Dr. Rahul Rajani

बदल

जे माझं नव्हतंच कधी

ते मी माझं म्हणायला लागलो

 

माझ्या मनात ते 

खोल खोल रुतत गेलं

माझ्या रक्तात

वाहायला लागलं

माझ्या डोळ्यांतून 

आग बनून सांडू लागलं

माझ्या नसानसांमधून

सळसळू लागलं

माझ्या आत खोलवर 

काहीतरी धुमसू लागलं

मग मीच बनत गेलो

एक स्फोटक द्रव्य…

 

आणि जे माझं होतं

माझ्या सतराशे साठ

पिढ्यांमधून वाहत आलं होतं

संथपणे नदीसारखं…

जंगलांत हिरवळ पेरीत

पशू-पक्ष्यांची तहान भागवित

त्यांच्या कंठांमध्ये सुस्वर जागवित

‘जो जे वांछिल तो ते’ पूर्ण करीत

ते कुठं हरवलं, लुप्त झालं

ते मला, माझ्या बापालाही कळालं नाही


आणि जो नव्हतोच मी कधी

माझे पूर्वजही नव्हते जसे कधी,

तसा मी बनत गेलो हायब्रिड

माझ्याही नकळत…

 

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

Exit mobile version