भाषा हे ज्ञान आत्मसात करण्याचे सर्वात महत्वाचे साधन, माध्यम आहे. त्यामुळे हे साधन चांगल्या पद्धतीने वापरता येणे, या माध्यमावर आपले प्रभुत्व असणे हे खूप गरजेचे असते. कोणतीही भाषा लहानपणी जेवढ्या सहज व लवकर शिकता येते. तेवढी नंतर जमत नाही. मोठं झाल्यावर भाषाशिक्षणासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात.
अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण शहरांपासून तर अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले आहे. मात्र इंग्रजी
माध्यमाच्या ६-७ वीच्या मुलांनासुद्धा मराठी व्यवस्थित वाचता, लिहिता, बोलता येत नाही. मराठी माध्यमाच्या मुलांचे भाषज्ञानही जेमतेम असल्याचे दिसून येते.
आपल्या मुलांचा भाषाशिक्षणाचा पाया लहानपणीच पक्का करायला हवा. त्यासाठी ‘सचित्र बालमित्र’ या पुस्तकासारखे दुसरे पुस्तक नाही. या पुस्तकातून दररोज एकेक धडा शिकवला व वाचण्याचा, लिहिण्याचा, एकेक ध्वनी योग्य पद्धतीने बोलण्याचा चांगला सराव करून घेतला, तिथल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलांना व्यवस्थित समजावून सांगितला तर मुलांच्या मराठी भाषेचा पाया पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. याचा फायदा त्यांना भविष्यात लेखन, वाचन, वक्तृत्व, अभिनय व कोणताही विषय कमी वेळेत चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचे कौशल्य वाढीस लागण्यासाठी होईल. यामुळे मुलं मोठी झाल्यावर त्यांना कोणत्याही परीक्षेत तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा उपयोग होईल.
१५ रु.च्या (काही दुकानदार १० रु. लाही विकतात) या पुस्तकाची सर महागड्या प्रकाशनांच्या ३००-४०० रु. च्या पुस्तकांनाही येणार नाही. कारण अक्षरओळख, शब्दनिर्मिती, शब्दओळख यांची अशा क्रमाने धड्यांनुसार या पुस्तकात मांडणी करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे मुलांचा अगदी कुणीही सहजपणे अभ्यास घेऊ शकतो.
पुढे अंक, संख्या, पाढे, सोपी गणिते, लहान मुलांना त्या त्या वयानुसार माहित असायला हवे असे सामान्य ज्ञान, चांगल्या सवयी, राष्ट्रगीत, वंदे मातरम्, प्रतिज्ञा असे खूप सारे या पुस्तकात आहे. तेव्हा आजच हे पुस्तक विकत घ्या व मुलांचा घरच्या घरी नियमित सराव घ्या.
(हे पुस्तक कोणत्याही वर्गाच्या अभ्यासक्रमात नाही. पण माझ्या व माझ्यासारख्या कित्येकांनी लहानपणी ह्या पुस्तकातून अभ्यास केलेला आहे.)
डॉ. राहुल पाटील,
सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
जव्हार, जि. पालघर
(लहानपणीच चांगल्या पद्धतीने भाषा शिकवणे का गरजेचे असते, हे मी माझ्या ‘मानव व प्राणी यांच्या भाषेतील फरक या व्हिडिओमध्ये शेवटी उदाहरण देऊन सांगितले आहे. जिज्ञासूंनी व्हिडिओ पहावा. व्हिडिओची लिंक – https://youtu.be/dVAAvx5WXw8 )