‘डोह’ कथेचा परिचय

डोह

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.

‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.

असाच एक दिवस खेळ दाखवून झाल्यावर एक पिवळ्या देहाची अतिशय रूपवान स्त्री त्याच्या जवळ येते आणि टोपलीतल्या नागाकडे एकटक पाहत मदारीला “हा नाग आहे?… आणि ही मादी?” असे विचारते. मदारी तिला ‘व्हय’ असे उत्तर देतो. त्यानंतर नागाला पुन्हा एकदा निरखत मदारीच्या नागाच्या टोपलीत एक रुपया टाकून ती तेथून चालली जाते. मदारी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघतच राहतो. त्यानंतर ती बाई त्याच्या मनाचा ताबाच घेते. तिचे घारे डोळे, तिच्या शरीराचे इतर अवयव, तिचे लांबसडक केस, स्मित हास्य हे सर्व त्याला घरी येताना व घरी आल्यावर त्याला सतत आठवत राहते. त्याच्या डोळ्यासमोर ती फिरत राहते. त्याची वासना स्वैर सुटते. मनातल्या मनात तो तिचा भोग घेतो. रात्री ती बाई त्याच्या स्वप्नात येते. ओल्या अंगाने ती त्याला जणू सामोरी गेलेली असते. तो जेव्हा अचानक दचकून झोपेतून जागा होतो, तेव्हा वासनेने त्याचे शरीर एखाद्या तापलेल्या लोखंडासारखे पेटून उठलेले असते. त्याच्या या भावनेचा निचरा करणे त्याला शक्य नसते. मग तो नागाच्या टोपलीतून नागाला काढतो. काही क्षण त्याच्याकडे निरखून पाहतो आणि त्याला नागिणीच्या टोपल्यात सोडून देतो. नाग व नागिण या दोघांची क्रीडा सुरू होते. तो डोळ्यात प्राण आणून त्याची ती क्रीडा बघत राहतो. त्याच्या अंगावर घाम येतो.

दुसर्‍या दिवशी तो अम्माने सांगितल्याप्रमाणे सिंदीडोहात एक साप असतो, तो साप पकडायला जातो. त्या डोहात त्याला एका नग्न अवस्थेतील स्त्रीचे प्रेत तरंगताना दिसते. ती स्त्री दुसरी-तिसरी कुणीही नसून मदारीच्या नागाच्या टोपल्यात एक रुपया टाकणारी व त्याच्या स्वप्नात येणारी स्त्री असते. ते पाहून तो घाबरतो व झपाझप पावले टाकत घराकडे निघून येतो. तो गावातील कुणालाही त्याने त्या बाईचे प्रेत पाहिल्याचे सांगत नाही. कारण त्याच्या मते त्याने असे सांगितल्यास लोक व पोलिस आपल्यावरच खुनाचा आरोप करतील. तिचे नातेवाईक त्याला दगडधोंड्यांनी ठेचून काढतील. पोलीस मारतील. अम्माला या सगळ्यामुळे दुःख होईल. या पुढील सर्व संभाव्य घटनांची मालिका त्याच्या नजरेसमोर उभी राहते. म्हणून तो अम्माशिवाय कुणालाच ते सांगत नाही.

मात्र गावातील लोकांना ही बातमी कळतेच व संपूर्ण गाव डोहावर त्या बाईला बघायला जाते. अम्मासुद्धा जाते. फक्त मदारी जात नाही. पण संध्याकाळी संपूर्ण गाव त्याच्याकडे येते व सरपंच त्याला ते प्रेत त्या पाण्यातून बाहेर काढून त्याला स्मशानात नेऊन पुरायला सांगतो. त्याचे त्याला दहा रुपये मजुरी द्यायला सरपंच तयार होतो. मदारी सुरुवातीला “थ्या बाईच्या मढ्याले मी कसा हात लावू मायबाप?” असे म्हणून ते काम टाळण्याचा प्रयत्न करून पाहतो. पण नंतर दहा रुपयाची लालसा त्याच्या मनात निर्माण होते व तो ते काम करायला तयार होतो.

तो त्या बाईचे प्रेत काढायला डोहावर जातो. तेव्हा पुन्हा पूर्ण गावाची गर्दी तिथे जमते. तो पाण्यात पोहत पोहत त्या प्रेताजवळ जातो आणि पाण्यातून ओढत-ओढत व पाण्यातून बाहेर येताना खांद्यावर उचलून त्या बाईचे नग्न प्रेत पाण्याबाहेर काढून आणतो. त्यानंतर पोलीस प्रेताचा पंचनामा करतात. पंचनामा आटोपल्यावर सरपंचाच्या सांगण्यानुसार तो पुन्हा ते नग्न प्रेत खांद्यावर घेऊन ते स्मशानापर्यंत आणतो. तिच्यासाठी कमरेएवढा खड्डा खोदतो. ते प्रेत त्या खड्ड्यात टाकून पुरून टाकतो. हे सर्व करताना त्याचा स्पर्श त्या प्रेताच्या नग्न शरीराला पुन्हा-पुन्हा झालेला असतो. अगदी जवळून त्याने त्या देहाचे दर्शन घेतलेले असते. त्यामुळे तिच्या त्या उघड्या शरीराबद्दल त्याच्या मनात प्रचंड आसक्ती निर्माण होते. वासनेने तो पिसाळून जातो. पण आजूबाजूला पूर्ण गाव उपस्थित असल्याने तो काहीही करू शकत नाही. शेवटी सरपंचाकडून दहा रुपये घेऊन तो रात्री उशिरा घरी परततो व जेवण करून झोपी जातो.

पण त्या स्त्रीने त्याच्या मन व मेंदूचा पूर्णपणे ताबा घेतलेला असल्यामुळे मध्यरात्री ती त्याच्या स्वप्नात येते. स्वप्नात ती विवस्त्र होऊन त्याच्या अंगावर बसलेली असते आणि तिने त्याला दिलेला एक रुपया मागत असते. असे भयानक स्वप्न पाहिल्याने तो दचकून उठतो. पण त्यासोबत त्याची वासनाही जागृत झालेली असल्याने तो नागाच्या टोपलीतून नागाला काढून नागिणीच्या टोपलीत सोडून देतो आणि नेहमीप्रमाणे टोपलीवर हात ठेवून त्यांची क्रीडा अनुभवत राहतो.

त्यानंतर ते स्वप्न, वास्तव की भास आहे, याचे काहीही भान त्याला राहत नाही. झोपडीच्या बाहेर त्याला एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. तो बाहेर येऊन पाहतो. तर त्याला त्या स्त्रीचा ओला नग्न देह दिसतो. काही क्षणांसाठी तो घाबरतो. पण वासनेने बेभान झालेला असल्यामुळे मन कठोर करून तो तिच्या आवाजाचा माग घेत त्या दिशेने जात राहतो. त्याच्यासमोर केस मोकळे सोडलेली ती नग्न स्त्रीच दिसू लागते. त्याच्या रांगड्या अशा शरीरातील वासना तळामुळातून खदखदू लागते आणि त्या बाईचा लैंगिक उपभोग घेण्याच्या इर्षेने तो तिच्या पाठीमागेच लागतो. झपाझप तो डोहाच्या जवळ जाऊन पोहोचतो. तेवढ्यात ती मोकळ्या केसांची बाई त्याला खडसावून विचारते की, “तुला दहा रूपये पाह्यजे का मी?” तो “तू” असे उत्तर देतो. ती “चल मग ये माझ्याबरोबर” असे म्हणते. त्याच क्षणी त्याच्या अंगाभोवती कशाचा तरी विळखा पडतो आणि कल्पनेत किंवा आभासी स्वरूपात तो क्षण दोन क्षण प्रचंड आवेशाने तिचा उपभोग घेऊ लागतो आणि त्याच डोहात जाऊन पडतो. त्याला पोहता येत असूनही त्याच्या कल्पनेतील/ स्वप्नातील देहाला कदाचित तो सोडत नसल्यामुळे बुडून मरण पावतो. अशा प्रकारे ‘डोह’ या कथेतील हा मदारी त्याच्या वासनेच्या डोहात बुडून मरण पावतो.

असे असले तरी मदारीच्या शारीरिक वासनेला दारिद्र्याचीही एक बाजू आहे. ती समजून घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर खेळ दाखवून तो लोकांसमोर “मायबाप, गरिबाच्या पोटासाठी दोनाने, चाराने, एकाना …. मायबाप… देव तुमचं भलं करो…. सापाईच्या दुधासाठी दोनाने मायबाप.” या पद्धतीने हात पसरून दोन आणे, चार आणे गोळा करून आणतो. त्याच्या घरात फक्त त्याची म्हातारी अम्मा (आई) आहे. जी “अम्मा आता आपल्यापासून दूर जाणार्‍या वाटेवरची एक प्रवासी झाली आहे”, असे त्याला वाटते. त्या अम्माकडे तो कमवून आणलेले तीन रुपये सोपवतो. घरात प्रचंड दारिद्र्य आहे. ते पैसे आल्यावर अम्मा ज्वारी विकत घ्यायला जाते. त्याचे घर म्हणजे एक झोपडी आहे. त्यात रात्री एक दिवा लावलेला असतो. अशी त्याची आर्थिक परिस्थिती असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण आहे. म्हणूनच तो पंचवीस वर्षाचा होऊनही त्याचे लग्न झालेले नाही. त्यामुळे वयानुसार निर्माण होणार्‍या नैसर्गिक भावनांचा निचरा किंवा समाधान तो नाग-नागिणीचे मैथुन बघूनच करून घेतो. त्याच्या हातून आतापर्यंत काही वावगे घडलेले असल्याचा उल्लेख या कथेत कुठेही आलेला दिसत नाही.

या कथेला दिलेले ‘डोह’ हे शीर्षक मोठे अर्थपूर्ण आहे. डोहामध्ये पाणी गोल गोल फिरत असते आणि या भोवर्‍यात जर कुणी सापडले तर त्याला बुडवून टाकत असते. त्याचप्रमाणे डोहासारखेच माणसाचे मनही असते. मनात जर कोणत्याही प्रकारचे विचार पुन: पुन्हा निर्माण होऊ लागले की, ते मनाचा ताबा घेतात. फिरून फिरून तेच विचार मनात येत राहतात. त्याचा एक भोवरा बनतो. मग माणसाचा सत्याशी, वास्तवाशी संबंध तुटतो. जे ‘नाही आहे’ तेच त्याला खरे वाटू लागते आणि या विचारचक्रात किंवा विचारांच्या डोहात तो गटांगळ्या खात राहतो. तसेच डोहाच्या खोलीचा जसा थांग लागत नाही, तसाच मनाच्या खोलीचाही थांगपत्ता लागत नाही.

या कथेतील मदारीच्या मनात त्या स्त्रीच्या शरीराची अशी काही एक आकृती किंवा प्रतिमा कोरली जाते की, ती प्रतिमा/ आकृती त्याच्या नजरेसमोरून हटतच नाही. आधीच त्याच्या वासना या अतृप्त असतात. त्यांचा निचरा झालेला नसतो. आतापर्यंत त्याने त्या दडपून ठेवलेल्या असतात किंवा मग नाग-नगिणीच्या मैथुनाच्या दर्शनाचा अनुभव घेऊन त्या उलट जास्त चाळवल्या गेलेल्या व उद्युक्त झालेल्या असतात. त्यामुळे त्या स्त्रीच्या नग्न देहाच्या उपभोगाचा विचार त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेतो. त्याच्या त्या भावनांवर वासनांवर तो नियंत्रण ठेवू शकत नाही व या वासना त्याचा अंत घडवून आणतात. म्हणून मानवी मनाचे प्रतीक म्हणून या कथेला ‘डोह’ हे शीर्षक दिले असावे, असे वाटते आणि ते समर्पक असेच आहे.

अतिशय अर्थपूर्ण शब्दरचना, ओघवती व प्रवाही अशी भाषाशैली, तृतीयपुरुषी निवेदनतंत्र, निवेदनासाठी प्रमाण मराठी तर मदारी, त्याची आई, सरपंच यांच्या तोंडीच्या संवादासाठी बोलीभाषा तर त्या बाईच्या तोंडी दोन-तीन वाक्ये आलेली आहेत त्यासाठी प्रमाण बोलीचा वापर अशा पद्धतीने ही कथा साकारलेली आहे.

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

YouTube वरील माझे काही व्हिडिओ –

पदवीच्या विद्यार्थ्यांनी ३ वर्षांत काय करावे?

https://youtu.be/12qC-x_d950

कापसाची शेती कशी असते?
https://youtu.be/nY0AqxLTMc8

आदिवासी समाज, संस्कृती, तत्वज्ञान : परिचय (मुलाखत – श्री. रवी बुधर, मुलाखतकार – डॉ. राहुल पाटील)
https://youtu.be/1TNzfzva-mQ

महानुभाव संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान-
https://youtu.be/oEuj70qz534

संत साहित्य : प्रश्नोत्तर स्वरूपात (पदवी, पदव्युत्तर तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)
https://youtu.be/fg3XjvdP1UU

ग्रामीण साहित्य : संकल्पना, स्वरूप व मराठीतील परंपरा
https://youtu.be/mJgbqIN6BZ8

वागिंद्रियाची रचना व कार्य –
https://youtu.be/p9O2KeNDgT4

साहित्य आणि समाज : परस्परसंबंध –
https://youtu.be/70Tgmul9aTo

शिक्षणाची उद्धिष्टे-
https://youtu.be/4UbJ6Fh33v4

उच्चारण-स्थानावर आधारित स्वनांचे प्रकार-
https://youtu.be/HEkXOyDGjVM

2 thoughts to “‘डोह’ कथेचा परिचय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *