Dr. Rahul Rajani

सावधान! इतिहास पुसला जात आहे!

भारताने इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा हा भारताच्या व जगाच्या इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद असा अध्याय आहे. 
ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता अशा राज्यकर्त्यांविरुद्ध आपण शंभरहून अधिक वर्ष लढा दिला व  त्यात यशस्वी झालो. हा लढा अनोखा होता. जनमत संघटित करून, लोकांना शांततेच्या मार्गाने लढण्याचे वेगवेगळे प्रयोगशील मार्ग दाखवून, इंग्रजांशी वाटाघाटी करून तसेच अनेक क्रांतिकारकांनी प्रसंगी शस्त्र उचलून, आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन आपले योगदान दिले. या लढ्याचे नेतृत्व दादाभाई नवरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, फिरोजशहा मेहता, साने गुरुजी, सेनापती बापट, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल… या उच्चशिक्षित नेत्यांनी तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर

आझाद, खुदीराम बोस अशा असंख्य क्रांतिकारकांनी केले.

याच दरम्यान सामाजिक सुधारणा व प्रगतीचा लढादेखील लढला गेला. या देशातील स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, आदिवासी यांना हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा हा स्वातंत्र्यलढा होता. याचे नेतृत्व राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, लोकहितवादी, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार या महापुरुषांनी केले.

या लढ्यांनी भारतीयांच्या जीवनामध्ये आमुलाग्र असा बदल घडवला. भारतीयांचा आधुनिक मूल्यांशी परिचय याच काळात झाला. याची परिणीती संविधान निर्मितीच्या स्वरूपात झाली. भारतात, भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून जे जे चांगले होते, शाश्वत व उदात्त होते, तसेच या दीडशे वर्षात राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यातून आपण जी मूल्ये या देशात रुजवली होती. त्यांचा समावेश आपल्याला भारताच्या संविधानामध्ये झालेला दिसून येतो. याच संविधानावर आपला देश, देशातील लोकांचे स्वातंत्र्य, आपले अस्तित्व, भारताची ओळख, आपले अधिकार या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे संविधान पन्नास किंवा शंभर वर्षांसाठी निर्माण झालेले नाही. तर जोपर्यंत भारत हा देश अस्तित्वात राहील तोपर्यंत ते अबाधित असणार आहे. संविधान म्हणजेच आपल्या भारतीयत्वाची खूण आहे.
*सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर उल्लेखिलेला इतिहास हा अगदी अलीकडच्या काळात घडलेला व लिखित स्वरूपाचा इतिहास आहे.* त्यात सामील झालेले अनेक जण आता आतापर्यंत हयात होते. थोडेफार अजूनही आहेत. त्यामुळे यापासून आपण सहज, स्वाभाविकपणे प्रेरणा घेऊ शकतो. आधुनिक जगात वापरण्यासाठी, ‘बलसागर भारत’ घडविण्यासाठी ते गरजेचे आहे.
पण आज आपल्या देशासमोर व संविधानासमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, ज्या संघटना व ज्या विचारधारेची लोकं या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच आपल्याला चार्तुवर्ण्य व्यवस्थेतून मुक्त करणाऱ्या सामाजिक चळवळीच्या लढ्यात सामील नव्हते ते आज प्रचंड शक्तिशाली झालेले आहेत. *त्यांना भारतीय स्वातंत्र्य, संविधान, सामाजिक चळवळी, तिरंगा, राष्ट्रगीत, सामाजिक व राजकीय लढ्यांमधील नेते यांच्याबद्दल यत्किंचतही आपुलकी नव्हती. कारण या लढ्यांमुळे हजारो वर्षांपासून यांच्या हातात सत्तेची जी सूत्रे होती ती जाऊन ज्यांच्यावर त्यांनी हजारो वर्षे राज्य केले त्या सर्वसामान्य माणसाच्या हातात देशाची सूत्रे गेली.* मग यांनी एक डाव रचला. तो असा की या इतिहासाला हळूहळू पुसून टाकायचे. या लढ्यात एकमेकांसोबत लढलेल्या पुढाऱ्यांना एकमेकांचे शत्रू म्हणून समाजासमोर मांडायचे. गांधी, नेहरू यांची बदनामी करायची व हळूहळू हा इतिहासच विकृत करून टाकायचा. पुसून टाकायचा. त्याच वेळेस पुराणकाळातील प्रतीकांचे उदात्तीकरण करून त्यांना आपल्या सोयीप्रमाणे वापरून घ्यायचे व ज्या बहुजन समाजाचा उदय होऊ पाहतो आहे त्यांच्या मेंदूला हायजॅक करायचे. त्यांच्या मनात नजिकच्या इतिहासाबद्दल जे प्रेम, प्रेरणा आहे ती क्लूषित करायची, त्यांना पुराणकाळात नेऊन सोडायचे. देशात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणायचे, वेगवेगळ्या जातीच्या व धर्माच्या लोकांमध्ये परस्पर अविश्वास, शत्रुत्व निर्माण करायचे व पुन्हा एकदा देशातील सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची. नवीन पिढीला आपल्या कुविचारांप्रमाणे घडविता यावे यासाठी बाबा बुवा यांच्या फौजा तयार करायच्या, शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करायची, अभ्यासक्रम बदलवायचे, मिडिया ताब्यात घ्यायची, कुणी न्यायालयात गेलेच तर तेथील न्यायाधीशांनी आपल्या विरोधात निकाल देऊ नये म्हणून त्यांच्यापैकी एखाद्याचा ‘लोया’ बनवून सर्व न्यायाधीशांना ती भीती घालून वरून त्यांना मोठमोठ्या पदांचे आमिष दाखवून आपल्याला हवे तेव्हा, हवे तसे निकाल मिळवायचे किंवा निकालांना उशीर लावायचा. हे सर्व करता यावे म्हणून निवडून येणे व सत्ता आपल्या ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा, मिडिया यांना गुलाम बनवून, धार्मिक ध्रुवीकरण अशा सर्व गोष्टी करून येनकेनप्रकारे सत्ता टिकवून ठेवायची, हे गेल्या एका तपापासून (किंबहुना साडे तीन दशकांपासून) दररोज घडत आहे.

याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला, देशातील सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुष नागरिकांना भोगावे लागणार आहेत. हा इतिहास पुसला गेला व संविधानाला अपेक्षित असलेली व्यवस्था, देश, नागरिक बनले नाहीत तर आपण एकविसाव्या शतकात जगत असताना मनाने, बुद्धीने एक देश, समाज व व्यक्ती म्हणून हजारो वर्षे मागे चालले जाऊ. आपल्या भावी पिढ्यांसमोर कोणतेच आदर्श उरणार नाहीत. जे राहतील ते चुकीचे असतील.
तेव्हा वेळीच सावध होणे व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी, लोकशाही, संविधान टिकवून ठेवण्यासाठी, आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे.

– डॉ. राहुल पाटील
(१०/०६/२०२६)

Exit mobile version