नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी कवितेमध्ये मोलाची भर घातलेली आहे. अस्पृश्यांचे दारिद्र्य, दैन्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव-जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सर्वच कवितांमधून मांडलेले दिसून येते.
नामदेव ढसाळ यांची ‘आत्ता’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी लावलेल्या ‘काव्यबंध’ या कसितासंग्रहात समाविष्ट आहे. ती अशी-
आत्ता – नामदेव ढसाळ
“सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला
आत्ता अंधारयात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे
हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला
आत्ता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे
या वैभवनगरीसाठी आपलाच खून सांडला आणिदगडी खाण्याचा मक्ता मिळाला
आता आभाळमुका घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे
सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला
आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे”.
‘आत्ता’ या कवितेतून त्यांनी दलित-अस्पृश्य समाजाला शेकडो वर्षे कशा पद्धतीने सूर्याकडे पाठ फिरवून (म्हणजे ज्ञान, समृद्धी, सन्मान, प्रगती, साधे माणुसकीचे जिणे या गोष्टींच्या अभावी) प्रवास करावा लागला हे सांगितलेले आहे. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता या शोषणाला, अभावग्रस्तेला नाकारलेच पाहिजे. अंधारातून प्रवास न करता प्रकाशाकडे वाटचाल करायला हवी, असे कवी म्हणतो.
कवीला आपल्या वडिलांचे, पूर्वजांचे दुःख दिसते, जाणवते. कारण अंधार वाहून वाहून म्हणजे दारिद्र्य, दुःख, अपमान सहन करत त्यांना शेकडो वर्षे वाटचाल करावी लागली आहे. त्यांना त्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. पण आता त्यांच्या पाठीवरचे हे ओझे उतरवण्याचे काम आपले आहे, असे कवी म्हणतो.
इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडे जी समृद्धी, वैभव आहे. ते येथील सामान्यांच्या घाम व रक्तातून उभे राहिलेले आहे. त्या बदल्यात सामान्यांना काहीच मिळाले नाही. आता या आभाळाला भिडणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावायला हवा. नवीन समतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी विद्रोह आवश्यक असतो.
शेवटच्या ओळींमध्ये कवीने ‘सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर’ ही प्रतिमा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी वापरलेली आहे. गौतम बुद्धांनंतर जवळपास अडीच हजार वर्षांनी दलित-अस्पृश्य-शूद्रांच्या शोषणाविरुद्ध लढणारा विचार, तत्वज्ञान मांडणारा महापुरुष लाभलेला आहे. त्या विचारांच्या प्रकाशात स्वतःची मुक्ती साधून घेतली पाहिजे. ते विचार आत्मसात करायला हवेत, असे कवीला वाटते.
अशा प्रकारे ‘आत्ता’ या कवितेतून हजारो वर्षांची शोषणाची परंपरा मांडताना आत्ता म्हणजे वर्तमानात बाबासाहेबांमुळे बदललेल्या परिस्थितीचे चित्रण कवीने या कवितेत केलेले आहे. मात्र त्यासाठी गरज आहे ती बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष जगण्यात उतरवण्याची.
– डॉ. राहुल पाटीलमराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
आत्ता हि कविता नामदेव ढसाळ यांची
समाजावून सांगली म्हणून
धन्यवाद सर