Dr. Rahul Rajani

गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता

            प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

         या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते. 

        आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.

● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण

त्यांच्या मते परशुरामाने २१ वेळेस पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याने आता कुणीही क्षत्रिय उरलेला नाहीये. ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनादेखील शूद्र समजायचे.
● या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर अतिशूद्र, आदिवासी इ. घटक होते. त्यांना अतिशय अमानुष अशी वागणूक देण्यात येत असे.
● हिंदू धर्मात मनुस्मृती हा ग्रंथ कायद्यासमान होता.
● हा ग्रंथ स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना अतिशय कमी, नीच लेखणारा व त्यांचे मनुष्यत्व नाकारणारा होता.
● शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, आदिवासी अशा जवळपास ९०% वर्गाला मनुस्मृतीनुसार शिक्षणाचा, संपत्ती व शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता.
● ब्राह्मण हा वर्ग सर्वश्रेष्ठ समजला जात असे.
● जातीनिहाय व्यवसाय विभागणी करण्यात आलेली होती. जातीबाह्य व्यवसाय करता येत नव्हते.
● माणसांच्या कला-गुणांना विशेष संधी उपलब्ध नव्हती. कारण जातीबाह्य व्यवसायांना बंदी.
● पुनर्जन्म, पाप-पूण्य, कर्मकांडे, अनिष्ठ रूढी-परंपरा-चालीरीती यात समाज आकंठ बुडाला होता.
● स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ यांत पूर्णतः बंदिस्त करण्यात आले होते.
● स्त्रियांच्या बाबतीत बालविवाह, विधवाविवाहास पूर्णतः बंदी, जरठकुमारी विवाह, केशवपन, सतीप्रथा इ. अन्यायकारक गोष्टी सर्रास सुरू होत्या.
● अस्पृश्यता- शूद्र-अतिशूद्रांचा स्पर्श टाळणे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास- सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास बंदी घालणे, त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणे, त्यांची सावलीही सहन न करणे अशा गोष्टी समाजात कटाक्षाने पाळल्या जात होत्या.
● कोणत्याही हिंदूला समुद्रगमन अर्थात समुद्र ओलांडून जाण्यास बंदी होती. त्यामुळे जगात बाहेर काय चालले आहे, ते कळायला मार्ग नव्हता.
● प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर धर्माचा प्रचंड पगडा होता. व्यक्तीने कशा पद्धतीने जीवन जगावे हे धर्मव्यवस्था ठरवीत असे. उदा. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांचे निधन.
● वरील गोष्टी धर्ममान्य समजल्या जात होत्या. म्हणजे त्यांना धर्माचा आधार होता.
● ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष ईश्वरनिर्मित मानल्या जात होत्या. म्हणून वरील परिस्थिती अपरिवर्तनीय मानली जात होती.
● या सर्व परिस्थितीमुळे आपल्या भारतीयांचा विकास पूर्णतः खुंटला होता.
● यात व्यक्तीच्या विकासाला कोणतीही संधी नव्हती.

अशा बऱ्याच गोष्टी त्या काळात होत्या.

या परिस्थितीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सर्वप्रथम प. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय व महाराष्ट्रात म. फुले यांनी केला. त्यातल्या त्यात फुल्यांचे कार्य हे खूप क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. त्यांचे ग्रंथ, त्यातील विचार, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या वरील व्यवस्थेला खिळखिळी करणाऱ्या ठरल्या. त्यांचा वारसा पुढे सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज क्रांतिकारकांनी चालविला. यांनी आपले संपूर्ण आयुष्य येथील शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, आदिवासी यांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी खर्ची घातले. त्यासाठी त्यांनी लढे दिले, संघटना-पक्ष स्थापन केले, ग्रंथ लिहिले, सरकारला कायदे करायला भाग पाडले.

त्याचा परिणाम असा झाला की वरील परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला.
● स्त्रिया, शूद्र, आदिवासी अशा सर्वांना शिक्षण घेण्याची, जातीबाह्य व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली. शिक्षण व बदललेली

व्यवस्था यामुळे ते नोकरी करू लागले. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात का असेना पण सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारायला मदत झाली.
● सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, विवाहासाठी संमतीवयाचा कायदा असे अनेक कायदे संमत करण्यात आले. स्त्रियांना हजारो वर्षानंतर काही प्रमाणात का असेना मोकळा श्वास घेता येऊ लागला.
● धर्माचे लोकांच्या जीवनावरील वर्चस्व कमी होऊ लागले. ऐहिकतेला महत्त्व प्राप्त झाले.
४) मनुस्मृतीचा कायदा डावलून आधी इंग्रजांनी आधुनिक न्यायव्यवस्था सुरू केली. राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याचे ठरविण्यात आले. यानंतर सर्वांना समान दर्जा, न्याय, संधी व विकासाची ग्वाही देण्यात आली.

पण आज परिस्थिती काय आहे? तर…

● ज्या महापुरुषांमुळे येथील स्त्रिया, शूद्र, आदिवासी यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला, त्यांचे कार्य, विचार जाणून घेण्यासाठी ‘लाभार्थी’च तयार नाहीत.
● काहींनी काही प्रमाणात जाणून घेतले आहे पण त्यानुसार वागायला तयार नाहीत.
● त्यांना नोकरी वगैरे मिळाली, व्यवस्थेकडून जे लाभ मिळत आहेत, त्याचे श्रेय ते या महापुरुषांना न देता कुलदेवता किंवा इतर देवदेवतांना देतात.
● आपल्याकडे प्रबोधन युग जणू काही अवतरलेच नव्हते अशा पद्धतीने लोकं वागू लागले आहेत.
● ज्या धर्मांच्या नावाने हजारो वर्षे स्त्रिया, शूद्र, आदिवासी यांचे माणूसपण नाकारण्यात आले होते, तेच घटक आज धर्माचा अतिरेकी अभिमान बाळगायला लागले आहेत.
● यातील बहुतांश धर्मासाठी जीव द्यायला व घ्यायलाही तयार आहेत.
● स्त्रिया तर धार्मिक कर्मकांडांमध्ये, अंधश्रद्धांमध्ये आकंठ बुडालेल्या आहेत.
● मुलांवर लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक इ. मूल्यसंस्कार न करता जाणीवपूर्वक धर्मसंस्कार करण्याकडे कल वाढला आहे.
● यामुळे आपली पुन्हा एकदा मध्ययुगाकडे वाटचाल सुरू झाली आहे की काय असे वाटू लागले आहे.
●आधुनिक काळात धर्माचा सारासार विचार करून आधुनिक कालखंडाला अनुरूप आचरण पद्धती अवलंबण्याऐवजी परधर्माबद्दल द्वेष, कट्टरता, हिंसा वाढीस लागून सामाजिक वातावरण दूषित होत चालले आहे.

          अशा या उलट्या वाटचालीमुळे संवेदनशील, पुरोगामी, समाजात एकोपा, शांतता नांदावी अशा विचारांच्या लोकांच्या मनात नैराश्य निर्माण व्हावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे आपले संत, समाजसुधारक, विचारवंत यांनी पाहिलेल्या एका चांगल्या समाजाचे स्वप्न अपूर्णच राहील असे वाटायला लागले आहे.

 

© डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे 

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय 

जव्हार, जि. पालघर. 

Exit mobile version