ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा

          कोणत्याही प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीमागे काही ना काही प्रेरणा या असतातच. त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रेरणा आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. तशाच ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागेही काही प्रेरणा आहेत. त्या पुढील प्रमाणे –

१) ‘ग्रामीणते’चा शोध घेणे –

          ग्रामीण साहित्याचे वेगळेपण हे त्याच्या ‘ग्रामीणते’त आहे. ग्रामीणतेची ही जी जाणीव आहे, तिचा शोध घेणे व ती व्यक्त करणे ही ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रचार प्रसारामुळे  शिकलेली पहिली पिढी निर्माण झाली.  या पिढीच्या असे लक्षात आले की, आतापर्यंत ग्रामीण म्हणून जे साहित्य लिहिले गेलेले आहे किंवा एकूणच जे मराठी साहित्य आहे, यात ग्रामीण भागाचे, तेथील लोकांच्या जगण्याचे त्यांच्या सुख-दुखांचे वास्तव चित्रण आलेले नाही. ग्रामीण

भागातील माणसांचा शेती, निसर्ग, विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, यांच्याशी अतिशय निकटचा संबंध असतो. तेथील सण, उत्सव, यात्रा, पूजा, विधी, प्रथा,परंपरा, आहार, वेशभूषा इत्यादी गोष्टी शहरी जीवनापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारलेले असून शेतकरी, शेतमजूर, आलुतेदार, बलुतेदार यांचा या शेतीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येत असून हे सर्वजण शेतीवर अवलंबून असतात व या सर्व घटकांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ संबंध येत असतो. ग्रामीण भागात आपल्याला लोकं समूहजीवन जगताना दिसून येतात. ग्रामीण भागातील प्रथा-परंपरा, रीतिरिवाज यात आपल्याला आदिमतेच्या खाणाखुणा दिसून येतात. 

          ग्रामीण भागातील लोकांचे जीवन हे अतिशय कष्टमय असते. शेतात ऊन-वारा-पावसात त्यांना राबावे लागते. असे असले तरी या कष्टप्रद जीवनात निसर्ग, निसर्गातील बदल, पीक, त्यांची वाढ, उत्पन्न, सुगीचे दिवस, विविध सण-उत्सव, यात्रा, भजन-कीर्तन, क्रीडा यातून ते आनंदाचे सुखाचे क्षण शोधत असतात. तेथील माणसांचे स्त्री-पुरुषांचे निसर्गावर शेतीवर पाळीव प्राण्यांवर नितांत प्रेम असते. त्यांच्या भावभावना, मन या गोष्टीमध्ये अडकलेले असते. शेतीला ते ‘काळी आई’ संबोधतात. 

          या सर्व गोष्टींमधून एक ‘ग्रामीणता’ निर्माण होत असते. तिचा शोध घेणे व तो साहित्यात व्यक्त करणे, ही ग्रामीण साहित्याची एक महत्त्वाची प्रेरणा आहे. 

२) कृषिनिष्ठ संस्कृतीचे दर्शन घडविणे-

          ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय शेती हा असतो. शेतकरी शेती कसतो. शेतातून उत्पन्न काढतो. शेतमजूर त्याला मदत करतात. बलुतेदार हे शेतकऱ्यांना व परस्परांना विविध सेवा पुरवतात. आलुतेदार हेही शेतकरी व इतरांना सेवा व वस्तू पुरवतात. यापैकी बरेचसे फिरस्ते असतात. या सर्वांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असतो. आधुनिकीकरण व यांत्रिकीकरण यामुळे शेतीची कामे, त्यांचे स्वरूप शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या वस्तू यांच्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला असला तरी ही व्यवस्था अजूनही पूर्णतः नष्ट झालेली नाही. आजही भारतातील खेड्या-पाड्यांमधील मुख्य व्यवसाय शेतीच आहे. ही शेती बहुतांशी निसर्गावर अवलंबून आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हे असुरक्षित बनले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये फक्त माणसेच नसतात, तर गाय, बैल, म्हैस, रेडा, बकरी, कोंबडी व इतर प्राणी असतात. शेतकरी शेतीला ‘काळी आई’ असे म्हणतात. याला कारण म्हणजे ग्रामीण भागात कृषिनिष्ठ संस्कृती आहे. म्हणजे शेती, शेतकरी, प्राणी, निसर्ग, अलुतेदार, बलुतेदार यांचा एकमेकांच्या संबंधातच विचार करावा लागतो. दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेती किंवा पाळीव प्राणी यांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांचा जीव वरखाली होतो. त्यांना जेवण जात नाही. कारण त्यांच्या भावना या गोष्टींमध्ये गुंतलेल्या असतात.

          अलीकडच्या काळात या पारंपारिक कृषिनिष्ठ संस्कृतीत काही बदलही घडून येताना दिसत आहेत. दुष्काळ, महागाई यामुळे शेती परवडत नाही. मग अनेक शेतकरी शेती एन. ए. (बिनशेती) करून प्लॉटिंग करत आहेत व ते प्लॉट विकून पैसे मिळवत आहेत. अशा शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा शोध घेणे, त्यांच्या मनातील दु:ख, ताणतणाव टिपणे हे देखील महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण साहित्यात ग्रामीण भागातील लोकांचे शेतीशी येणारे संबंध, त्यातून त्यांच्या मनात निर्माण होणारे आनंद, दुःख इत्यादी भाव, त्यांचे जगणे, त्यांचे समग्र चित्रण येणे स्वाभाविक आहे. ही ग्रामीण साहित्याची प्रेरणा आहे. 

३)  ग्रामीण माणसाच्या दुःखाचा, दारिद्र्याचा अविष्कार करणे/ ग्रामीण माणसाच्या दुःखाचे-दारिद्र्याचे चित्रण करणे –

          भारतातील साधारणतः ६०% पेक्षा जास्त लोकसंख्या खेड्यात राहते व जे शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, तेही खेड्यातूनच स्थलांतरित झालेले आहेत. ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेती ही निसर्गावर अवलंबून आहे व निसर्ग हा अनियमित व लहरी आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधी पिकांवर कीड पडते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते किंवा हातचे संपूर्ण पिकच नष्ट होते. यामुळे ग्रामीणांच्या पदरी दारिद्र्य येते. हे वास्तव अगदी सनातन आहे. त्याशिवाय कधी चांगलं पिकलंच तर पिकाला योग्य भाव मिळत नाही. मध्ययुगीन कालखंडात वेगवेगळ्या शाह्यांच्या आक्रमणात शेती उद्ध्वस्त व्हायची. इंग्रजांच्या काळात नगदी पिके आली. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला जास्त भाव न देता तो कमी किमतीत खरेदी करून त्यांच्या श्रमाचे शोषण कसे करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. ती आजतागायत कायम आहे. 

          ग्रामीण भागात जवळपास ९९%  बहुजन समाज आहे. हिंदू धर्मात त्यांचे स्थान शूद्र या वर्णात होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने व्यापक जागरूकता, शिक्षणाप्रती आस्था, आकर्षण निर्माण होऊ शकले नाही. १९९० नंतर शिक्षण घेऊन पदवीधरांची संख्या वाढली. मात्र वशिला, डोनेशन यामुळे त्यांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. 

          या ग्रामीण भागातील लोकांचे धर्माच्या आधारे प्रचंड आर्थिक शोषण केले गेले आहे. याचे वर्णन व मांडणी म. फुलेंपासून अनेक अभ्यासकांनी केलेली आहे . जागतिकीकरणाच्या काळात तर शेतकऱ्यांच्या दारिद्र्यात अधिक भर पडत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागले आहेत. 

          अशी ही भयंकर परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. या परिस्थितीला हे लोक कसे तोंड देत आहेत, त्यांच्या मानसिकतेवर, एकूणच जगण्यावर काय परिणाम झालेले आहेत, याचा शोध घेणे व चित्रण करणे ही ग्रामीण साहित्याची प्रेरणा राहिलेली आहे. 

४) ग्रामीण माणूस आणि निसर्ग यांच्या संबंधाचा शोध घेणे – 

          शेती, शेतीतील पीक, प्राणी, पक्षी, वनस्पती हे सर्व निसर्गाचे घटक आहेत. शेतकरी हा निसर्गातील या घटकासोबतच आयुष्यभर जगत राहतो. निसर्ग म्हणजे पाऊस, आकाश, नद्या-नाले, डोंगर, ढग, वृक्षवल्ली यांच्या सान्निध्यात शेतकरी सुख-दुःख भोगत असतो. हा निसर्ग शेतकऱ्यांना पीकपाणी, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, आर्थिक उत्पन्न इत्यादी उपलब्ध करून देतो. यातूनच शेतकऱ्यांच्या घरात आनंद, उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यातून दिवाळी-दसऱ्यासारखे सण निर्माण होतात. मात्र हाच निसर्ग कोपला तर दुष्काळ, अतिवृष्टी, गारांचा पाऊस, पिकावरील रोग, किड इत्यादी नैसर्गिक संकटे आल्यावर शेतकरी उद्ध्वस्तही होतात. त्याला दारिद्र्य येते. त्याच्या लहान-सहान गरजाही मग तो पूर्ण करू शकत नाही. उपासमार, कर्जबाजारीपणा यातूनच निर्माण होते. निसर्गाचा हा कोप सहन करण्यापलीकडे त्याच्याकडे काही पर्यायही नसतो.

          अलीकडे निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. वाढते औद्योगिकरण, यांत्रिकीकरण यामुळे होणारे प्रदूषण, शहरीकरणामुळे जंगलांची होणारी कत्तल यामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. अनियमितता, ढगफुटीसारखे प्रकार वरचेवर वाढत आहे. यामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी अधिक हतबल झालेला आहे. त्यामुळे शहराकडे होणारे स्थलांतर, गुरंढोरं, शेती परवडत नाही म्हणून ती विकणे इत्यादी प्रकार वाढलेले आहेत. 

          थोडक्यात, शेती, शेतकरी आणि निसर्ग यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. निसर्ग अनुकल तर शेतकरी सुखी आणि निसर्ग प्रतिकूल तर शेतकऱ्यांची दैना ठरलेली आहे. तेव्हा शेती-शेतकरी व निसर्ग यांच्या नात्याचा त्यांच्यातील  परस्पर संबंधाचा शोध घेणे, ही  ग्रामीण साहित्याची एक प्रेरणा ठरते. ‘बनगरवाडी’, ‘बारोमास’, ‘तहान’ अशा अनेक साहित्यकृत्या आपण उदाहरण म्हणून समोर ठेवू शकतो.

५) ग्रामीण भागातील बदलांचा वेध घेणे – 

          गेल्या ५० वर्षात ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर अमुलाग्र असे बदल घडून आलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला गेला. त्याच्या पाठोपाठ पंचायतराज व्यवस्थेचा अंमल सुरू झाला. ग्रामीण भागात ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्या, शाळा इत्यादी सुरू झाल्या. त्यासाठी पक्या इमारती बांधल्या गेल्या. रस्ते बांधून खेडी शहरांना जोडली गेली. बसेस, खासगी वाहनांची वाहतूक, सुरू झाली. गावागावांमध्ये दुकान, टपऱ्या, हॉटेल सुरू झाले. वाहने वाढल्याने वाहन दुरुस्तीची दुकाने सुरू झाली. पुढच्या काळात दूरदर्शन, आकाशवाणी, डीव्हीडी प्लेयर, मोबाईल स्मार्टफोन, विविध चॅनल इत्यादी टप्प्याटप्प्याने येत गेले. मनोरंजनाची साधने, माध्यमे बदलली. आधी लोककला, भजन-कीर्तन, तमाशा इत्यादी कार्यक्रम व्हायचे. आता इलेक्ट्रॉनिक मीडियावर अखंड मनोरंजन होत आहे. 

          ५० वर्षापूर्वी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने केली जायची. यांत्रिकीकरण वाढू लागल्यावर ट्रॅक्टर आले, वीज आली. त्याच्या साहाय्याने शेतीतील व इतर कामे केली जाऊ लागली. रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाणे यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला. उत्पन्न वाढले. मात्र उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा मेळ बसेनासा झाला. शेती परवडेनाशी झाली. 

          लोकशाही व्यवस्थेत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आमदार, सहकार महर्षी यांचा वावर वाढला. त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचू शकला नाही. बँका आल्या. मात्र शेतकऱ्यांची पत नसल्याने त्यांना कर्ज मिळेनासे झाले. सावकार अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज देऊ लागले. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांची आधीचीच बिकट अवस्था अधिक बिकट झाली. 

          शिक्षणाचा प्रचार, प्रसार, शाळा-महाविद्यालयांची स्थापना यामुळे काहींना शिकून नोकरी मिळाली. अनेकांनी या नवीन बदलांशी जुळवून घेत स्वत:चे व्यवसाय सुरू केले. यामुळे काही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. या बदलांचा काही कुटुंबांना लाभ झालाही. मात्र भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव, आर्थिक दुर्बलता यामुळे खूप मोठा वर्ग या बदलांच्या लाभापासून वंचित राहिला. यामुळे खेड्यात दारिद्र्य, नैराश्य, गुन्हेगारी, लाचारी वाढत गेली. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या. या बदलांचा ग्रामीण समाजावर खूप दूरगामी व खोल असा परिणाम घडून आलेला आहे.  या सर्व बदलांचा शोध घेणे व तो साहित्यातून मांडणे, ही ग्रामीण साहित्याची एक महत्त्वाची प्रेरणा आहे. 

६) लोकशाही व्यवस्थेचे ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम समजून घेणे-

          भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९५० मध्ये आपण राज्यघटना स्वीकारली. त्यानंतर लोकशाहीचे लाभ खेड्यापाड्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. पंचायतराज व्यवस्थेचा स्वीकार केला गेला. प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. सरपंच व इतर सदस्यांच्या निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यात येऊ लागल्या. त्यासाठी गावात पॅनल उभे केले जाऊ लागले. त्यातून गावात गटबाजी सुरू झाली. गाव दोन गटांमध्ये विभागले गेले. निवडून  येण्यासाठी या गटांमध्ये संघर्ष होऊ लागला. यातून गावात संघर्ष, वाद-विवाद , भ्रष्टाचार, व्यसनाधिनता वाढू लागली. या निवडणुकांमुळे गाव गटागटांमध्ये विभागले गेले. नातेसंबंध, भाऊबंदकी, जातीजातींमध्ये द्वेष, संशय, भांडण-तंटे वाढू लागले. निवडून आलेल्यांनी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विविध डावपेच खेळणे सुरू केले. यातून विरोधकांचे आर्थिक नुकसान, चरित्र्यहनन कसे करता येईल, यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. यातून खून, पोलीस केस, यासारख्या गोष्टीही घडू लागल्या. 

          या बदललेल्या राजकीय वातावरणाचा ग्रामीण भाग, तेथील माणसे, त्यांचे जगणे, यावर जो बरा वाईट परिणाम झाला, याचे चित्रण ‘गांधारी’ (ना. धो. महानोर), ‘पांगिरा’, ‘झाडाझडती’ (विश्वास पाटील),  ‘विषवृक्षाच्या मुळ्या’ (वासुदेव मुलाटे) या व इतर कादंबरीकार व कथाकारांनी आपल्या कथावाड़्मयातून रेखाटलेले दिसून येते. 

७) विविध प्रश्नांनी धगधगत असलेल्या, विद्रोहासाठी सज्ज असलेल्या ग्रामीण भागाची मानसिकता मांडणे- 

          ग्रामीण भागात आधीपासून अनेक समस्या आहेत. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, जात इत्यादीमुळे होणारे विविध पातळ्यांवरील शोषण, इंग्रजांच्या काळात उद्ध्वस्त झालेला शेतीव्यवसाय व एकूणच  ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे ग्रामीण इलाखा तसा  मागासलेला व दुर्लक्षितच राहिला. त्यात स्वातंत्र्योत्तर काळात एक नवीन आशावाद निर्माण झाला. शिक्षणाचा प्रचार-प्रसार, लोकशाही, निवडणुका यामुळे त्यांचा सत्तेत सहभाग वाढला. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, पण राजकीय जागृती निर्माण झाली. शिक्षण घेऊन बरेच जण नोकरीलाही लागले. पण या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा सर्वांना दीर्घकाळ फायदा होऊ शकला नाही. शेतीसाठी २४ तास पाणी, शेतमालाला योग्य हमीभाव यासारख्या मागण्या पूर्ण  होऊ शकल्या नाहीत. शिक्षणामुळे परिवर्तन घडते, नोकरी लागून आर्थिक परिस्थिती सुधारते, म्हणून अनेक ग्रामीण पालकांनी आपल्या मुलांना गरिबीतून शिकवले. पण वशिला, डोनेशन यामुळे अनेकांचे हेही स्वप्न अपूर्ण राहिले व ग्रामीण भागात शिक्षणाविषयीही नैराश्य व अनास्था निर्माण झाली.

          ‘सहकारातून आर्थिक विकास’ असे स्वप्न दाखविले गेले, पण तेथेही भ्रष्टाचार निर्माण होऊन वाढला. त्याचाही लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळू शकला नाही. 

          धरण व इतर प्रकल्पांसाठी खेड्यापाड्यातील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याचा योग्य मोबदला मिळू शकला नाही, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत. त्यांची एक पिढी बरबाद झाली. 

          ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. परंतु प्रशासकीय अधिकारी, नोकरदार व राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचारापुढे त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकल्या नाही. जागतिकीकरणामुळे तर गरीब-श्रीमंत हा भेद वाढतच गेला. शिक्षण आरोग्य इत्यादी गरजाही शेतकऱ्यांना भागविणे शक्य होईनासे झाले. यातून आत्महत्या होऊ लागल्या व त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. 

          या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागात चीड, संताप, विद्रोह निर्माण होऊ लागला. आपले सर्व पातळ्यांवर शोषण करून आपल्या जीवावर राजकीय पुढारी, अधिकारी श्रीमंत होत आहेत व आपले दारिद्र्य अगतिकता मात्र वाढत आहे, हे ते बघत होते. यातून शेतकरी आंदोलने निर्माण झाली. शेतकरी, शेतमजूर, दलित, स्त्रिया यांच्या संघटना उभ्या राहू लागल्या. अलीकडे नाशिक ते मुंबई अशा पदयात्रा घेण्यात आल्या. मुंबईत चक्का जाम केले गेले. शहरांचा अन्न, धान्य, भाजीपाला, दूध इत्यादींचा पुरवठा बंद करण्यात आला. 

          ग्रामीण भागात ही जी संघर्षासाठी, विद्रोहासाठी अनुकूल मानसिकता निर्माण होत आहे, तिच्या कारणांचा, परिणामांचा शोध घेणे व ती साहित्यातून मांडणे, हे देखील ग्रामीण साहित्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

 

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *