Dr. Rahul Rajani

पुनर्जन्म – एक घातक संकल्पना-

प्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,

पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.

कसे ते पहा.

पुढचा जन्म चांगला केव्हा मिळेल?

म्हणजे या जन्मातील नरक/ गुलामगिरी चुकायची नाही व ही शोषणव्यवस्था, गुलामगिरी, चातुर्वर्ण्य व्यवस्था छानपैकी टिकून राहिली. या जन्मात काहीही चांगले घडण्याची आशा राहिली नाही. कारण पुनर्जन्म ही संकल्पना. बरं ही संकल्पना मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात नाही. हिंदू धर्मात आहे व या संकल्पनेवर अख्खी चातुर्वर्ण्य व्यवस्था हजारो वर्षे टिकून होती.

आज बहुजनांच्या आयुष्यात थोडे काही चांगले घडले की, मी पूर्वजन्मात काहीतरी चांगले केले असेल असे म्हणतात.

मग तुमच्या सलग ५६ पिढ्यांनी पूर्वजन्मात पापे केली होती का?

स्त्रियांना शिक्षण, नोकरी नसल्याने ‘चूल आणि मूल’च्या पलीकडे जाताच आले नाही.

आता शिक्षण घेता येत आहे म्हणून नोकरी किंवा व्यवसाय करता येत आहेत. काही करियर करत नसतील पण शिक्षणामुळे चांगला नोकरदार, व्यावसायिक याच्यासोबत लग्न करून काहीएक प्रमाणात चांगले आयुष्य जगत आहेत.

हे पूर्वजन्मातील पुण्यामुळे, हरितालिका व्रत केल्यामुळे नव्हे. तर तुमच्या त्या पूर्वाश्रमीच्या शूद्र/ अतिशूद्र पतीला शिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यामुळे.

शिक्षणाची संधी कुणामुळे मिळाली?

तर इंग्रजांमुळे (ख्रिश्चनांमुळे). कारण ही आधुनिक शिक्षणव्यवस्था त्यांनी भारतात आणली. शिक्षण सर्वांना खुले त्यांच्यामुळे झाले. तसेच फुले, शाहू, आंबेडकर, राज्यघटनाकार व इतर समाजसुधारकांमुळे.

त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेऊन आपले जातिनिष्ठ व्यवसाय सोडू शकलो व विविध क्षेत्रात करिअर करू शकलो. चांगली घरं बांधू शकलो, भारी भारी कारमध्ये फिरत आहोत, फटफट्या, स्कुट्या पळवत आहोत. या वस्तू घेण्याची, सन्मानाने जगण्याची संधी वरील घटकांमुळे/ व्यक्तींमुळे आपल्याला मिळाली आहे.

तेव्हा अजूनही पुनर्जन्म मानणाऱ्यांनो, जरा घेतलेल्या शिक्षणाचा वापर करा. जरा वस्तुनिष्ठपणे आपला सामाजिक, सांस्कृतिक इतिहास तपासा.

आपले पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे पणजोबा कसे जगले, हे जरा शोधा व त्यांनी पूर्वजन्मात काय पापे केली होती, याचा शोध घ्या!

आपलाच,

© डॉ. राहुल पाटील

Exit mobile version