयाक्षेत्रावरून युद्ध होते. तेव्हा धनुष्य, पाषाण-परशु, काष्ठ-शल्य, काष्ठ-मुद्गल अशी त्या काळातील हत्यारे/ शस्त्र घेऊन सर्व नरनारी युद्धात उतरतात. इथे स्त्री-पुरुष असा भेद दिसून येत नाही. निशाजनांच्या टोळीचे नेतृत्व दिवा करते. ती जननायिका असल्याने युद्धप्रसंगी आघाडीवर असते. म्हणजे सर्वात पुढे असते. या युद्धात स्त्रिया या अतिशय धाडसीपणे, क्रूरपणे स्त्री व पुरुषांशी लढतात. बाण चालवितात, भाले खुपसतात. हत्यारे मोडल्यावर जमिनीवरच्या दगडांनी लढतात. हातांचा, दातांचा शस्त्राप्रमाणे वापर करतात. त्या काळात लढताना शत्रू पक्षातील शेवटचा कुणीही जिवंत असेपर्यंत युद्ध चालू असायचे. म्हणून स्त्रियासुद्धा लहान मुले, वृद्ध, पुरुष, स्त्रिया या सर्वांना अगदी क्रूरपणे मारतात. काहींच्या गळ्यात दगडे बांधून वोल्गा नदीत बुडवतात. काहींना खोपटात जिवंत जाळून टाकतात. लहान मुलांना दगडावर आपटून मारतात. स्वतः दिवा तीन मातांच्या वक्षांना चिमटलेल्या बालकांना हिसकावून दगडावर आपटून मारते. त्यांच्या डोक्यांची कवटी फुटल्यावर तो आवाज ऐकून ती खदाखदा हसते. शेवटी निशाजन जिंकते. म्हणजे दिवा ही जननायिका जिंकते. ती तिच्या टोळीचे मृगयाक्षेत्र चार पटीने वाढवते.

              ‘अमृताश्व’ या तिसऱ्या कथेत अनेक टोळ्यांमध्ये पुरुषप्रधान व्यवस्था निर्माण झालेली आहे व आधीच्या काळात शूर, धाडसी, नेतृत्व करणारी स्त्री ही फक्त घरकाम करणारी उरलेली आहे. दोन टोळ्यांच्या संघर्षात तिला लुटून नेले जाऊ लागले आहे. पण असे असले तरी अमृताश्वसारखे महापितर म्हणजे जनप्रमुख लोकभावनांकडे दुर्लक्ष करून स्त्रियांना पराक्रम गाजविण्याची संधी देतात. कारण त्याला त्याआधीचा इतिहास व त्याच्याच काळात इतर ठिकाणी स्त्रीसत्ताक टोळ्या असलेले माहीत असते. “तिने (अमृताश्वची पत्नी मधुरा) अमृताश्वाबरोबर नुसती अस्वले, लांडगे आणि वाघ यांची शिकार केली इतकेच नव्हे, तर त्याच्या खांद्याला खांदा लावून ती युद्धात लढत देखील असे. जनांमधील कित्येकांना हे कृत्य आवडत नसे. स्त्रीने घर सांभाळावे, असे त्यांचे म्हणणे !” (अमृताश्व, पृ. ३३) पुढे पौरव जेव्हा कौरवांचे पशुधन लुटून नेतात. तेव्हा त्याची खबर मधुराच देते. तेव्हा अमृताश्व हा त्याच्या जनांतील स्त्रियांना आवाहन करतो की, “कौरवींनो, आज मी तुम्हाला रणांगणी चलण्याचा आदेश देत आहे. जुन्या काळात कौरवी पुरुषांच्या बरोबरीनं युद्धाच्या आखाड्यात उतरत असत असं आपण वृद्धमुखातून ऐकलेलं आहेच. आज तुमचा महापितर अमृताश्व तुम्हाला रणाची हक देत आहे.” (अमृताश्व, पृ. ३५) आणि खरंच या युद्धात स्त्रियांनी पराक्रम करून पौरवांचा खूप मोठा पराभव केलेला आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की, आता स्त्रिया या लढण्यासाठी स्वतंत्र नाहीत. त्यासाठी त्यांना जननायकाच्या आज्ञेची वाट पहावी लागते, समाजवास्तवात हा खूप मोठा बदल झालेला दिसून येतो. 

              ‘वोल्गा ते गंगा’ या ललित कथासंग्रहातील ‘निशा’, ‘दिवा’ या कथांमध्ये आदिम कालखंडातील स्त्री-पुरुष संबंधांचे तर ‘अमृताश्व’मध्ये आदिम कालखंडात घडून आलेल्या प्राथमिक बदलांचे चित्रण आलेले आहे. आदिम कालखंडात स्त्री व पुरुष यांच्यात पशुजीवनातल्याप्रमाणे नैसर्गिक नर-मादी या स्वरूपातले शारीरिक, लैंगिक संबंध असल्याचे दिसून येते. हा संस्कृतीपूर्व कालखंड आहे. यात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजव्यवस्था, संस्कृती इत्यादी गोष्टी निर्माण झालेल्या नाहीत. म्हणून स्त्री व पुरुष हा भेद निव्वळ नैसर्गिक पातळीवरील नर-मादी असा आहे. सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित भेदरेषा अजून निर्माण झालेल्या नाहीत. एका कुटुंबातील पुरुषाचा त्याच कुटुंबातील त्याची आई, बहीण, मुलगी, आजी, नात यापैकी सर्वांशी शारीरिक संबंध यायचा. याउलट त्या कुटुंबातील स्त्रीचा तिच्या पोटचा मुलगा, वडील, भाऊ, जमल्यास आजोबा व नातू या सर्वांशी शारीरिक संबंध यायचा व सर्वांपासून त्यांना अपत्यप्राप्ती व्हायची. त्या सर्वांचा एकमेकांशी शारीरिक  संबंध येत असल्यामुळे जन्माला आलेल्या अपत्याचा बाप कोण आहे, हे कोणीही सांगू शकत नव्हते व महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जाणून घेण्याची इच्छा किंवा आवश्यकताही त्या काळात कोणाला असल्याचे दिसत नाही. 

              या आदिम कालखंडात मुलगा व मुलगी वयात आल्यापासून त्यांची लैंगिक क्षमता असेपर्यंत ते एकमेकांचा शारीरिक उपभोग घेत असत. त्याबद्दल कुणाचेही कुणावर बंधन असल्याचे दिसून येत नाही. या संदर्भात आलेली वर्णने जरा तपासून बघूयात. ‘निशा’ या पहिल्या कथेत १६ जणांचे कुटुंब आहे. यात एक अतिशय म्हातारी स्त्री आहे. साधारणतः १८ वर्षांच्या दोन तरुणी आहेत. त्यांना एकूण सहा मुले आहेत. थोरला आठ वर्षांचा तर लहान एक वर्षाचा असेल. निशा ४०-५०च्या दरम्यानची आहे. चार पुरुष आहेत. त्यापैकी एक निशापेक्षा थोडा लहान. इतर १४ ते २६च्या दरम्यान. इतर दोन स्त्रियांपैकी एक १६ वर्षांची तर दुसरी २२ वर्षांची. असे हे कुटुंब आहे. हे सर्वजण दिसायला जवळपास एकसारखे आहेत. या कथेत वर्णिल्याप्रमाणे “आपण गुहेतले चेहरे पाहिले, आजीचा पण पाहिला. हे सगळे चेहरे ताडून पाहिले तर आजीच्या मुशीतूनच या सर्व स्त्री-पुरुषांचे रूप ढाळून निघाले असे स्पष्टपणे कळते.” (निशा, पृ. ४)        

              यांच्यातील चार पुरुष व तीन स्त्रिया शिकारीसाठी बाहेर पडतात. अस्वलांची शिकार केल्यावर तिथेच आधी एक वयस्कर पुरुष व षोडशी (सोळा वर्षांची) तरुणी बाहेर पडतात व लैंगिक संबंध आटोपून परत येतात. त्यानंतर तो पुरुष परत आल्यावर निशेकडून अस्वल कापण्याचे काम घेतो. त्यानंतर निशेने “खाली वाकून चोवीस वर्षांच्या तरुणाचे मुखचुंबन घेतले आणि त्याचा हात धरून ती बाहेर निघाली.” (पृ. ६) म्हणजे नंतर त्यांचे संबंध येतात. पहिल्या प्रसंगात मुलीला पुरुष घेऊन जातो. दुसऱ्या प्रसंगात स्त्री ही पुरुषाला घेऊन जाते. यात निशा ही पन्नाशीच्या आसपासची आहे व तो तरुण २४ वर्षांचा. आधीची तरुणी सोळा वर्षांची व पुरुष वयस्कर आहे. असे विषम, सरमिसळ स्वरूपाचे लैंगिक संबंध आहेत. त्या लैंगिक संबंधात स्त्रियांच्या ठायी स्त्रीसुलभ लाज, शरम इत्यादी भावना अजून निर्माण झालेल्या दिसत नाहीत. लैंगिक संबंधात वयाचे बंधन दिसत नाही. 

              या कुटुंबातील “म्हातारी आजी व थोरला पुरुष यांशिवाय सगळेच माच्या (निशेच्या) कुसव्यातून जन्मास आले होते आणि मा व थोरला पुरुष हे दोघे म्हातारीचेच मुलगा नि मुलगी होते.” (निशा, पृ. ८, ९) इतरांपैकी काहीजण या बहीण-भावांच्या संबंधातून जन्मास आले होते. “सगळ्या पुरुषांवर माचा समान आणि पहिला हक्क होता.” (निशा, पृ.१०) म्हणजे सर्वांशी ती तिच्या मर्जीप्रमाणे संबंध ठेवू शकायची. लांडग्यांशी लढताना मेलेला चोविशीतला तरुण माचा पुत्र व पतीही होता. (निशा, पृ. ९) म्हणजे त्याच्याशी तिचे शारीरिक संबंध यायचे. “माचे दोन पती जिवंत होते. तिसरा चौदा वर्षे उमरीचा लवकरच तयार होऊ घातलेला होता. तिच्या राज्यातील बालकांपैकी कितीजण पतिपदाला पोचत असतील हे सांगता येत नाही. माला सव्वीस वर्षांचा तरुण आवडत होता, त्यामुळे उरलेल्या तिघी तरुणींसाठी पन्नाशीची झुळूक लागलेला थोरला पुरुषच काय तो शिल्लक होता.” (निशा, पृ.९) “निशेच्या आधी जेव्हा तिची आई- म्हातारी आजी- हिचा अधिकार होता तेव्हा त्या म्हातारीला-तेव्हाच्या प्रोढेला कितीतरी बंधुपती होते, कितीतरी पुत्रपती होते. त्या साऱ्यांनी निशेबरोबर नाचून गाऊन तिला आपली प्रेमिका बनविण्यात यश मिळविले होते आणि मग स्वतः राणी बनल्यावर निशेची वारंवार बदलणारी प्रेमेच्छा झिडकारण्याची हिंमत तिच्या भावांत किंवा पुत्रांत नव्हती.” (निशा, पृ. १०) या सर्व वर्णनावरून कुटुंबातील लैंगिक संबंध ठेवायला सक्षम अशा वयाचे सर्व स्त्री व पुरुष सर्वांशी शारीरिक संबंध ठेवायचे, असे दिसून येते. 

              दुसऱ्या ‘दिवा’ या कथेत निशेनंतरच्या अडीच हजार वर्षानंतरच्या समाजाचे चित्रण आलेले आहे. यातही वरीलप्रमाणेच संमिश्र, सरमिसळ स्वरूपाच्या शारीरिक संबंधांचे चित्रण आलेले दिसून येते. दिवा व सूरश्रवा हे सख्खे भाऊ-बहीण असून त्यांच्यात शारीरसंबंध येतात. ते एकमेकांना आवडू लागतात. त्याआधी त्या जनातील जवळपास सर्व तरुणांशी तिचे संबंध आलेले आहेत. (दिवा, पृ.१५) स्त्रियांना, तरुणींना ज्या दिवशी जो तरुण किंवा पुरुष आवडायचा त्याच्यासोबत तो दिवस घालविण्याची त्यांना मुभा असायची. जनातील इतर स्त्रिया/ मुलीदेखील समजूतदारपणे ती गोष्ट स्वीकारायच्या. भावा-बहिणींचे संबंध तेव्हाही यायचे. (दिवा, पृ.१७) हे कुटुंब आता १५० जणांचे आहे. “या सर्वांचे चेहरे मात्र एका घडणीचे-एकसारखे! का नसतील? आपले बाप-भाऊ-मुलगे यांच्यापासून निशेला झालेल्या मुलामुलींची ही वंशावळ !” (दिवा, पृ. १९) उषाजनाशी झालेले युद्ध जिंकल्यावर जननायिका दिवा सर्वांसोबत आनंदोत्सव साजरा करते. त्या दिवशी ती तिचा पुत्र वसूशी संबंध ठेवते व तो ते नाकारू शकत नाही. प्राण्यांच्या दुनियेत आपण पाहिले तर आपल्याला असेच दिसून येते, जसे मानव प्राण्यांमध्ये साधारणतः ८००० वर्षांच्या आधीपासून तर ५५०० वर्षांपर्यंत होते.

              पुढे ५०० वर्षानंतर मात्र काही प्रमाणात परिस्थिती बदललेली आहे. याचे चित्रण ‘अमृताश्व’मध्ये आल्याचे दिसून येते. येथे विवाहसंस्था अस्तित्वात आलेली आहे. पण लग्नाआधी व लग्नानंतरही स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवायला स्वतंत्र आहे. स्त्रियांचे पती त्याबद्दल आक्षेप घेऊ शकत नव्हते. म्हणजे ही व्यवस्था समाजमान्य होती. स्त्रिया स्वतःचा पती स्वतः निवडू शकत होत्या. “त्या वेळी तिचे प्रेम जिंकण्याची प्रेमिकांत चढाओढ लागली होती; जयमाळ कृच्छ्राश्वाच्या कंठात पडली. इतरांबरोबर ऋज्राश्वाने देखील पराभव कबूल केला. आता सोमा कृच्छ्राश्वाची पत्नी झाली असली तरी ती जिवंत युगातली नारी होती. स्त्रीला त्या वेळी पुरुषांची जंगम संपत्ती मानण्यात येत नसे. त्यामुळे तिला अस्थायी प्रेमसंबंध करण्याचा अधिकार होता. अतिथी आणि मित्र यांच्या स्वागतासाठी आपल्या स्त्रीला पाठविणे हा त्या वेळचा सन्मान्य सदाचार होता.” (अमृताश्व, पृ. २९) ऋज्राश्व हा सोमाचा लग्नाच्या आधीपासूनचा प्रियकर. तिचा मुलगा हा ऋज्राश्वासारखाच दिसायला असल्याने तो त्याच्यापासून झालेला असण्याची शक्यता दोघांना होती. कारण त्या काळात तिचा अनेकांसोबत ऋज्राश्वाशीही शरीरसंबंध आलेला होता. सोमाचे लग्न झाल्यावर तिला अमृताश्व हा १२ वर्षांचा मुलगा असल्यावरही जेव्हा ऋज्राश्व तिच्या घरी येतो. त्या दिवशी ती त्याच्याशी रममाण होते. तसेच त्या दिवशी त्यांच्या जनात जो कार्यक्रम असतो. त्यात तिच्यासोबत जोडीदार म्हणून ऋज्राश्वच सहभागी होतो. अशा कार्यक्रमांमध्ये तरुण-तरुणी, स्त्रिया या अस्थायी प्रेमसंबंध म्हणजेच शरीरसंबंध ठेवू शकायचे. पण लग्न मात्र एकाच स्त्रीशी व्हायचे. म्हणजे बहुपत्नीत्व ही प्रथा नव्हती. पण पुढे जेव्हा या कौरवांच्या गटाचे पौरवांच्या गटांशी युद्ध होते, ज्यात कौरव गटाचे अनेक पुरुष मारले जातात व पौरव गटातील महिलांना त्यांच्या जनात सामील करून घेतले जाते. तेव्हा अचानक स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा वाढल्यामुळे महापितर असलेला अमृताश्व हा एकापेक्षा अधिक पत्नी करण्याचा कायदा करतो.

              त्याचप्रमाणे याच काळात वोल्गाच्या काठावर (पहिल्या दोन कथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे) मुक्त स्त्री-पुरुष संबंध असल्याचे, स्त्रियांना मुक्त व स्वतंत्र स्थान असल्याचे अमृताश्व व मधुरा यांच्या संवादातून आलेले आहे. 

              इ.स.पू. ३००० या काळात (आजपासून ५००० वर्षांपूर्वी) काही ठिकाणी पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था निर्माण झाल्याचे चित्रण ‘वोल्गा ते गंगा’ या पुस्तकाच्या ‘अमृताश्व’ या तिसऱ्या कथेत आलेले आहे. या कथेत वर्णन केल्याप्रमाणे कुरुजन (कौरव), दस्यू, पौरव अशा विविध वंशांचा, जनांचा उल्लेख आलेला आहे. पण हे सर्व जन आता पुरुषप्रधान आहेत. यांचा एक महापितर असतो. म्हणजे त्यांच्या जनांचा, टोळीचा प्रमुख असतो व तो पुरुष असतो. पुढे कुरुजनांचा प्रमुख अमृताश्व झालेला आहे. या काळात कार्यविभागणी घडून आलेली आहे. शिकार करणे कमी होऊन पशुपालन सुरू झालेले आहे. “कुरुस्त्रिया सूत कातण्यात आणि कांबळी विणण्यात कुशल बनल्या. परंतु त्यांच्या कुशलतेने समाजातले त्यांचे पूर्वीचे स्थान अढळ राहिले नाही. आता स्त्रीऐवजी पुरुष राज्य करतो. जननायिका आणि जनसमिती यांचे राज्य गेले व जनमताची पर्वा करून देखील सगळे काही आपल्या एकट्याच्याच मनाप्रमाणे अंमलात आणणाऱ्या लढवय्या महापितरांचे राज्य सुरू झाले.” (अमृताश्व, पृ. ३४) या काळात एका टोळीतील लोकं दुसऱ्या टोळीतील स्त्रियांना लुटून नेऊ लागले. दोन टोळ्यांमध्ये युद्ध झाल्यावर आधी हरलेल्या टोळीतील सर्वांना मारण्यात येत असे. पण आता अबालवृद्ध सर्व पुरुषांना मारून स्त्रियांना मात्र जिवंत ठेवण्यात येऊ लागले व त्यांना आपल्या टोळीत सामील करण्यात येऊ लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवाहसंस्था निर्माण झाली व स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्यही मर्यादित झाले. अर्थात हा मुद्दा आपण स्वतंत्र अभ्यासणार आहोत. पण या काळामध्ये स्त्रियांवर पुरुषांचा काही प्रमाणात मालकी हक्क सुरू झाला, हे या कथेतून स्पष्टपणे दिसून येते.   

              या काळातही काही जन/ टोळ्या या आधी वर्णन केल्याप्रमाणे स्त्रीप्रधान आहेत. त्यांचा उल्लेख अमृताश्व व मधुरा यांच्या संवादातून आलेला आहे. परंतु मधुरा व इतर स्त्रियांना ते माहिती नाहीये. स्त्रियांचे सर्व बाबतीतले स्वातंत्र्य व मुक्त जीवन ऐकून तिला आश्चर्य वाटते. अमृताश्व तिथे जाऊन आल्याने त्याने ते प्रत्यक्ष पाहिले आहे. 

              ‘निशा’ व ‘दिवा’ या कथांमध्ये वर्णन आल्याप्रमाणे स्त्रिया (व पुरुषसुद्धा) या पूर्णपणे विवस्त्र राहायच्या. गुहेच्या बाहेर शिकारीसाठी किंवा सरपण आणण्यासाठी जाताना मात्र अंगावर बैलाचे किंवा इतर प्राण्यांचे चामडे पांघरून जायच्या. रात्री नाचतानासुद्धा सर्वजण असेच विवस्त्र असायचे. ‘ते अगदी नग्न आहेत; अगदी जन्माच्या वेळी होते तसेच.” (दिवा, पृ. १८) पुढे ‘अमृताश्व’ या कथेतील काळात स्त्री-पुरुषांच्या अंगावर वस्त्र आलेले आहेत. या काळातील स्त्रिया सूत कातण्यात व कांबळी विणण्यात कुशल बनल्या आहेत. स्त्री व पुरुष कांबळी पांघरू लागले आहेत. त्याला पुढे गाठ मारून ते वस्त्र वापरू लागले आहेत. सुरुवातीच्या काळात स्त्रिया या अस्ताव्यस्त कशाही राहायच्या. पण दिवा ही वोल्गा नदीत छानपैकी केस धुते, वेणी घालते. त्यात फुलं, फुलांचा गुच्छ माळते. म्हणजे हळूहळू सौंदर्य जाणीव निर्माण झाल्याचे दिसून येते.

              या कथांमधील स्त्रिया हरीण, ससा, गाय, मेंढी, बकरी, घोडा, अस्वल, लांडगे व इतर उपलब्ध प्राण्यांची शिकार करून मिळालेले मांस भाजून किंवा कच्चे खातात. पहिल्या कथेत तर निशा व इतर स्त्री-पुरुष लांडग्याला मारल्यावर त्याचे गरम गरम खारट रक्तदेखील प्राशन करतात. मध पितात. जंगलातील फळे खातात. वोल्गा नदीतले मासे पकडून खातात. आधीच्या काळात घर वगैरे नसल्याने स्त्रियांना पाणी आणण्याचे काम नसायचे. पण पुढे लग्नसंस्था, कुटुंबसंस्था निर्माण झाल्याने ‘अमृताश्व’ या कथेत सोमा पाणी घ्यायला गेली असल्याचा उल्लेख आलेला आहे. या काळात घोड्याचे मांस, शिंगरुचे मांस मिठासह शिजविणे किंवा भाजणे इ. कामे तिच्या वाट्याला आलेली आहेत. पुढे पशुपालन सुरू झाल्याने स्त्रियांचे शिकार करणे बंद होऊन पाळीव प्राण्यांपासूनच मांस, दूध, चामडे, लोकर मिळू लागले आहे. म्हणजे त्यांच्या आहारात प्राण्यांच्या दुधाचा समावेश झालेला आहे. मात्र या सर्व काळांमध्ये स्त्रिया या पुरुषांसोबत मद्य प्राशन करताना दिसून येतात. पुरुषांसोबत मद्य प्राशन करणे, नाचणे, आनंद साजरा करणे या गोष्टी इथे समाजजीवनाचा भागच होत्या. 

वरील सर्व विवेचनावरून काही निष्कर्ष निघतात. ते पुढीलप्रमाणे-

  1. आदिम कालखंडात स्त्री-सत्ताक कुटुंबव्यवस्था होती व कुटुंबातील सर्व सदस्यांवर, पुरुषांवर तिची हुकमत चालायची. 
  2. कुटुंबातील बलाढ्य स्त्री ही कुटुंबप्रमुख बनायची. त्यासाठी प्रसंगी बहिणींमध्ये किंवा आई व मुलगी यांच्यात संघर्षही व्हायचा. 
  3. पुढच्या काळात अनेक कुटुंबांचे मिळून जन म्हणजे टोळ्या बनल्या. पण त्यांची प्रमुखही स्त्रीच असायची. नंतरच्या काळात मात्र पुरुषसत्ताक टोळीव्यवस्था निर्माण झाल्याचे दिसून येते.
  4. त्या काळातील कुटुंब व जन (टोळ्या) हे कुटुंबप्रमुख स्त्रियांच्या, जननायिकांच्या नावाने ओळखली जायची. उदा. निशाजन, उषाजन इ.
  5. आदिम काळातील स्त्रिया या पुरुषांबरोबर शिकार करायच्या. धाडसाचे सर्व कामे करायच्या. एवढेच नव्हे तर दोन टोळ्यांमधील युद्धांमध्ये सहभागी व्हायच्या.
  6. आदिम काळात आजच्याप्रमाणे श्रमविभागणी झालेली नव्हती. नंतरच्या काळात थोडी थोडी सुरुवात झाल्याचे दिसून येते.
  7. या काळात स्त्रियांचे पुरुषांकडून शोषण होताना दिसून येत नाही. 
  8. आदिम काळात युद्धात शत्रू टोळीतील सर्व स्त्री-पुरुषांना मारले जायचे. नंतरच्या काळात फक्त स्त्रियांना जिवंत ठेवून त्यांना आपल्या टोळीत सामील करून घ्यायची प्रथा सुरू झाली.
  9. या काळात स्त्री-पुरुष यांचे शारीरिक लैंगिक संबंध हे संमिश्र, सरमिसळ स्वरूपाचे, कुटुंबातील सर्वांचे सर्वांशी अगदी मुक्त स्वरूपाचे असायचे. या बाबतीत स्त्रीवर कोणतीही बंधने असल्याचे दिसून येत नाही.
  10. आदिम काळात स्त्रिया (व पुरुषही) विवस्त्र असायच्या. शिकारीवर जाताना थंडीपासून संरक्षणासाठी चामडे परिधान करायच्या. पुढच्या काळात कांबळी विणून ते वापरू लागल्या आहेत.
  11. या काळातील स्त्रिया या विविध प्राण्यांचे मांस कच्चे किंवा भाजून खायच्या. पुढच्या काळात   शिजवूनही खाऊ लागल्या. त्यासोबत या काळातील स्त्रिया पुरुषांसोबत मद्यदेखील प्राशन करायच्या. 

  1. ‘वोल्गा ते गंगा’, राहुल सांकृत्यायन, लोकवाङ्मय गृह, मुंबई, चौदावी आवृत्ती, डिसेंबर २०१५.

***********************************

Copyright- डॉ. राहुल भा. पाटील,

मराठी विभागप्रमुख,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर- ४०१ ६०३.

चलभाष क्र.- ९६२३०९२११३

ईमेल- patilrahulb14@gmail.com

Exit mobile version