प्रस्तावना :
साहित्याला समाजजीवनाचा आरसा असे म्हणतात. त्या-त्या कालखंडातील श्रेष्ठ अशा साहित्यकृतींमधून समकालीन घडामोडी, विचारप्रणाली, त्याचा जनमानसावर होणारा परिणाम याचे काल्पनिक पात्रे व घटनाप्रसंगांच्या माध्यमातून वास्तव असे चित्रण केलेले असते. म्हणूनच आपल्याला तत्कालीन समाजाचे दर्शन घडत असते. म्हणून साहित्य हे समाजजीवन अभ्यासण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाते.
पाकिस्तान निर्मितीची घटना ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची राजकीय घटना आहे. भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर या घटनेचे तात्कालिक व दूरगामी असे अनेक परिणाम घडून आलेले आहेत. १९४५ च्या आसपास पाकिस्तान निर्मितीचा विचार जोर पकडू लागला होता. इंग्रजांनी या विचारांना खतपाणी घालण्याचे काम केले. मुस्लीम लीग हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता. या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा जोरदार पुरस्कार करायला सुरुवात केली. मोहम्मद अली जिनांचे नेतृत्त्व याच मुद्द्यावरून पुढे आले. मुस्लिमबहुल गाव व शहरांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीमागची कारणे, त्यामागची विचारधारा, त्यासाठी निवडलेले मार्ग, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि या घटनेचे परिणाम यांचे चित्रण १९६० ते १९७५ या कालखंडातील या कादंबर्यांमधून पुढीलप्रमाणे आलेले आहे.
मराठी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
मराठीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्यांपैकी हमीद दलवाई लिखित ‘इंधन’ (१९६८) ही अतिशय वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. या कादंबरीत पाकिस्तान निर्मिती, त्या दरम्यान झालेले दंगे, मोहम्मद अली जीना इ. गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या कादंबरीत कोकणातील एका मुस्लीमबहुल खेड्याचे जीवनचित्रण आलेले आहे. या गावातील मुसलमानांचा पाकिस्तान निर्मितीसाठी जीनांना पाठिंबा होता. ते मुस्लीम लीग या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तिथल्या मापारी मशिदीजवळ दंगाही घडवून आणलेला होता. नायकाच्या वडिलांना आणि इतर मुसलमानांना असे वाटायचे की, “पाकिस्तान मिळालं की, सब कुछ ठीक होईल. इकडे मुसलमान, तिकडे हिंदू राहिले की कुणी कुणाच्या केसाला धक्का लावणार नाही.” १ परंतु, स्वातंत्र्य मिळून पंधरा वर्षे झालीत तरी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संबंधांत आणि भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव राहिला. हे बघून नायकाच्या वडिलांना असे वाटते की, पाकिस्तान निर्मिती ही जीना साहेबांकडून झालेली मोठी चूक आहे. एकदम स्वतंत्र पाकिस्तान मागण्याऐवजी भारताशी कुठे तरी बांधून घ्यायला हवे होते. म्हणजे अशी वाईट अवस्था झाली नसती. जीनासाहेब एवढे हुशार होते. परंतु, ही चूक त्यांच्या हातून झाली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, आम्ही अडाणी, अशिक्षित प्रजा होतो. ते पुढारी होते. त्यांनी आम्हाला सुधारायचे काम होते.
यावरून, भारत-पाक फाळणीला पंधरा वर्षे उलटल्यावर पाकिस्तान निर्मिती ही जीनांकडून झालेली एक मोठी चूक आहे, असे या कादंबरीतील मुसलमानांना वाटत असल्याचे दिसून येते. कारण ज्या हेतूसाठी पाकिस्तानची मागणी केली होती. तो पूर्ण होऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाक यांच्यातील संबंध नंतरच्या काळातही तणावग्रस्त राहिले.
या कालखंडातील इतर मराठी कादंबर्यांमध्ये या संदर्भातील चित्रण आढळले नाही.
हिंदी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
हिंदीतील ‘आधा गाँव’ (१९६८) ही राही मासूम रजा यांनी लिहिलेली एक बृहद कादंबरी आहे. या कादंबरीमधून ग्रामीण भागातील हिंदू-मुस्लीम संबंध तसेच पाकिस्तान निर्मितीची कल्पना, प्रक्रिया, प्रत्यक्ष घटना तसेच नंतरच्या परिणामांचे सूक्ष्म चित्रण लेखकाने केलेले आहे. त्यावरून पुढील मुद्द्यांच्या आधारे पुढीलप्रमाणे विवेचन केलेले आहे.
स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीच्या मागणीमागची कारणे :
‘आधा गाँव’ या कादंबरीतून असे दिसून येते की, स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा विचार हा शहरांकडून खेड्यांकडे आलेला आहे. पाकनिर्मितीचे समर्थक खेड्यांमध्ये यायचे आणि पाकिस्तान निर्मितीची आवश्यकता, कारणे लोकांना समजावून सांगायचे. ते सांगायचे की, “काँग्रेस हिंदुओं की पार्टी है ! चूँकि मुसलमान जमींदार ज्यादा हैं, इसलिए यह जमींदारी जरूर खतम करेगी। त देहातन में मुसलमान कै घर हैं? दाल में नमक की तरह त हैं।” (तसेच) “हिंदोस्तानी मुसलमान की तकदीर में रोना लिखा है।” २ म्हणजे त्यांना अशी भीती होती की, मुस्लीम लोकं जास्त संख्येने जमीनदार आहेत. म्हणून काँग्रेस जमीनदारी नष्ट करून टाकेल. मुस्लीम जमीनदारांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातील. आधीच मुस्लिमांची संख्या खेड्यांमध्ये फार कमी आहे. त्यांना दारिद्र्य आल्याने त्यांचे अस्तित्त्वच धोक्यात येईल.
अब्बाससारख्या तरुणांना असे वाटायचे की, “एक मरतबा पाकिस्तान बन गया तो मुसलमान ऐश करेंगे… ऐश !”३ यावरून काही तरुणांना ऐश करण्यासाठी पाकिस्तान हवा होता. कदाचित त्यांना असे वाटत असावे की, त्यांची इथे भारतात कुचंबना होत आहे आणि पाकिस्तानात ते स्वतंत्र व मुक्तपणे जगू शकतील.
काही स्वार्थी माणसे स्वत:च्या फायद्यासाठी पाकिस्तानच्या मागणीला मदत करीत होती. गंगौलीमधील हादी मियाँ आणि सद्दन मियाँ ही त्यापैकी काही उदाहरणे म्हणून सांगता येतील. हे दोघे पाकिस्तानसाठी मुस्लीम लीगला गावातील मते मिळावीत, म्हणून प्रयत्न करीत होती. १९४२ च्या आंदोलनात इंग्रज सरकारला मदत केल्यामुळे हादी मियाँना सरकारने डेप्युटी कलेक्टर या पदावरून बढती देऊन कलेक्टर केले होते. यावेळी सद्दन मियाँ हे तहसीलदार या पदावरून कलेक्टर होऊ शकणार होते. थोडक्यात, मुस्लिमांतील महत्त्वाच्या लोकांना या कामी इंग्रज सरकारची चिथावणी होती आणि अशी माणसे स्वत:च्या स्वार्थासाठी स्वतंत्र पाकच्या बाजूने जनमत संघटित करीत होती, असे दिसून येते.
पाकसमर्थक गंगौलीतील लोकांना असे सांगतात की, “पाकिस्तान न बना तो ये आठ करोड मुसलमान यहाँ अछूत बनाकर रखे जायँगे”, “हमारी मस्जिदों में गायें बाँधी जायँगी”, “जब हिंदू आपकी माँ-बहन को निकाल ले जायँ तो फर्याद न कीजियेगा”, “इसी नमाज के बचाव के लिए तो पाकिस्तान की जरूरत है”, “यह तो आप लोगों को मालूम ही होगा कि आजकल पूरे मूल्क में मुसलमानों की जिंदगी और मौत की लडाई छिडी हुई है।…. हम ऐसे मुल्क में रहतें है जिसमें हमारी हैसियत दाल में नमक से ज्यादा नहीं है। एक बार अंग्रेजों का साया हटा तो ये हिंदू हमें खा जायेंगे। इसलिए हिंदुस्तानी मुसलमानों को एक ऐसी जगह की जरूरत है जहाँ वह इज्जत से जी सकें”४, “और सबसे बडी बात तो यह है कि दुनिया के नक्शे पर एक और इसलामी हुकूमत का रंग चढ जायगा। और यह भी नामुमकिन नहीं कि दिल्ली के लाल किले पर एक बार फिर सब्ज इसलामी परचम लहराता नजर आये.”५ थोडक्यात, या देशात आपल्याला सन्मानाची वागणूक मिळणार नाही, आपले अस्तित्त्वच धोक्यात येईल असे पाक समर्थकांना वाटत होते, तसेच त्यांना आणखी एका मुस्लीम राष्ट्राचे आणि त्यापुढे जाऊन पुन्हा एकदा हिंदुस्तानवर राज्य करण्याचे स्वप्न खुणावत होते. कारण त्यांनी सातशे वर्षे भारतावर राज्य केलेले होते. म्हणून त्यांचे पाक निर्मितीसाठी वातावरण निर्मिती आणि जनमत संघटन सुरू होते, असे दिसून येते.
सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया :
स्वतंत्र पाकिस्तान या विषयावरून वातावरण अतिशय तापलेले होते. परंतु, ग्रामीण भागातील, खेड्यांमधीलसामान्य माणसे यापासून काही प्रमाणात लांब राहू पाहत होती. त्यांना हे विचार पटत नव्हते. खेड्यातील मुस्लिमांना असे वाटायचे की, इंग्रज भारताला कधीच सोडून जाणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे राज्य येण्याचा आणि आपले अस्तित्त्व धोक्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
काही सामान्य मुस्लिमांना तर पाकिस्तान म्हणजे काय? मुल्क म्हणजे काय? हेही कळत नव्हते. गंगौलीमधील अनेक मुस्लिमांना भारत-पाक यांपैकी कुणातच रस नव्हता. त्यांना गंगौली या गावातच राहायचे होते. फारुक हा उच्चशिक्षित तरुण गंगौलीतील लोकांना शहरात चालत असलेल्या घडामोडींचा परिचय करून द्यायचा. त्याच्या बोलण्यातून राजा महमूदाबाद, चौधरी खलीकुज्जमाँ, गजनफर अली, नवाब इस्माइल, नवाब यूसुफ, सर सुलतान हे नेतेही या आंदोलनात अग्रस्थानी होते, असा उल्लेख आलेला दिसून येतो. फुन्नन मियाँ फारुक नावाच्या एका तरुणाला विचारतात की, गंगौली पाकिस्तानात जाईल की, हिंदुस्तानात राहील. त्यावर तो भारतातच राहील, असे उत्तर देतो. मग फुन्नन मियाँ त्याला सांगतात की, गंगौली जर भारतातच राहणार असेल तर आमचा पाकिस्तान बनण्या न बनण्याशी संबंध काय? “ऐ भाई, बाप-दादा की कबुर हियाँ है, चौक इमाम बाडा हियाँ है, खेत-बाडी हियाँ है। हम कौनो बुरबक (मूर्ख) हैं कि तोरे पाकिस्तान जिंदाबाद में फँस जाय !”६ इंग्रज गेल्यावर इथे हिंदूंचे राज्य राहील, या उत्तरावर ते त्याला सांगतात की, हिंदू काय आम्हाला कापून टाकतील काय? असा प्रश्न विचारून ते ठाकूर कुँवरपाल, झिंगुरियाँ, परशुराम चांभार यांची उदाहरणे देऊन हिंदूंशी असलेल्या चांगल्या संबंधांचे वर्णन करतात. त्यांना पाकिस्तान हा पोट भरण्याचा खेळ असून काही लोकांनी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी तो मांडलेला आहे, असे वाटते. यावरून सामान्य मुस्लिमांचे गंगौली, तेथील माणसे, त्यांची तेथील श्रद्धास्थाने, त्यांची शेती यांच्यावर प्रेम होते. म्हणून पाकिस्तान निर्मितीचे विचार त्यांना मनापासून पटत नव्हते.
गंगौली या गावातील तन्नू दुसर्या महायुद्धात प्रत्यक्ष लढलेला होता. पाकिस्तानचे समर्थक सामान्य मुस्लिमांमध्ये हिंदुंविषयी भीती व संशयाची भावना निर्माण करू पाहत होते. तन्नूला असे वाटते की, “नफरत और खौफ की बुनियाद पर बननेवाली कोई चीज मुबारक नही हो सकती.” तसेच “कांग्रेस जमींदारी को तोडने की कोशिश जरूर करेगी क्योंकि ज्यादा जमींदार मुसलमान ही हैं। …. अगर ऐसा हुआ तो पाकिस्तान की इसलामी फौज दिल्ली पर हमला कर देगी !”, असे म्हणणार्याला तो, तुम्ही युद्धाच्या गोष्टी करू शकतात. कारण तुम्ही अजून युद्ध बघितलेले नाही. तुम्ही पाकिस्तान जरूर बनवा “मगर कभी-कभी खैरियत का खत लिखते रहियेगा वहाँ से।”७ असे उत्तर देतो. यातून सामान्य मुस्लिमांना शांतता, परस्पर विश्वासाचे वातावरण हवे होते, असे दिसून येते.
पाकिस्तान निर्मितीवरून झालेल्या दंग्यांच्या बाबतीत सामान्य माणसाला हिंसा, वैमनस्य, अविश्वास, रक्तपात, विटंबना या सर्व गोष्टी नको होत्या, असे दिसून येते. दंग्यांच्या बातम्या खेड्यांमध्ये पसरल्या. तेव्हा हिंदू लोकांना अनेक स्वामी आणि इतर धर्मांध व्यक्तींनी भडकाविण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांना हे समजत नव्हते की, “अगर गुनाह कलकत्ता के मुसलमानों ने किया है तो बारिखपुर के बफाती, अलावलपुर के घुरऊ, हुँडरही के घसीटा को, यानी अपने मुसलमानों को सजा क्यों दी जाय? जिन मुसलमान बच्चियों ने छुटपन में उनकी गोद में पेशाब किया है, उनके साथ जिना (लैंगिक अत्याचार, बलात्कार) कैसे और क्यों की जाय?….. जिन मुसलमानों के साथ वह सदियों से रहते चले आ रहे है, उनके मकानों में आग क्यों और कैसे लगा दी जाय? उन मुल्लाजी को कोई कैसे मारे जो नमाज पढकर मस्जिद से निकलते हैं तो हिंदू-मुसलमान सभी बच्चों को फूँकते हैं?…. जमीन के मामलें में एकाध कत्ल-खून हो जाय तो कोई बात नहीं। लेकिन यूँ ही, सिर्फ इस जुर्म पर किसी को कत्ल कर देना या किसी का घर फूँक देना कि कोई मुसलमान है, उनकी समझ में नही आ रहा था।”८ यावरून ग्रामीण भागातील हिंदू-मुसलमानांत जिव्हाळ्याचे, घनिष्ठ संबंध होते. आणि ते पिढ्यांपिढ्यांच्या सहवासातून निर्माण झालेले होते, म्हणून ते दंग्यांच्या विरुद्ध होते, त्यांच्या बुद्धीला ते पटत नव्हते, असे दिसून येते.
हिंसक वळण :
शहरातील मुस्लिमांना कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र हवे होते. त्यासाठी कोणत्याही पातळीवर जायची त्यांची तयारी होती. कट्टर हिंदुत्त्ववादी त्यांच्याविरुद्ध आक्रमकपणा दाखवून त्यांच्या मनात असुरक्षितता, भीती निर्माण करून जणू त्यांच्या मागणीला खतपाणीच घालत होते. त्यातून १९४५ नंतर भारतात हिंदू-मुस्लीम यांच्यात दंगे व्हायला सुरुवात झाली. दंग्याच्या बातम्या गंगौलीसारख्या गावांत येऊन धडकू लागल्या. ग्रामीण भागात या दोन्ही समुदायातील लोकांमध्ये सामंजस्य आणि सहिष्णूतेचे संबंध होते. परंतु, या गोष्टीला धार्मिक रंग दिला जाऊ लागल्याने काही प्रमाणात ग्रामीण भागातही दंग्यांचा पडसाद दिसून येऊ लागला. तरीही तो फार कमी प्रमाणात होता. गंगौली या गावात तरी दंगे वगैरे घडून आले नाहीत.
कलकत्त्यात दंगल घडल्याची बातमी गंगौलीमधील मौलवी बेदार यांच्यापर्यंत येऊन पोहचते. ते हकीम साहेबांना सांगतात की, “सुन रहे कि ई हरमजादे हिंदू मुसलमान के घरों में घुस-घुस के कतल कर रहे।” त्यावर हकीम साहेब उत्तर देतात की, “बाकी मुसलमानों कउनो हललजादे ना हैं।”९ या दोघांच्या संवादातून दंगल सुरू झाल्याचे तसेच खेड्यातही लोकांना स्वाभाविक संताप येऊ लागल्याचे तसेच आपले लोकंही कसे आहेत, हे त्यांना माहीत असल्याचे दिसून येते.
हिंदुंमधील काही लोकंही वातावरण तापवताना दिसून येतात. गंगौलीमधील मातादिन पंडित दंग्यांच्या काळात हिंदुंच्या सभा घेऊन लोकांना दंग्यांसाठी उत्तेजन देत होते. सलीमपूरमध्ये त्यांनी घेतलेल्या सभेत फुन्नन मियाँचा विश्वासू सहकारी झिकुरियाही होता. त्याच्याकडून फुन्नन मियाँना माहिती मिळाली. त्या सभेत मातादिनने गंगौली, अलावलपूर, हँुडरही आणि सलीमपूर या गावांवर हल्ला करून तेथील मुसलमानांना मारून टाकण्याचे ठरवले. तसेच ज्या मुसलमानांच्या घरात कधी काळी चांभारीन अथवा इतर हिंदू जातींमधील स्त्रिया रखेल म्हणून राहिल्या असतील, त्यांच्या घरातील मुलींना काढून आणायचे सांगितले. सभेतील हिंदूंना त्यांनी लाहोर आणि कलकत्ता येथे एकेका हिंदू स्त्रियांवर दहा-दहा मुसलमानांनी बलात्कार केल्याच्या ऐकीव घटना सांगून हिंदूंच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सभेतील हिंदू या गोष्टींवर विश्वास ठेवायला नकार देतात. तेव्हा ते गायीची शपथ घेऊन त्यांना वरील गोष्टी खर्या असल्याचे सांगतात. एक स्वामी भगवान कृष्णांचे नाव घेऊन लोकांना सांगतात की, आज श्रीकृष्ण भारतातील प्रत्येक हिंदूला आवाज देऊन सांगत आहे की, उठा आणि गंगा आणि यमुनेच्या पवित्र तटांवरून मुसलमानांना हाकलून लावा. लोकांना ते आवाहन करतात की, धर्म संकटात असून गंगाजल घेऊन प्रतिज्ञा करा की, भारताच्या या पवित्र भूमीला मुसलमानांच्या रक्ताने धुवायचे आहे. यावरून हिंदूंमधील कट्टरतावादी पाकिस्तान निर्मितीच्या घटनेचे औचित्य साधून बदला घेण्यासाठी मुसलमानांविरुद्ध जनमत चेतवत होते. त्यासाठी ते धार्मिक आवाहन करीत होते.
परिणामी, या सभेतील हिंदू लोकं बारिखपूरमधील मुस्लिमांची घरे जाळायला व त्यांना मारायला जातात. मात्र तेथील ठाकूर जयपाल सिंह या जमावाला पळवून लावतात आणि तेथील मुस्लिमांचे संरक्षण करतात. यातूनही हिंदू-मुस्लिमांमधील चांगल्या संबंधांचे दर्शन घडते.
पाकिस्तान निर्मितीचे परिणाम :
‘आधा गाँव’ या कादंबरीत पाकिस्तान निर्मितीनंतर झालेल्या विविध परिणामांचे चित्रण आलेले आहे. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यावर भारत व पाकिस्तानमधील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रचंड दंगली सुरू झाल्या. दिल्ली, लाहोर, अमृतसर, कलकत्ता, ढाका, चटगाव, सौदपूर, रावळपिंडी ही सर्व शहरे आगीमध्ये धुमसत होती. लाल किल्ला, जामा मशीद, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, हाल बाजार, उर्दू बाजार इ. ठिकाणीही आगी लागलेल्या होत्या. अनेक पुरुष आणि स्त्रिया या दंग्यांमध्ये मारल्या गेल्या. त्यापैकी गंगौलीमधील बच्छन, सगीर फातमा, तसेच रजनी कौर, नलिनी बॅनर्जी, अनारकली या स्त्रियांची नावे आलेली आहेत. अशा अनेक स्त्रियांची घनघोर विटंबना करण्यात आली. लेखक याचे वर्णन करताना लिहितो की, “अनारकली का नाम सगीर फातमा था, या रजनी कौर या नलिनी बॅनर्जी था- अनारकली की लाश खेत में थी, सडक पर थी, मस्जिद और मन्दिर में थी और उनके नंगे बदन पर नाखूनों और दाँतों के निशान थे। और लोगों ने खून से भीगे हुए गरारों, शलवारों और साडियों के टुकडों को यादगार के तौर पर हाफ्जे के सन्दूकों में सैंत-सैंतकर रख लिया था।” १०
फाळणीनंतर भारतातील अनेक मुसलमान पाकिस्तानात निघून गेले. त्यापैकी गंगौली या गावातील तन्नू हा आपल्या पत्नी व मुलीला तसेच हकीम साहेबांचा मुलगा कुद्दन हा आपल्या वडिलांना, बायको व मुलांना भारतात टाकून निघून गेला. सफिरवा हा बच्छन, सगीर फातमा आणि मुलांसोबत रेल्वेने पाकिस्तानकडे निघाला. मात्र दिल्ली आणि अमृतसरच्या दरम्यान एके ठिकाणी रेल्वे थांबली. तेथे रेल्वेवर हल्ला झाला. मुले मारली गेली. सफिरवा मुलांची प्रेते घेऊन पाकिस्तानात गेला. तर बच्छन आणि सगीर फातमा सीमेच्या इकडेच राहून गेल्या. नंतर त्याही मारल्या गेल्या. थोडक्यात, भारत-पाक फाळणीनंतर झालेल्या दंगलीत फार मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. त्यात दोन्ही धर्माची लोकं मारली गेली. स्त्रियांची विटंबना करण्यात आली, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
पाकिस्तान निर्मितीनंतर गंगौलीतील बहुतेक लोकांच्या नशिबी एकटेपण आले. कारण कुणाचे वडील, कुणाचा मुलगा, कुणाचा पती, असे प्रत्येकाचे कोणी ना कोणी पाकिस्तानात निघून गेले. काही प्रवासात मारले गेले. त्यामुळे भारतात राहिलेल्या त्यांच्या नात्यातल्या लोकांचे जीवन दु:खमय होऊन गेले. लेखक या परिस्थितीचे वर्णन करताना लिहितात की, “गरज कि आजादी के साथ कई तरह की तनहाइयाँ भी आयीं। बिस्तर की तनहाई से लेकर दिलों की तनहाई तक। उत्तर और दक्खिन-पट्टी में हर फर्द यकलख्त अकेला हो गया। बुढापा, जवानी और बचपन, सुहाग और बेवगी, दोस्ती, दुश्मनी और पट्टीदारी ! हर कैफियत अकेली थी। हर जज्बा तनहा था। दिन से रात और रात से दिन का ताल्लुक टुट गया था। दिन तो उसी तरह गुजर रहे थे जैसे गुजरा करते थे।….मगर रातें तो अजीरन हो जाती थीं। ख्वाब देखने को जी चाहता था पर काई किसके सहारे ख्वाब देखता !” ११
मुसलमानांमधील अनेक इंजिनियर, डॉक्टर मुले पाकिस्तानात निघून गेली. त्यामुळे सईदासारख्या उच्चशिक्षित मुलीला तिच्या शिक्षणाचा किंवा लायकीचा मुलगा मिळणे कठीण होऊन गेले. फुस्सू मियाँना त्यांच्या मुलींसाठी वर मिळणे कठीण होऊन गेलेले आहे. त्यामुळे ते अब्बास आणि मिगदाद या ‘दागी हड्डी’च्या म्हणजे शुद्ध वंश नसलेल्या मुलांशी आपल्या मुलींचे लग्न करायला तयार होऊन जातात.
शिवप्रसाद सिंह लिखित ‘अलग-अलग वैतरणी’ या कादंबरीत खलील मियाँचा मुलगा बदरुल त्याच्या बायकोला घेऊन पाकिस्तानात निघून जातो. तिथे गेल्यावर वडिलांना दोन-चार पत्रे पाठवून पाकिस्तानात निघून यायला सांगतो. इथल्या करैतातील लोकांना तो काफिर (म्हणजे इस्लामविरोधी, मूर्तिपूजक) असे संबोधतो. मात्र खलील मियाँ पाकिस्तानात जात नाहीत. ते मुलाला पत्र लिहून कळवितात की, “तुम्हारे पाकिस्तान पर मे लानत भेजता हूँ। साले तू दोंगला है। काफिरों के बीच अपना दर्जनों पुश्त गल गया।”१२ थोडक्यात, भारताला व भारतातील हिंदूंना ते आपले समजतात.
त्या काळात भारतात अनेक ठिकाणी दंगे होत होते. त्या बातम्या खलील मियाँच्या कानावर यायच्या. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची भीतीही निर्माण होते. त्यांची पत्नीही घाबरून जाऊन त्यांना पाकिस्तानात निघून जाण्याविषयी सांगते. तिला अशा परिस्थितीत भारतात राहणे धोक्याचे वाटते. खलील मियाँनाही प्रश्न पडतो की, खरंच चालले जायचे का? पण नंतर त्यांच्या मनातून एक आवाज येतो की, “क्या कहकर जाओगे। हाँ, मैं क्या कह कर जाता? जहाँ कोई खतरा न था, जहाँ काली से काली रात में भी कभी किसी ने मेरे खानदान की ओर गलत ढंग से आँख नहीं उठाई, वहा से क्या कहकर जाऊँ। काफिर मुझे सता रहे हैं, ऐसा कहना सरासर झूठ होता। बेटे, मुझे लगा कि यह धरती के साथ दगा करना है। झूठी तोहमत लगाकर वतन को छोडना सबसे बडा कुफ (गुन्हा) है।” १३ आणि त्यानंतर त्यांनी मनाशी पक्के केले की मी करैता (गाव) सोडून जाणार नाही. मात्र मोठा मुलगा अशा पद्धतीने पाकिस्तानात निघून गेल्याने त्यांना फार मोठा धक्का बसतो. त्यांची “उसी कमीने ने तो मेरा सारा हौसला पस्त किया। उसने तो मु्झे कही का नहीं छोडा। बीच भँवर में डालकर चला गया।” १४, ही प्रतिक्रिया यावर प्रकाश टाकते.
या घटनेमुळे भारतात ग्रामीण भागात राहणार्या हिंदू व मुसलमान यांच्यातील पूर्वीचे एकोप्याचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध बर्यापैकी बाधित झाले. त्यांच्यात परस्परांविषयी अविश्वास, तेढ, असंतोषाची भावना निर्माण झाली. उपरोक्त कादंबर्यांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. ‘इंधन’ या कादंबरीत तर या गोष्टींचे पर्यवसान हे फाळणीच्या पंधरा वर्षांनंतरही दंगलीत घडून येताना दिसते.
यावरून पाकिस्तान निर्मितीची घटना भारतातील हिंदू व मुसलमान या दोन्ही घटकांवर फार मोठा दूरगामी परिणाम करून गेली. ‘आधा गाँव’ या कादंबरीतील गंगौली हे गाव व या गावातील-परिसरातील लोकांच्या जीवनातील वरील घटना-प्रसंग तसेच ‘अलग-अलग वैतरणी’ या कादंबरीतील खलील मियाँ याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
निष्कर्ष :
१) स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती ही भारतीय इतिहासातील एक फार मोठी घटना आहे. या घटनेचा प्रभाव ग्रामीण भागावर खूप मोठ्या प्रमाणात पडलेला दिसून येतो. मराठीतील ‘इंधन’ या कादंबरीत व हिंदीतील ‘अलग-अलग वैतरणी’ या कादंबरीत थोडेसे तर ‘आधा गाँव’ या कादंबरीत मात्र या घटनेच्या जवळपास सर्वच पैलूंचे चित्रण आलेले दिसून येते.
२) स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीच्या आंदोलनाचे नेतृत्व मोहम्मद अली जीना यांच्याकडे होते, हे सर्वज्ञात आहे. या कादंबर्यांतूनही या गोष्टीला पुष्टी मिळताना दिसून येते. त्यांच्या व्यतिरिक्त राजा महमूदाबाद, चौधरी खलीकुज्जमाँ, गजनफर अली, नवाब इस्माइल, नवाब यूसुफ, सर सुलतान हे नेतेही या आंदोलनात अग्रस्थानी होते, हे ‘आधा गाँव’ या कादंबरीतील उल्लेखांवरून दिसून येते.
३) या घटनेमुळे हिंदू-मुस्लीम यांच्यातील संबंध खूप मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होणारे हिंदू-मुस्लीम लोकं नंतरच्या काळात एकमेकांविरुद्ध आक्रमक होताना, दंगे करताना व परधर्मातील स्त्रियांची विटंबना करताना दिसून येतात. गंगौली या गावात मात्र पाकनिर्मितीमुळे अशी एकही घटना घडलेली दिसून येत नाही. ‘इंधन’ या कादंबरीतील चित्रणावरून पाकिस्तान निर्मितीच्या वेळेस कोकणातील त्या खेड्यात मुस्लिमांनी दंगा घडवून आणला होता. नंतरही पंधरा वर्षानंतर या गावात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगा झालेला दिसून येतो.
४) ‘आधा गाँव’ या कादंबरीतील चित्रणावरुन पाकसमर्थक नेत्यांनी मुस्लिमांच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण केलेली होती. हा मुस्लिमांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे आणि सन्मानाने जगायचे असेल तर मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची नितांत आवश्यकता असल्याचे ते मुस्लिमांच्या मनावर बिंबवत होते, असे दिसून येते.
५) वरील विवेचनावरून असे दिसून येते की, गंगौली व करैता या गावातील खलील मियाँ, फुन्नन मिया, हकीम साहेब, फुस्सू मियाँ यासारख्या अनेक मुस्लिमांचे आपल्या गावावर, मातृभूमीवर प्रेम होते, मात्र तन्नू, सद्दन, सफिरवा हे पाकिस्तानात निघून गेलेले आहेत.
६) मुस्लिमांमधील बहुतांश तरुण कुटुंबातील त्यांची बायको, मुले, आई-वडील यांना भारतात सोडून पाकिस्तानात निघून गेल्याने मागे राहिलेल्यांच्या जीवनात दु:ख व एकटेपणाची लाट आलेली आहे. अनेक उच्चशिक्षित, डॉक्टर, इंजिनियर तरुण पाकिस्तानात एकटे निघून गेल्याने भारतातील मुस्लीम मुलींना लग्नासाठी वर मिळणे कठीण होऊन बसलेले दिसते.
संदर्भ :
१) हमीद दलवाई, ‘इंधन’, मौज प्रकाशन गृह, मुंबई, तिसरी आवृत्ती, १९९५, पृ. १४२.
२) राही मासूम रजा, ‘आधा गाँव’, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, सहावी आवृत्ती, २००९, पृ. ५१, ५२.
३) तत्रैव, पृ. ५८.
४) तत्रैव, पृ. २३९ ते २४२.
५) तत्रैव, पृ. २४८.
६) तत्रैव, पृ. १५५.
७) तत्रैव, पृ. २५१.
८) तत्रैव, पृ. २७५, २७६.
९) तत्रैव, पृ. २६३, २६४.
१०) तत्रैव, पृ. २८२.
११) तत्रैव, पृ. २९१, २९२.
१२ शिव प्रसाद सिंह, ‘अलग-अलग वैतरणी’, लोकभारती प्रकाशन, इलाहाबाद, सातवे संस्करण, २००८, पृ. १९२.
१३) तत्रैव, पृ. १९३.
१४) तत्रैव, पृ. १९१.
————————————–XXXOOOXXX——————————-
(‘संशोधन समीक्षा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये पूर्वप्रकाशित)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
(जर आपणास माझे लेखन आवडत असेल तर खाली शेअर करण्यासाठी विविध पर्याय दिलेले आहेत, त्यावरून आपले मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना जरूर पाठवा. धन्यवाद!)
१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्यांमधील जमीनदारवर्गाची आर्थिक परिस्थिती हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://drrahulrajani.com/452-2/