Dr. Rahul Rajani

कोऱ्या पानांपासून वह्या

आपण काय करू शकतो? – आम्ही दरवर्षी को-या कागदांपासून जवळपास ४०० पेक्षा जास्त वह्या शिवून त्या NSS साठी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेत वाटत असतो. कोरी पानं कुठून उपलब्ध होतात? तर आपल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे प्रकल्प व इतर कामाच्या हजारो वह्या जमा झालेल्या असतात. ज्या एक किंवा दोन वर्षांनी रद्दी म्हणून विकल्या

जातात. या वह्यांमध्ये भरपूर कोरी पाने असतात. (काही वह्यांमध्ये ८-१० पानेच लिहिलेली असतात. ती काढून घेतली की नवी वहीच तयार होते.)  विद्यार्थ्यांना कामाला लावून ही कोरी पाने काढून घ्यायची व त्यांना घरून वह्या शिवून आणायला सांगायच्या. वह्या जमा करायचे काम विद्यार्थ्यांमधील लिडर्सकडेच सोपवायचे. जमा करताना हजेरीपत्रकाची एक प्रत समोर ठेवून जमा करणाऱ्याची सही व वह्यांची संख्या नोंदवून घ्यायची. NSSच्या विद्यार्थ्यांनी १२० तास भरून द्यायचे असतात. एका वहीसाठी ५ तास असे मी त्यांना सांगतो. त्यामुळे प्रत्येक जण किमान एक वही तरी आणतोच आणतो. अनेक विद्यार्थी २-३ वह्या शिवून आणतात. या प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत. हा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम (action program) आहे. यामुळे आपण हजारो झाडांची कत्तल रोखू शकतो. मुलांना चांगली सवय लावू शकतो. ते त्यांच्या घरातील कोरी कागदेही मग वापरू लागतात.

या समुहातील प्रत्येक शिक्षकाने हा प्रकल्प हातात घ्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना करायला सांगा. मित्रांचा समूह तयार करून काम करा. पालकांनी त्यांच्या मुलांना मागच्या वर्षाच्या वह्यांमधील कोरी पाने वापरायला सांगा. ”४ वह्या नव्या व दोन वह्या जुन्या” असं एक घोषवाक्यच तयार करता येईल. (जुन्या पिढीतील अनेकांना त्यांचे बालपण आठवले असेल. कारण त्यांचे बरेचसे शिक्षण जुन्या वह्यांवरच झालेले आहे.) चला मग कामाला लागा आणि बघा या समुहातील व्यक्तींच्या माध्यमातूनच दरवर्षी  लाखो वह्या तयार होतील व वापरल्या जातील. त्यांचे बाजारमूल्य काढून बघा. “निसर्ग वाचेल, तरच माणूस जगू शकेल”. सगळ्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा. (प्रत्यक्ष काम करतानाचे फोटो काढून ग्रुपवर टाका.)

(२५/०५/२०१६- NSS मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना मी NSSच्या ग्रुपवर टाकलेला मॅसेज.)

– राहूल पाटील

Exit mobile version