फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला
कर्जात जन्मलेला माझा बाप
कर्जापायीच का मेला ? …धृ…
रातंदिन काया मातीत
ढोरासारखा खपायचा
खळंभर पिकवायचा
तरी उपाशी का राहायचा?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …१…
दाणा-दाणा जमवून
हा बाजारात न्यायचा
कवडीमोल विकताना
का मनात कुढायचा?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …२…
मुद्दलीसोबत सावकाराला
व्याजही द्यायचा
तरीही त्याच्यासमोर
का दबून राहायचा?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …३…
गेल्या साली लागलेला
यंदा बंगला बांधायचा️
हा पोटातली भूक
का पोटातच दाबायचा?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …४…
याला लई हौस होती
मला नोकरीला लावण्याची
उच्चशिक्षित पोरगा नि डोनेशनचे रेट
पाहून, का हा रंगत जाळायचा?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …५…
याचा विश्वास मोठा
इथल्या लोकशाहीवर होता
स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी
का हा अश्रू ढाळत होता?
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला. …६…
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न…
असे अनेक प्रश्न होते
शिकलेल्या मुलाचे मन
त्यांची उत्तरं शोधित होते
नकळत त्या पोराची
मूठ आवळत गेली
त्याच्या एका डोळ्यात अंगार ️️
दुसऱ्यात पहाट फुलत गेली…७…
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113