बहुजन समाजातील अनेक जण आज नोकरी, व्यवसाय करत आहेत, उच्चशिक्षित आहेत. आनंदाने जीवन व्यतित करत आहेत. अतिशय आनंदाची व समाधानाची बाब
आहे. मात्र आजच्या या यशाचे, सुखाचे श्रेय कुणी स्वामी समर्थांना, कुणी साईबाबांना, कुणी गजानन महाराजांना, कुणी अनिरूद्धांना, कुणी समर्थांच्या बैठकींना आणि अशा अनेकांना देतात. यांना कदाचित माहीतही नसेल की, एके काळी यांना विनावेतन (विनामोबदला), विनातक्रार व अतिशय नम्रपणे मान खाली घालून त्रैवर्णिकांची सेवा करावी लागायची. शिक्षणाची, जातीने नेमून दिलेल्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्याची मुभा, परवानगी नव्हती. म. फुले, राजर्षी शाहू महाराज, आंबेडकर, राज्यघटनाकर्ते असंख्य उदारमतवादी यांच्यामुळे हे चांगले दिवस यांना बघायला मिळत आहेत. शिक्षण घेतले, नोकऱ्या मिळाल्या, पैसा मिळायला लागला, पण स्वत:ची बुद्धी चालवायला शिकले नाहीत, याचेच हे लक्षण आहे.
मनुवादी व्यवस्थेच्या जागी लोकशाही आली, राज्यघटनेनुसार राज्यकारभार सुरू झाला. शिक्षणाची संधी मिळाली म्हणून आज बहुजन समाज सन्मानाने, सुखाने, जगू शकत आहे. संपत्तीसंचय करू शकत आहे. कुणी देव वा बुवाबाबांमुळे नाही. लवकर लक्षात घ्या. मूळ विसराल तर मुळासकट उखळले जाणार. पुन्हा जुने दिवस यायला वेळ लागणार नाही. पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी स्वबुद्धी वापरून चिकित्सा करू लागा. – राहूल