Dr. Rahul Rajani

सरस्वती व माझे पूर्वज

सरस्वतीला भारतात हजारो वर्षे ज्ञानाची देवता मानले गेले आहे. पण तिच्यामुळे भारतातील स्त्रिया, शूद्र, आदिवासी व भटक्या जमाती यांना शिक्षणाचा, ज्ञानग्रहणाचा अधिकार मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आजही सरस्वतीच्या देशात 75% पेक्षा जास्त साक्षरता

नाही व या 75%मध्ये सुद्धा ज्यांना फक्त सह्या करता येतात, त्यांचीसुद्धा गणना साक्षर म्हणून केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे ज्यांना वाचता लिहिता येते ते देखील समाजशास्त्रे, विज्ञान, वैचारिक साहित्य इत्यादी वाचत नाहीत, फक्त भावनेच्या भरात बोलतात, लिहितात, ही वस्तुस्थितीदेखील लक्षात घेतली जायला हवी.

मी हिंदूच आहे. पण माझ्या शेकडो पूर्वजांना हिंदू असूनही शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला होता. म्हणून माझ्या शेकडो पिढ्या मातीत राबून मातीतच मिसळून गेल्या. त्यांच्या विकासाच्या वाटाच त्यामुळे खुंटल्या होत्या. इंग्रजांच्या म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या राज्यात इथल्या सर्वांसाठी शिक्षण खुले केले गेले. आज बहुजन समाजाने धर्माची झापडे बाजूला करून थोडे इतिहासात डोकावून ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.

आज बरेच शिक्षक, ग्रामसेवक किंवा वेगवेगळ्या पदांवर असलेल्या बहुजन समाजातील नोकरदारांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, अजूनही आपली फार प्रगती झालेली नाही. आपला समाज, आपली भाऊबंदकी अजूनही विकासापासून कोसो दूर आहे व याला कारण म्हणजे आपल्या पूर्वजांना शिक्षण नाकारले गेले होते. कल्पना करा की, हजार वर्षापासून भारतात सर्वांना शिक्षण खुले राहिले असते तर आज आपण व आपला देश कुठे राहिला असता.

म्हणूनच म. फुले यांनी १६०-१७० वर्षांपूर्वी

विद्याविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले।

असे सुत्ररूपात लिहून ठेवलेले आहे.

या काळात सरस्वती होती, पण तिने वैदिकांकडून धर्माची लाच घेऊन आपल्याला सावत्र म्हणून वागवले व आपल्याला माणूसपणापासूनच पारखे केले, असेच म्हणावे लागेल.

(टीप- मी हिंदू आहे व हिंदूच राहणार. पण माझ्या पूर्वजांच्या आयुष्याची माती करणाऱ्या व आजही जगाच्या स्पर्धेत मागे राहण्यास कारणीभूत ठरलेल्या वैदिक आर्यांच्या प्रतिकांना नाकारणार. मी ‘सुधारक’ व ‘प्रबोधना’वर विश्वास ठेवणारा हिंदू म्हणून आयुष्य जगणार.

बंधू-भगिनींनो, सोबत या. मला प्रकाशाची वाट दिसतेय!)

© – डॉ. राहुल पाटील

Exit mobile version