Dr. Rahul Rajani

सनातन्यांची कारस्थाने

           नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या

संकल्पनेतील ‘भारत माता’ जी सिंहावर आरूढ झालेली आहे, जिच्या बाजूला भगवा ध्वज आहे (तिरंगा नाही) व अखंड भारत -जो बांगलादेश व पाकिस्तान मिळून तयार होतो- तो फोटो त्यांनी तिथे ठेवलेला होता. दिवसभर तो तिथे आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तो दिसायला हवा. तसेच बाजूला विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो आहे.

           तर अशा रीतीने तरुणांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हे लोक करत आहेत. अशा उपक्रमांसाठी मेंदूची आवश्यकता नसते. मात्र लोकांवर यांचा सहज प्रभाव पडत असतो. या अखंड भारत व भारतमातेच्या प्रतिमेमध्ये तिरंगा नाहीये, तर भगवा झेंडा आहे. त्यावरून यांच्या संकल्पनेतील तो अखंड भारत कसा असेल, याची कल्पना आपल्याला येते. जिथे भगवा असेल, तिथे एका धर्माचे राज्य असेल. मग एका धर्माच्या राज्यात आता आहे तसे सर्वांना समान अधिकार, स्वातंत्र्य, संधी देणारे संविधान कसे असणार? आणि जिथे संविधान नसणार तिथे समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवतावाद या गोष्टी तरी कशा असतील? याचा विचार करायला हवा.

          मागच्या वर्षी मी नाशिकमधील एका महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करायला गेलो होतो. तेथेही हीच प्रतिमा होती. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एखाद्या महाविद्यालयात अशी प्रतिमा लावून तिची पूजा कशी काय करता येऊ शकते, हा प्रश्न मला पडला होता.

          तर ही यांची अशी कारस्थाने थांबवणार नाहीत. तेव्हा तरुणांनी अखंड सावध असायला हवे. हा यांचा शुद्ध खोडसाळपणा असून आधुनिक काळात हे शक्य नाही. पण या प्रतिमा व कधीच साकार न होऊ शकणाऱ्या संकल्पना, ध्येये दाखवून बहुसंख्याकांना भुलविता येते व याच्या आधारे निवडणुका जिंकता येतात, हे त्यांना चांगलेच माहीत झालेले आहे. तेव्हा तरुणांनी याकडे गांभीर्याने बघायला हवे. यांची कारस्थाने लक्षात घ्यायला हवीत.

         स्वातंत्र्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशातील ९५ टक्के लोकांचे भाग्य उजळले आहे, हे लक्षात घ्या. हिंदू राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र, बौद्ध राष्ट्र अशा धार्मिक, संधिसाधू लोकांच्या भूलथापांना, कारस्थानांना बळी पडू नका. सावध रहा.

Exit mobile version