Dr. Rahul Rajani

नवीन, आधुनिक व विधायक समाजनिर्मितीसाठी संशोधनाची गरज

             मेंदूत नवीन विचार व कल्पनाच येत नसतील, तर नवीन संशोधन कसे होणार? संशोधनच नाही झाले तर आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, शस्त्रास्त्रे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण संरक्षण, शहर नियोजन इ. इ. क्षेत्रांमध्ये नवीन भर पडून त्यावर आधारित उद्योग, व्यवसाय कसे निर्माण होणार? असे काही घडले नाही तर अनेकांच्या हाताला काम कसे मिळणार?

         मानव्यविद्या शास्त्रांमध्येसुद्धा माणसाच्या भविष्यातील मानसिक, बौद्धिक, वैचारिक प्रगतीसाठी, एक सुसंघटित, आधुनिक, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद, शांततापूर्ण सहजीवन यावर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी समकालीन समस्या, वस्तुस्थिती यांचा सूक्ष्म अभ्यास करून नवीन मार्ग, दिशा, दृष्टिकोन, विचार यांचा शोध घेऊन तो समाजात रुजवणे, या सर्व गोष्टींसाठी नवनवीन संशोधनाची, त्यासाठी विचार स्वातंत्र्याची आवश्यकता आहे.

           परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. येथे काहीही स्थिर नाही. असे असताना आपण फक्त भूतकाळात रमू शकत नाहीत आणि आधीच्या समाजपुरुषांनी निर्माण केलेल्या त्या-त्या काळाला अनुरूप योग्य असलेल्या मार्गांचा, व्यवस्थांचा अवलंब जशाच्या तशा प्रकारे आपण करू शकत नाहीत.

          मानवजातीची प्रगती होत आहे, तिचे वय वाढत आहे, तेव्हा लहानपणी जी खेळणी आपण खेळायचो, त्यांच्यासोबत खेळून चालणार नाही. तेव्हा आपण मोठे होत आहोत, मानवजातीच्या लाखो वर्षाच्या इतिहासात असंख्य बुद्धिमान, सृजनशील, कष्टकरी, तंत्रस्नेही, कलावंत, प्रतिभावंत यांनी निर्माण करून ठेवलेले ज्ञान, अनुभव यातून जडणघडण होत आपण इथपर्यंत पोहचलेलो आहोत, त्यात अजून कालानुरूप भर न घालता घट करणे, हे करंटेपणाचे व मागासलेपणाचे लक्षण आहे.

         म्हणून अभ्यास, संशोधन, नवीन विचार यांचे सहर्ष, आपले दोन्ही हात पसरून मुक्त मनाने स्वागत करणारा, त्यांचे आकलन करून त्यानुसार स्वतःत बदल घडवून आणणारा समाज निर्माण करणे, हेच आपले ध्येय असायला हवे, असे मला वाटते.

© copyright  

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

 

(माझे मराठी साहित्य, भाषा, व्याकरण, शिक्षण, प्रेरणादायी व्याख्याने इ. विषयांवर २५० पेक्षा जास्त व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या युट्युबच्या लिंकवर क्लिक करा. – https://www.youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw धन्यवाद!)

Exit mobile version