Dr. Rahul Rajani

स्त्रियांच्या शोषणाची पार्श्वभूमी

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क 

डावललेले आहेत. हजारो वर्षे स्त्रियांनी हे दुय्यम स्थान, त्यामुळे होणारे शोषण निमूटपणे सहन केले. पण विसाव्या शतकात त्यांना आपल्या हक्कांची जाणीव झाली. आपल्या हक्कांसाठी त्यांनी जागतिक पातळीवर संघटना सुरू करून लढे द्यायला सुरुवात केली. सीमॉन द बोव्हार, एलिझाबेथ गॅस्केल, एमिली ब्राँटी व शार्लट ब्राँटी, शार्लट गिलमन, व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकांनी जागतिक पातळीवर स्त्रीवादाची पायाभरणी केली.

    स्त्रियांचे शोषण हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अगदी प्राचीन कालखंडापासून केले जात आहे. संपूर्ण जगात आपल्याला पुरुषप्रधान समाज व पुरुषप्रधान संस्कृती दिसून येते. या पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. तिला नेहमी वडील, भाऊ, पती, मुलगा यांच्या आधाराने व आश्रयाने जीवन व्यतीत करावे लागते. पुरुषांची सेवा करणे, पुरुषांचे कपडे धुणे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, भांडी धुणे, घर स्वच्छ ठेवणे, मुलांचे संगोपन करणे इत्यादी घरातील सर्व कामे स्त्रियांना आयुष्यभर करावी लागतात. याबद्दल त्यांना कुठलाही मोबदला, कौतुकाचे दोन शब्द मिळत नाहीत. याउलट तिला नेहमी दुय्यम लेखले जाते. 

    प्राचीन कालखंडात, ज्या काळात टोळीसंस्कृती होती आणि या टोळीसंस्कृतीत अनियंत्रित व सरमिसळ स्वरूपाचे लैंगिक संबंध होते. त्या काळात स्त्रीप्रधान किंवा मातृसत्ताक पद्धती होती. कारण स्त्रियांना मुलं नेमकी कशामुळे होतात, हे त्या काळात कळत नसे व नंतर जेव्हा कळायला लागले असेल, त्या काळातही सरमिसळ लैंगिक संबंधामुळे जन्माला येणार्‍या मुलांचे वडील नेमके कोण आहेत, हे समजणे शक्य नव्हते व ते त्या काळी फार महत्त्वाचेही मानले जात नसे. 

    यानंतरच्या काळात जेव्हा मालकी हक्काची भावना, संकल्पना उदयास आली. तेव्हा संपत्ती, स्त्रिया व त्यांच्यापासून जन्माला येणारी मुलं यांच्यावर आपला हक्क असावा, असे पुरुषांना वाटू लागले. यातूनच मग हळूहळू पुरुषप्रधान व्यवस्था आकारास येऊ लागली. पुरुष व स्त्रिया यांच्यात कामाची विभागणी घडू लागली. ती आता-आतापर्यंत होती. आजही काही मोजक्या स्त्रियांचा अपवाद वजा जाता ही व्यवस्था कायम आहे. स्त्रियांवर जाचक बंधने लादली जाऊ लागली. त्यांचा वंश, जात, धर्म किंवा अनोळखी व्यक्तीशी शरीरसंबंध येऊन वर्णसंकर किंवा रक्तसंकर घडून येऊ नये म्हणून विवाह संस्कृतीत अनेक बदल घडवून आणले गेले. मुलींचे बालवयात लग्न लावून देणे, प्रौढ-कुमारी विवाह करणे, एखादी स्त्री विधवा झाल्यास तिला सती पाठवणे, तिच्या पुनर्विवाहाला बंदी घालणे इत्यादी गोष्टींमुळे स्त्रीजातीचे संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले गेले. योनीशूचिता, केशवपन, हुंडा, खतना अशा असंख्य अन्याय्य व अमानुष प्रथा आणि स्त्रियांचे जगणे कठीण होऊन बसले. त्यांना शिक्षणाचा, स्वतःचा विकास साधण्याचा मार्ग बंद करण्यात आला. उच्चवर्णीय स्त्रियांपासून तर दलित, आदिवासी भटक्या-विमुक्त स्त्रिया सर्वांचेच याप्रमाणे शोषण झालेले दिसून येते. परंतु या सोबत सामाजिक स्तरभेद, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था यामुळे कनिष्ठ जातीतील स्त्रियांचे दुःख, वेदना या अधिक प्रमाणात असलेल्या दिसून येतात. 

    खरे पाहायला गेले तर जगाच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. ह्या सर्व स्त्रिया पुरुषांशी आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रेयसी अशा कोणत्या न कोणत्या शारीर नात्यांनी बांधली गेलेली असते. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पुरुषाचे प्रथम व स्त्रियांचे दुय्यम स्थान असल्यामुळे ती या जवळच्या नात्यांच्या पुरुषांच्या वर्चस्वाखाली आपले अवघे आयुष्य जगत असते. त्यामुळे तिचा संघर्ष हा अधिक गुंतागुंतीचा आहे. ज्यांच्याशी तिचे भावनिक, शारीरिक नाते असते, त्यांच्याच वर्चस्ववादी प्रवृत्तीविरुद्ध स्वतची सोडवणूक करण्यासाठी तिला लढावे लागत आहे. हा संघर्ष तसा शतकानुशतके सुरू असला तरी अलीकडे त्याला व्यापक व सर्वंकष स्वरूप प्राप्त झालेले आहे.  

© Copyright

डॉ. राहुल रजनी

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

Exit mobile version